आत्महत्या करणारे बहुतेक लोक अपयशाच्या ओझ्याखाली दबून गेलेले असतात खरे म्हणजे यश किंवा अपयश म्हणजे नक्की असते तरी काय? चला समजून घेऊ या !

माझ्या ओळखीच्या कुटुंबातील एक मुलगी रूपा, १० वी मध्ये ९०% पेक्षा जास्ती मार्क्स मिळवणार अशी सगळ्यांनाच आशा होती. तिचे अभिनंदन करायला मी तिच्या घरी गेलो.

घरात प्रवेश केल्यापासूनच घरात उदासीची दाट छटा दिसत होती. मला पाहिल्यावर रूपा रडू लागली म्हणाली , “सॉरी, सर , मी कोणालाच न्याय देऊ शकले नाही , मी हरले, मी आई -बाबांची , तुमची गुन्हेगार आहे .”

तिचे आई बाबा देखील तिच्या ह्या बोलण्याचे मूक समर्थन करीत होते. मला तर वाटलं रूपा नापास झाली की काय, पण नंतर लगेचच उलगडा झाला तिला ७०% मार्क्स मिळाले होते.९०% मार्क्स मिळण्याच्या अपेक्षा असणाऱ्या मुलीला ७०% मार्क्स मिळणे ही गोष्ट अतिशय नामुष्कीची आणि पराभवाची वाटत होती.

त्याच दिवशी मी माझ्या दुसऱ्या दहावीचा विद्यार्थी राकेश कडेही गेलो. तो गणितात तीन मार्कानी नापास झाला होता आणि म्हणून दहावीत नापास झाला होता .तो रडत रडताच माझ्या कुशीत आला आणि म्हणाला, ‘मला माफ करा सर’, राकेश चे बाबा त्याची समजूत घालत होते , ते मला म्हणाले सर त्याला सांगा ना तो होईल पास….एका अपयशाने त्याने खचून जाऊ नये आम्ही कोणीही त्याला रागावलेली नाही..पण तो स्वतःच उध्वस्त झाला आहे.

रूपा आणि राकेश दोघेही उमलू पाहणारी मुलं, दोघेही या निकालामुळे स्वतःला अपयशी मनात होती आणि कोमेजून जात होती,  कोण जाणे अशाच प्रकारे अपयशी मानणाऱ्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येत असतील…

हरल्याची भावना काढून टाका

रूपा पास होऊनही अपयशी आणि राकेश पास न झाल्याने अपयशी, रूपा घरच्यांच्या आणि स्वत:च्या तथाकथित अपेक्षांना न्याय देऊ शकली नव्हती, तर राकेश स्वतःच्या नजरेत अपराधी ठरला होता, रुपाला वाटत होतं की, आता समाज काय म्हणेल , नातेवाईक मित्रमैत्रिणी काय म्हणतील” हुशार वाटत होती पोरगी पण कसला काय…! आणि दुसरीकडे राकेश स्वतःला हुशार मानायलाच तयार नव्हता .माझ्या मनात विचार आला हुशारी , हार जीत ,यश -अपयश हे सगळं एखाद्या परीक्षेच्या मार्कांवरून ठरवता येत का ? किंवा अपयश असे कोणत्या घटनेत मोजता येत का ?

मला आठवला तो पुरु राजा, सिकंदराने त्याला युद्धात हरवून बंदी बनविले युद्धात हरलेला पण मनातून न हरलेला पुरु राजाचा स्वाभिमान,  मातृभूमीवरची निष्ठा त्याचा दक्षपणा ( हे सारे गुण) मात्र सिकंदर कधीच हरवू शकला नाही , यातूनच सांग राजा मी तुला कसे वागवू या सिकंदराच्या प्रश्नावर पुरु राजा , हे राजा तू मला राजा सारखे वागवावेस , असे बाणेदार उत्तर देऊ शकतो , मग सांगा युद्ध एक घटना मानली तर ती घटना याला कुठे अपयशी बनवू शकली ?

जिंकण्याची वृत्ती बाळगा

खरे तर आपण प्रत्येकाने हे लक्षात घेतले पाहिजे की यश -अपयश कुठल्याही एका घटनेत ,त्या घटनेच्या अनुकूल किंवा प्रतिकूल घटितांमध्ये मोजतात येत नाही, यश हि घटना किंवा परिस्थिती नसून यश हि एक वृत्ती आहे यश हा एक दृष्टिकोन आहे ..यश हा एक विचार आहे… यश हे परिक्षेतल्या बऱ्या वाईट मार्कांवर किंवा लौकिक अर्थाने कुठल्याही अनुकूल किंवा प्रतिकूल घटनेवर चांगली वाईट नोकरी ,कमी अधिक पैसे यावर अवलंबून नसते, सर्वच पैसे वाले स्वतःला यशस्वी मानतात का ? मेरिट मध्ये आलेले स्वत:ला यशस्वी व आनंदी मानतात का ?

मग हे सारे असते आपल्या मनात ,मनातील विचारात आणि आपल्या दृष्टिकोनात, दोन प्रकारच्या वृत्ती असू शकतात एक तर जेतेपणाची, आत्मस्वीकृतीची, मनोवृत्ती किंवा पराजिततेची , न्यूनगंडाची अपराधीपणाची वृत्ती .

कितीही घटना सापेक्ष अपयश आले तरी जेतेपणाच्या वृत्तीने व्यक्ती आनंदी, स्वसमाधानी, पुढील वाटचाली साठी जोमाने उभ्या राहतात आणि हेच जर वृत्ती पराजिततेची असेल तर रूपा सारखं यश मिळूनही व्यक्ती सतत असमाधानी , अपूर्णतेत, स्वतःवर नशिबावर नाराज राहून, हरलेल्याच राहतात.

महान लोकांनाही आले होते सुरुवातीला अपयश

आपण सारे हे जाणतोच कि कितीतरी महान व्यक्तींचे शालेय शिक्षण आणि मार्क्स यांचे कधी जमलेच नाही , शाळेत किंवा जीवनात लौकिक अर्थाने अपयशी म्हणून हिणवले गेलेले, ते सारे जीवनाच्या शाळेत आणि त्यांच्या मनाच्या संपूर्णतेत जेतेपणाची वृत्ती बाळगून महान विभूती ठरले .

शाळेत काठावर पास होणारे, वकिलीच्या पहिल्या अनुभवात दरदरून घाम फुटलेले म. गांधी, एस एस सी पास न होऊ शकलेले जे . कृष्णमूर्ती, शाळेतून पळून जाणारे रवींद्रनाथ टागोर , शिकागोच्या त्या भाषणाच्या अर्धातास आधी पॅनिक अटॅक चे शिकार झालेले स्वामी विवेकानंद, शाळेत महामूर्ख आणि काडीचे शिक्षण घेऊ शकणार नाही असा शिक्का बसलेले, थॉमस एडिसन ,याला रंग रेषा यातील काहीच काळात नाही असा शेरा बसलेले वॉल्ट डिस्ने, आयुष्यात ४९ वर्ष फक्त हरतच आलेले पण जगन्मान्य झालेले अब्राहाम लिंकन, या साऱ्यांच्या यश आणि अपयशाचे गणित आपल्या परिभाषेत मांडता येणे शक्य आहे का? मुळीच नाही. जेतेपणाची वृत्ती त्यांच्यात मुरलेली होती.

मुलांनी ,पालकांनी, आपण  साऱ्यांनीच हे लक्षात घेतले पाहिजे कि हुशार असणं हे शाळेतल्या मार्कांवर अवलंबून नसत, शालेय शिक्षण हा माझ्या व्यक्तिगत विकासाचा एक मार्ग आहे (एकमेव मार्ग नव्हे).जीवनाची शाळा आणि शाळेतले मार्क यांचा परस्पर संबंध लावणे खरेतर अवघड आहे.

शाळेतील विषयात ,गणितात किंवा इतिहासात मिळालेल्या कमी किंवा अधिक मार्क मिळाल्याचा आणि आपण वेगवेगळ्या जीवनानुभवना कसे सामोरे जातो याचा संबंध काय असू शकतो? मग या अनुभव संपन्न जीवनानुभवाची दारे आपण शालेयजीवनापासूनच उघडी ठेवायला पाहिजेत. कारण जीवनात कधीतरी नापास झालेल्या किंवा अगदी मेरिट मध्ये आलेल्या मुले किंवा मुली, मोठेपणी आपले व्यावहारिक आणि व्यक्तिगत जीवन जगात असताना त्यातील वेगवेगळ्या भूमिका पार पडत असताना, त्यांचे वागणे, परस्पर सहसंबंध, मोठ्यांप्रती आदर भाव, सामाजिकता, मूल्यांची जोपासना, इथपासून गाडी चालविणे स्वयंपाक करणे या साऱ्या गोष्टीत त्यांचे कमी किंवा अधिक मार्क आडवे येत नसतात.

मला माझ्या मानसविकास तद्न्य म्हणून काम करतानाच्या प्रवासात आज पर्यंत एकाही व्यक्तीने माझे मानसशास्त्रात किंवा शाळेत मिळालेले मार्क्स विचारले नाहीत ( हे एका दृष्टीने बरेच झाले ) किंवा त्यावर माझ्याकडे यायचे कि नाही हे ठरविले नाही.

शाळेतील यश-अपयश म्हणजे जीवनातील यश-अपयश नव्हे

शाळेत जीवनात आपण मिळवलेले कमी अधिक मार्क आपल्या साठी महत्वाचे असले तरीही ते आपले संपूर्ण मूल्यमापनाचे निकष म्हणून वापरले जाऊ नये . कारण कितीतरी अपयशाने खचून गेलेल्या मुलांना हेच वाटले असेल ना कि माझ्या आई वडिलांना ,समाजाला मी नव्हे माझे मार्क , माझी डिग्री महत्वाची आहे आणि ती मला मिळविता येत नसेल तर माझे जीवनाचं व्यर्थ …

शालेय अभ्याक्रमातील सर्वच विषय आपल्याला खूप काही ज्ञान देत असतात शिकवत असतात ,परंतु शाळेतील यश अपयश हे जीवनाचे यश अपयश न मानता, शालेय जीवन पासून जेतेपणाची वृत्ती आवर्जून शिकता शिकविता आली पाहिजे, त्यामुळे नाकारला अपयशाला अडसर न मानता आपण जेही काही करू ते मनापासून करू झोकून देऊन करू , आपल्या स्वतःला यश -अपयशाच्या गर्तेत न अडकवता , मनापासून केलेल्या प्रयत्नांचे जे काही फलित असेल त्याला स्वीकारून ,अनुकूल फलिताने हुरूप वाढवून पुढे जाऊ तर प्रतिकूल फलिताने एक मार्ग बंद झाला तर पुढे जाण्याचा दुसरा मार्ग शोधायला आपल्याला जमू लागेल.

इतरांशी आपली तुलना न करता ,मोकळेपणाने जगायला शिकूया , जेतेपणची वृत्ती वाढवू, आपल्या मानाने ठरवलेले यश आपण मिळवूया , कोणतीही बोर्डाची परीक्षा, नोकरीचा एखादा इंटरव्ह्यू , नोकरीतले एखादे आव्हान आपल्याला नापास नाही करू शकणार .

आणि न्यूनगंडाने मागे पडण्यापेक्षा ,स्वतःला शोधत, स्वतःला समजून घेत,स्वतःला समजावत बदलत , आत्मविश्वास वाढून जेतेपणाची वृत्ती आपल्यात सहज प्रवेश करेल .

मित्रांनो, आपल्या मनात जिथे कुठे रूपा आणि राकेश असतील म्हणजे पराजिततेची वृत्ती असेल तर तिला वेळीच ओळखा, आणि प्रयत्नपूर्वक दूर सारा, गरज पडल्यास तद्न्य समुपदेशकाची मदत घ्या , जीवन कौशल्ये शिकण्याच्या कार्यशाळांमध्ये जरूर भाग घ्या .

अपयशाने खचून जाऊन सगळे संपले या भावनेतून मृत्यूला जवळ करण्याच्या आपल्या पराजित वृत्तीला , जेतेपणाच्या कुशीत लपलेले सर्वांग सुंदर जीवनाचे हसरे दृश्य दाखवा.

-अमोल कुलकर्णी ( संपर्क : amol.hv@gmail.com, मो. 9881907657)

लेखक हे अनुभवसंपन्न मानसविकास तज्ज्ञ असून गेल्या अनेक वर्षांपासून ते हेल्थ व्ह्यू या संस्थेच्या माध्यमातून मानवी मनाशी निगडीत समस्यांचे निराकरण करत आहेत.

LEAVE A REPLY

*