दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईदचा गुरुग्राममधील बंगला जप्त

0
नवी दिल्ली : लष्कर-ए- तोयबा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि २६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद याच्याशी संबंधित मालमत्तांवर आता टाच आली आहे. हाफिज सईदला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दणका दिला असून त्याच्या लष्कर-ए- तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित हरियाणातील गुरुग्राममधील बंगला जप्त केला आहे.

माहितीनुसार हाफिज सईदने काश्मीरमधील उद्योजक जहूर अहमद शाहर वटाली याच्या मदतीने गुरुग्राममध्ये बंगला विकत घेतला होता. या बंगल्यासाठीचे पैसे सईदने फलाह-ए- इन्सानियत फाऊंडेशन (एफआयएफ) या संस्थेच्या माध्यमातून उभे केल्याचा संशय ईडीला आहे. जहूरला गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये दहशतवादाला आर्थिक रसद पुरवल्याप्रकरणी अटक झाली होती. त्याच्या चौकशीतून हाफिज सईदच्या मालमत्तेचा उलगडा झाला.

बंगल्यासाठीचे पैसे यूएईतून हवालामार्गे भारतात आल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. हाफिज सईदने बनावट नावांचा वापर करुन भारतात तब्बल 24 ठिकाणी मालमत्ता खरेदी केल्याचे ईडीच्या तपासातून समोर आले आहे. उर्वरित मालमत्तांवरही लवकरच जप्तीची कारवाई केली जाईल, असे ईडीतील सूत्रांनी सांगितले. मालमत्तेच्या खरेदीसाठी वापरण्यात आलेल्या बँक खात्यांचा तपशीलही ईडीने गोळा केल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानवर भारतासह जगभरातून दबाव वाढत आहे. याच दरम्यान मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईद याच्या जमात- उद- दावा आणि त्याची चॅरिटी असलेल्या फलाह-ए-इन्सानियत फाऊंडेशनवर बंदी घातली आहे.

LEAVE A REPLY

*