Thursday, April 25, 2024
Homeनगरकोरोना प्रतिबंधासाठी नियमीत हात धुवा

कोरोना प्रतिबंधासाठी नियमीत हात धुवा

सरकारच्या आरोग्य विभागाचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. आवटे यांचे आवाहन

अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रत्येकाने काही कालावधीनंतर प्रत्येकवेळी स्वच्छ हात धुवावे. शिंकताना नाकावर रुमाल धरावा, साथीच्या आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णापासून वेगळे राहिले तरी कोरोनासारख्या आजारांपासून आपण आपला बचाव करू शकतो असे प्रतिपादन सरकारच्या आरोग्य विभागाचे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी केले.

- Advertisement -

कोरोना आजारासंबंधी जिल्ह्यातील रुग्णालयांच्या डॉक्टरांमध्ये जागृतीसाठी मॅक्सकेअर हॉस्पिटलच्यावतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, मॅक्सकेअरचे डॉ. सतीश सोनवणे, डॉ. माजिद मोहम्मद, डॉ. अभिजीत शिंदे, डॉ. सुशील नेमाने यांच्यासह जिल्हास्तरीय पर्यवेक्षक, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, समुदाय अधिकारी उपस्थित होते.

डॉ. आवटे म्हणाले, पूर्वी देशात फक्त पुणे येथील राष्ट्रीय विज्ञान संस्थेमार्फत कोरोनासाऱख्या आजारासंबंधी रक्तचाचणी केली जात होती. जगातील सुमारे 74 देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने आपल्या देशात आता 52 रक्ततपासणी केंदे सुरू करण्यात आली आहेत. राज्यात पुणे, मुंबई व नागपूरला आता कोरोनाच्या विषाणूंची तपासणी केली जाणार आहे. अनेक देशांत कोरोना आजारासाठीची रक्ततपासणी लॅब नाहीत. मालदीव, मलेशिया, इराणसह इतर देशांमधील रुग्णांची रक्ततपासणी आपल्या देशात केली जाते, अशी माहिती दिली. डॉ. संदीप सांगळे, डॉ. अनिल बोरगे यांचे मनोगत झाले. सूत्रसंचालन डॉ. प्रशांत पटारे यांनी केले तर आभार डॉ. निलेश परजणे यांनी मानले.

राज्यात आतापर्यंत 245 रुग्णांची तपासणी केली असली तरी एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला नाही. कोरोनाचे रुग्ण नसले तरी दुसर्‍या देशातील किंवा राज्यातील कोरोनाग्रस्त पेशंट बरोबर प्रवास केलेल्या किंवा संपर्कात आलेल्यांवर राज्यातील आरोग्ययंत्रणा लक्ष ठेवून आहे. अशा संपर्कात आलेल्या प्रत्येकास संसर्गाची बाधा होऊ शकते. प्रत्येक डॉक्टर, नर्स, तपासणीसनेही या पुढील काळात नियमीत हात हॅन्ड सॅनिटायझर किंवा साबणाने स्वच्छ धुवावेत.

सध्या सोशल मीडियावर उलटसुलट मेसेज येत असल्याने सामान्य माणूस जास्त घाबरलेला आहे. चीनने कोरोना आजाराला प्रतिबंध करण्यासाठी कठोर व परिणामकारक उपायोजना केल्याने संपूर्ण जगाला वाचवल्याचे प्रशस्तीपत्र जागतिक आरोग्य संघटनेने दिल्याने सोशल मीडियावर येणार्‍या मेसेज किंवा उलटसुलट बातम्यांना काहीही महत्त्व नाही. चीन मधील बीजिंग शहरात शेकडो भारतीय सुखरूप आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या