Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

अखेरच्या दिवशी तोफगोळे !

Share

नेत्यांकडून एकमेकांवर निशाणा : आता गाठी‘भेटीं’वर भर

अहमदनगर (प्रतिनिधी)– महिन्याभरापासून सुरू असलेली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शनिवारी संध्याकाळी सहा वाजता थंडावली. राष्ट्रीय, राज्यातील नेत्यांच्या आणि उमेदवारांच्या प्रचारसभा, प्रचारफेर्‍या, दुचाकी रॅली आदींनी जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. उमेदवार आणि नेत्यांना मतदारांच्या भेटी‘गाठी’, गुप्त खलबत व संपर्कासाठी रविवारचा दिवस मिळणार आहे. सोमवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान होणार आहे. दरम्यान, प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शनिवारी नेत्यांनी एकमेकांवर जोरदार हल्लाबोल केला.

शरद पवारांनी पालकमंत्री राम शिंदेंवर, ना. राधाकृष्ण विखेंनी पवार-थोरातांवर, प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरातांनी विखे पिता-पुत्रावर तर खा. सुजय विखेंनी पवार-थोरातांवर तर युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी खा.विखेंवर साधलेला निशाणा चर्चेत राहीला. सोबतच आपापल्या मतदारसंघात प्रतिस्पर्ध्यांवर शेवटचा शाब्दिक हल्ला चढविण्यासाठी प्रत्येक उमेदवाराने प्रचाराचा अखेरचा दिवस सत्कारणी लावला.

मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून सोमवारी जिल्ह्यातील 12 मतदारसंघात निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने मोठी तयारी केली आहे. ईव्हीएमच्या वापरासंबंधीचे तांत्रिक प्रशिक्षण सरकारी अधिकारी-कर्मचार्‍यांना देण्यात आले आहे. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठीही सरकारी पातळीसह विविध सामाजिक संस्था-संघटनांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. मतदानासाठी केवळ एक दिवसांचा कालवधी उरला असल्याने सर्व यंत्रणा मतदान केंद्रावर पोहोचवण्याची तयारी सुरू आहे. राजकीय पक्ष आणि उमेदवारांसाठी उरलेले 24 तास महत्त्वाचे असणार आहेत. मतदारांना मतदान चिठ्ठ्या पोहोचवण्याचे काम अनेक उमेदवारांनी पूर्ण केले आहे. उरलेल्या काही तासांत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा आणि बुथ यंत्रणा कामाला लावण्याचा उमेदवारांचा प्रयत्न आहे.

प्रतिबंधात्मक आदेश जारी
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था उत्तम राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. आवश्यक पुरेसा बंदोबस्तही जिल्ह्यासाठी प्राप्त झाला आहे. याशिवाय, आर्म अ‍ॅक्ट अंतर्गत शस्त्र परवानाधारकांकडून शस्त्रे जमा केली आहेत. समाजकंटकांवर कारवाई करण्यात आली आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 अन्वये जिल्हा महसूल हद्दीच्या कार्यक्षेत्रात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

34 लाख 73 हजार 743 मतदार
जिल्ह्यातील 12 मतदारसंघात 34 लाख 73 हजार 743 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात 18 लाख 7 हजार 853 पुरूष, तर 16 लाख 65 हजार 733 स्त्री मतदार आहेत. लोकसभेसाठी जिल्ह्यात 34 लाख 38 हजार 551 मतदार होते. त्यानंतरच्या पाच महिन्यांत प्रशासनाने राबवलेल्या मतदार नोंदणी अभियानातून मतदारांची संख्या वाढली. नोंदणीस प्रतिसाद मिळावा म्हणून विशेष मतदार नोंदणी अभियानही राबविले. शाळा-महाविद्यालयांत विशेष जनजागृतीद्वारे मतदार नोंदणीसाठी प्रयत्न केले. सर्व प्रक्रिया झाल्यानंतर 31 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालये, पंचायत समिती, जिल्हा परिषद, तसेच ग्रामपंचायतीत ही अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीनुसार जिल्ह्यात 34 लाख 68 हजार 522 मतदार झाले. निरंतर मतदार नोंदणीअंतर्गत त्यानंतरही मतदारनोंदणी अभियान सुरू होते. विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत नोंदणी सुरू होती. त्यानंतर 5 ऑक्टोबरला पुरवणी यादीसह अंतिम मतदारयादी प्रशासनाकडे प्राप्त झाली.

रंगतदार सामना
जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघांमध्ये 2014 च्या निवडणुकीत भाजपचे पाच आमदार निवडून आले होते. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रत्येकी 3, सेनेचा 1 आमदार झाला होता. यंदाच्या निवडणुकीत प्रारंभी नीरस ठरलेली निवडणूक अंतिम टप्प्यात चांगलीच रंगतदार झाली आहे. बहुतांश मतदारसंघांत दुरंगी लढत आहे. आपापल्या मतदारसंघात नेत्यांंनी जोरदार प्रचारयंत्रणा राबविली. एकमेकांवर जबरदस्त राजकीय चिखलफेक झाली. स्थानिक नेत्यांनी प्रचारात स्थानिक मुद्द्यांवर चर्चा केली. मात्र राजकीय पक्षांकडून भावनिक मुद्देच अधिक चर्चेत आणले गेले. जिल्ह्यात भाजपा आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी 8 तर सेना व काँग्रेसचेे अनुक्रमे 4 व 3 उमेदवार रिंगणात आहेत. वंचित आघाडीसह अपक्षांनी मुख्य राजकीय पक्षांना आव्हान दिले आहे.

कर्जतमध्ये ‘राम’ राहिला नाही

शरद पवार : शेतकर्‍यांची सरकारकडून हेळसांड

कर्जत (तालुका प्रतिनिधी) – कर्जत-जामखेड मतदारसंघात भाजप उमेदवार राम शिंदे यांच्यामध्ये आता काही ‘राम’ राहिला नाही, असे आता मतदारच सांगू लागले आहेत. मुख्यमंत्र्यांना येथे तीनवेळा यावे लागते, यावरूनच सर्व लक्षात येते, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कर्जत येथे सांगता सभेत टीका केली.

कर्जत येथे निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी झालेल्या सभेत ते बोलत होते. पवार म्हणाले, मी पहिली विधानसभेची निवडणूक बारामतीमधून लढलो, त्यावेळी रोहितच्या वयाचा होतो. तिथे त्यावेळी काहीच नव्हते. कर्जत-जामखेड सारखी परस्थिती त्यावेळी बारामतीत होती. मात्र, आज बारामतीमध्ये विकास पाहण्यासाठी सर्वजण येतात. तसेच रोहित पवार यांच्या पाठीशी राहिलात तर पुढील काळात या मतदारसंघाचा विकास पाहण्यासाठी पंतप्रधान देखील येतील. राम शिंदे यांच्यामध्ये आता ‘राम’ राहिला नसल्याचे आता मतदारच म्हणत आहेत. यामुळेच मुख्यमंत्र्यांना तीनवेळा येथे यावे लागले. युवकांनी ही निवडणूक हातामध्ये घेतल्यामुळे परिवर्तन होणार यात्री मला खात्री आहे.

पवार म्हणाले, राज्यात 16 हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकरी कर्जबाजारी झाला असून, त्यांच्या कष्टाची किंमत सरकारला नाही. राज्यात मंदी आहे, अनेक कारखाने बंद पडले आहेत. कामगार आणि कर्मचारी यांच्यावर बेरोजगारीमुळे उपासमारीची वेळ आली आहे. यास मुख्यमंत्री जबाबदार असल्याने त्यांना मते मागण्याचा आधिकार नाही.

सरकारला घाम फुटला

प्रदेशाध्यक्ष थोरात : जनता राहात्याचे मॉडेल ओळखून

संगमनेर (प्रतिनिधी) – भाजपा-सेना फक्त भाषणबाजी व जाहिरातबाजी करत आहेत. ते विकासावर आणि महाराष्ट्रातील समस्यांवर बोलत नाही. आता सर्वत्र वातावरण पूर्ण बदललेले असून सरकारला आता घाम फुटला आहे. दिल्लीच्या फौजा प्रचारासाठी राज्यात आल्या आहे. पण संगमनेरातील स्वाभिमानी माणूस त्यांना भीक घालणार नाही, असे राहाता तालुका कशाचे मॉडेल आहे, हे सर्वांना माहित आहे, असा टोला त्यांनी ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेता लावला.

महाआघाडीतर्फे आयोजित सभेत बोलताना आ. थोरात यांनी सरकार आणि विखे यांच्यावर हल्लाबोल केला. जनतेच्या प्रेमाच्या बळावर आपल्याला राज्यात काम करण्याची संधी मिळाली असून आपण अविरतपणे काम केले. सक्षम विकासातून तालुका पुढे नेला. आजही संगमनेर तालुक्याचा राज्यात विकासात एक नंबर लागतो. मात्र काहींना तो पाहावत नाही. काँग्रेस वाल्यांनी काय केले हे ते विचारतात. तुम्ही तर 65 वर्षे काँग्रेसमध्ये होते. त्यामुळे हा प्रश्न त्यांनी विचारु नये. राहाता तालुका हे कशाचे मॉडेल आहे हे सर्वांना माहीत आहे. त्यांची काँग्रेसचे सुरेश थोरात यांनी दमछाक केली. तरुण खासदार येथे येऊन भूलथापा देतात. तुमच्या आजोबांनी 35 वर्षे काय काम केले ते सांगा. संगमनेरची जनता स्वाभिमानी आहे. येथे द्वेषाचे राजकारण नाही. आजचा अभूतपूर्व उत्साह आहे, असे ते म्हणाले.

काँग्रेसची गिनतीच नाही !

ना. विखे : महायुतीला 220 जागा निश्चित

शिर्डी (प्रतिनिधी) – राज्याच्या निवडणुकीत काँग्रेसची गिनतीच नाही. आजूबाजूच्या मतदारसंघांत झालेल्या दमछाकीमुळे हे स्पष्ट झाले आहे, असा टोला ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष थोरात यांचे नाव न घेता लगावला आहे. त्यांनी गोदावरीच्या पाण्यावरून शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला.

अस्तगाव येथील सांगता सभेत ना. विखे यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. विधानसभेची ही पहिली निवडणूक आहे, जिचा निकाल स्पष्ट झाला आहे. भाजप महायुतीला राज्यात 220च्या पुढेच जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त करून ना. विखे पाटील म्हणाले, काँग्रेसची तर आता गिनतीच नाही. राष्ट्रवादीचे लोक फिरतात पण ते कधी पाणी प्रश्नावर बोलतच नाही. कोपरगावला आले भाषण केले पण गोदावरीच्या पाण्याचा विषयच काढला नसल्याची टीका त्यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली. आजूबाजूच्या मतदारसंघात उमेदवारांची दमछाक सुरु आहे. काही जण निळवंडेसाठी व आपल्याला बदनाम करण्यासाठी पाण्यात देव बुडवून बसले होते. त्यांना आपण कामाच्या माध्यमातून उत्तर दिले आहे, असे ते म्हणाले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!