Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

शेतकर्‍याला लाच मागणारा लिपिक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

Share

श्रीरामपूर भूमिअभिलेख कार्यालयातील कारवाई

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – जमिनीच्या मोजणीची तारीख देण्यासाठी 10 हजारांची लाच स्वीकारणार्‍या श्रीरामपूर येथील उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयातील छाननी लिपिकास नाशिक व नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. बाबूराव यादवराव राशिनकर (रा. वॉर्ड नं. 7, कौशिक अपार्टमेंट, श्रीरामपूर) असे लाचप्रकरणी ताब्यात घेतलेल्या कर्मचार्‍याचे नाव आहे.

टाकळीभान येथील तक्रारदार शेतकर्‍याची श्रीरामपूर तालुक्यातील भोकर शिवारातील शेतजमीन बिगर शेती करून घेणे असल्याने त्याची मोजणी होऊन नकाशा मिळण्यासाठी 30 जून 2019 रोजी श्रीरामपूर येथील भूमिअभिलेख कार्यालयाकडे अर्ज केला होता व त्यासाठी लागणारी फी चलनाने भरलेली होती. परंतु ती मोजणी भूमिअभिलेख कार्यालयाकडून रद्द ठरविण्यात आली. त्यामुळे संबंधित तक्रारदार शेतकर्‍याने श्रीरामपूर येथील भूमिअभिलेख कार्यालयातील छानणी लिपिक बाबुराव राशिनकर यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी पुन्हा तातडीने चलन भरुन 20 हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे तक्रारदार शेतकरी याने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक सुनिल कडासने यांच्याशी संपर्क करुन याबाबत तक्रार केली होती.

या तक्रार अर्जाची दखल घेत नगर व नाशिक विभागाच्या कर्मचार्‍यांच्या पथकाने काल पहाटेच श्रीरामपूर उपअधिक्षक भूमि अभिलेख कार्यालय परिसराची पाहणी करुन सापळा रचला. त्यानुसार संबंधित शेतकरी दुपारी 12 वाजेच्या सुमारास भूमि अभिलेख कार्यालयात आले. त्यावेळी शेतकर्‍यांकडून छानणी लिपिक बाबुराव राशिनकर हे 10 हजार रुपये रोख रक्कम स्विकाराताना आढळून आल्याने लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. सदर कारवाई नाशिक लाचलुचपत विभागाचे पोलीस अधिक्षक सुनिल कडासने, अप्पर पोलीस अधिक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक हरिष खेडकर, पोलीस निरीक्षक श्याम पवरे, पोलीस निरीक्षक दिपक करंडे, पोहेकॉ. तनवीर शेख, पो.ना. प्रशांत जाधव, पो.ना. रमेश चौधरी, पो.कॉ. रविंद्र निमसे, चालक अशोक रक्ताटे आदींनी केली.

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!