अंतिम सेवाजेष्ठता यादी जाहीर

0
जिल्हा परिषद; 11 हजार शिक्षकांचा समावेश

अहमदनगर (प्रतिनिधी) – केंद्रप्रमुख, विस्तारअधिकारी, मुख्याध्यापक पदावर पदोन्नतीसाठी जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील 11 हजार शिक्षकांचा समावेश असलेली अंतिम सेवाजेष्ठता यादी जाहीर केली आहे. यादी जाहीर झाल्याने आता पदोन्नतीच्या प्रक्रियेला वेग येणार आहे. पारनेर तालुक्यातील शिक्षकांच्या पदोन्नत्यांच्या याद्यामध्ये घोळ झाला असून हा घोळ मिटल्यानंतर तातडीने पदोन्नती देण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिली.
10 जून 2014 रोजीच्या परिपत्रकानुसार केंद्रप्रमुख व विस्तारअधिकारी या पदांच्या सेवाप्रवेश नियमात बदल करण्यात आला होता. पदोन्नतीच्या अनुषंगाने त्यावेळी गटशिक्षणाधिकारी कार्यालयांकडून जेष्ठता यादी करिता शिक्षक संवर्गातील कर्मचार्‍यांची माहिती मागविण्यात आली होती. या माहितीवरून तात्पुरती जेष्ठता यादी यावर्षी मार्च महिन्यात प्रसिद्ध करण्यात आली होती. या यादीवर 31 मार्च अखेर हरकती मागविण्यात आल्या होत्या.
यादीत समाविष्ठ असलेले कर्मचारी व प्राप्त हरकतींनुसार गटशिक्षणाधिकार्‍यांनी सर्व कर्मचार्‍यांच्या मूळ सेवा पुस्तकावरून पडताळणी केली. त्यावरून आवश्यक ती दुरुस्ती मुख्य कार्यकारी अधिकारी बिनवडे यांच्या सूचनेवरून करण्यात आली आहे. दुरुस्त्या झाल्यावर ही यादी अंतिम करण्यात आली. यंदा 291 शिक्षकांना पदोन्नती देण्यात येणार आहे. विस्तारअधिकारी, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांच्या जवळपास 300 जागा जिल्ह्यात रिक्त आहेत.

शिक्षकांना या जागेवर पदोन्नती देण्याची गरज होती. आता सेवाजेष्ठतेनुसार पात्र शिक्षकांना विस्तारअधिकारी, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख अशा नियुक्त्या दिल्या जातील. या शिक्षकांना पदोन्नती दिल्याने प्राथमिक शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त होणार आहेत. बाहेरच्या जिल्ह्यात असलेल्या प्राथमिक शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात नियुक्ती देण्याचा प्रशासनाचा विचार आहे. जिल्ह्यातील शिक्षकांच्या रिक्त जागा भरून त्यामुळे निघण्यास मदत होणार आहे.
विस्तारअधिकारी श्रेणी 1 पदाच्या 21 जागा, श्रेणी 2 च्या 2 जागा, केंद्रप्रमुखांच्या 100 तर मुख्याध्यापकांच्या 168 जागांवर पदोन्नती देण्यात येईल. शिक्षकाने पदोन्नतीला नकार दिल्यास सेवाजेष्ठतेनुसार पात्र असलेल्या त्यापुढील शिक्षकास पदोन्नती देण्यात येईले, प्राथमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

*