रोहित पवारांविरोधात राणे घसरले

रोहित पवारांविरोधात राणे घसरले

शेंबडं म्हटल्याने समर्थक संतप्त : राणेंवर सोशल हल्लाबोल

अहमदनगर (प्रतिनिधी)- आमदार रोहित पवार व निलेश राणे यांच्यात सोशल शाब्दिक चकमक उडल्यानंतर त्यांच्या समर्थकांत चांगलीच खडाजंगी माजली. पवारांनी राणेंना कुक्कुटपालनाफची आठवण करून दिल्यावर संतप्त राणेंनी पवारांवर पलटवार केला. मात्र हे करताना राणे घसरले आणि त्यांनी पवारांना वांग्या, शेंबडे अशी विशेषणे लावली. त्यामुळे पवार समर्थक संतापले. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सभ्यतेची आठवण करून देताना राष्ट्रवादी टप्यात आल्यावर कार्यक्रम करते, असा अप्रत्यक्ष इशाराच राणेंना दिला.

साखर उद्योगासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना लिहलेल्या पत्रावरून हा वाद सुरू झाला. निलेश राणे यांनी ट्विट करून साखर विषयावर महाराष्ट्रात किती पैसा खर्च झाला याचे ऑडिट झाले पाहिजे, अशी मागणी केली. सरकार, राज्य, जिल्हा बँका वर्षोनुवर्षे साथ देतात तरी साखर कारखाने वाचवा, असे म्हटले जाते यावर त्यांनी आक्षेप नोंदवला. त्यावर आ.रोहित पवार यांनी खोचक उत्तर दिले. पवार साहेबांनी साखर उद्योगासह कुक्कुटपालन व इतर उद्योगांसाठीही उपाययोजना केंद्राला सुचवल्या आहेत, असे ट्विट त्यांनी केले. या उत्तरातील कुक्कुटपालन या शब्दामुळे राणे चांगलेच भडकले. त्यांनी एकामागे एक ट्विट करत रोहित पवारांवर शेलक्या भाषेत टीका केली. एका ट्विटमध्ये त्यांनी शेंबडं, वांग्या अशा शब्दांचा वापर केला. रोहित पवार सारखे लुडबुड करत असतात.

साखरेवर बोललो की हे अस्वस्थ का होतात? असा सवाल त्यांनी केला. तर दुसर्‍या ट्विटमध्ये त्यांनी मिरची का लागली, असा प्रश्न करत मतदार संघावर लक्ष द्या कुठेही नाक टाकू नका अन्यथा साखर कारखान्यासारखी अवस्था होईल, असा इशारा दिला. ठाकरे मुंबईत राहून आपले काही करू शकले नाही, याची आठवण करून देत त्यांनी पवारांना एकप्रकारे आव्हानच दिले. यानंतर पवार व राणे समर्थकांची ट्विटरवर खडाजंगी उडाली. एकमेकांच्या उखळ्या पाखळ्या काढण्यात आल्या. पवार समर्थक ‘कुक्कुटपालना’वरून राणेंवर तुटून पडले.

ना.तनपुरे म्हणाले, आम्ही सभ्य…पण !
या ट्विटर वादात ना.प्राजक्त तनपुरे यांनी रविवारी दुपारी उडी घेतली. आ.रोहित पवार यांनी सभ्य भाषेत मत व्यक्त केले होते. पवार कुटुंबाच्या अंगी असलेल्या सुसंस्कृतपणामुळे आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते त्यांच्यावर प्रेम करतात. मात्र राष्ट्रवादीच्या टप्प्यात आल्यावर कार्यक्रमही करतात, असा इशारा त्यांनी राणेंचे नाव न घेता दिला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com