ललित – ‘सुतळी बाँब’ची चाचणी झाली ती गोष्ट

0

अणुबॉम्बच्या चाचणीच्या बातम्या आपल्या कानावर कुठून ना कुठून येत असतात. पण सुतळी बॉम्बच्या चाचणीची ही गोष्ट त्यापेक्षाही विलक्षण  आहे.

आवाज करणाऱ्या फटाक्‍यांची मला लहानपणापासूनच भीती वाटत आलीय. त्यातले त्यात सुतळी बॉम्ब सारखे प्रकार माझ्या दृष्टीने फारच भयानक. साधारणपणे हायस्कूलात जायला लागल्यावर मी लवंगी फटाके उडविण्याचे धैर्य करू लागलो. त्याची पद्धतही मोठी सुरक्षित होती.

एका कागदावर एका टोकाला लवंगी फटाका ठेवायचा आणि तो कागद दुसऱ्या टोकाने पेटवायचा. (त्यामुळे होतं काय? की फटाक्‍याच्या वातीपर्यंत आग येऊन तो पेटण्यास साहजिकच वेळ लागतो आणि आपल्याला त्या ठिकाणाहून सुरक्षित जागी पळून जाऊन कानात बोटे घालण्यासाठी वेळ मिळतो.) साधारणपणे सातवीत येईपर्यंत ही पद्धती वापरुन लवंगी फटाक्‍यांबरोबरच मोठमोठे लक्ष्मी बॉम्ब उडवायला शिकलो होतो. याच कालावधीत दिवाळी संपल्यानंतर सुतळीबॉम्ब फोडल्यानंतर फारच विलक्षण अनुभव माझ्या वाट्याला आला.

तर घडले असे, डोंबिवलीच्या घनदाट पद्धतीने बांधलेल्या इमारत कम चाळीत माझा मामा राहत होता. आम्हा भाच्यांवर त्याचा प्रचंड जीव. त्याचाच एक भाग म्हणून दिवाळीत तो बऱ्यापैकी फटाके आणायचा. त्यात आवाज करणारे फटाके तसे कमीच असायचे.

पण त्या वर्षी मात्र त्यात चुकून भल्या मोठ्या आकाराच्या सुतळी बॉम्बचे एक पाकीट आले. त्या भागाची स्थिती अशी होती की तिथे सुतळी बॉम्ब उडवायचे म्हणजे इमारतीची एखादी भिंत पडण्याची भीती ! मग मामा म्हणाला की हे तू गावी गेल्यावर उडव. त्यानुसार सुटी संपल्यानंतर मी ते सुतळी बॉम्ब माझ्याबरोबर गावी आणले.

शाळा सुरु होऊन एक आठवडा झाल्यानंतर मला सुतळीबॉम्ब वाजविण्याची हुक्की आणि हिंमत आली. मग सुतळीबॉम्ब उडवीण्यासाठी दुसऱ्यादिवशी सायंकाळची वेळ ठरविली. आणि हो,जागाही ठरविली – शाळेसमोर असलेली माळरानवजा मोकळी जागा !

दुसऱ्या दिवशी सायंकाळी एका शाळासोबत्याला घेऊन सुतळीबॉम्बसह मी ते मैदान गाठले. सोबत लांबलचक कागद होताच. स्वतंत्रपणे स्वत: सुतळीबॉम्ब उडविणे ही दोघांच्याही आयुष्यातीली पहिलीच घटना होती. त्यामुळे माझ्या मनात एक प्रकारची भीतीही होती. माझा सोबती मात्र बऱ्यापैकी हिम्मतवाला होता. आणि त्याआधारे सुतळीबॉम्ब पेटविण्याच्या मोक्‍याच्या प्रसंगी तो मला धीर देत होता.

साधारणपणे एक वर्ग किलोमीटर आकाराचे ते मैदान होते, त्यामुळे पळायला भरपूर वाव होता. माझ्या पद्‌धतीप्रमाणे लांब कागदाच्या एका टोकाला सुतळीबॉम्ब ठेवून, कागदाचे दुसरे टोक आम्ही पेटविले आणि ज्या वेगाने शक्‍य होईल त्या वेगाने मैदाच्या दुसऱ्या भागात जीव घेऊन पळालो आणि योग्य अशा सुरक्षित जागी उभे राहिलो. आता बॉम्ब कधीही फुटणार होता. किती मोठा आवाज होणार? वगैरे भीतीने माझ्या हृदयाचे ठोके वेगाने पडत होते.

शेवटी एकदाचा तो बॉम्ब फुटला आणि त्याठिकाणी एक मोठा आगीचा गोळा आम्हाला दिसला. क्षणभर डोळे दिपले. परंतु आवाज मात्र आला नाही. ज्या अर्थी आवाज आला नाही त्या ते सर्व सुतळीबॉम्ब फुसके असल्याचा आम्ही निष्कर्ष काढला. त्यामुळे एक गोष्ट बरी होती की आता मी घरापुढील अंगणात ते सुतळीबॉम्ब उडवू शकणार होतो.

शनिवारी आमची सकाळची शाळा असायची आणि दुपारी सुटी असायची. शनिवारी चार-पाचच्या समोर घरासमोर सुतळीबॉम्ब उडविण्याचा विचार पक्का केला. आम्ही राहत होतो त्या घराची रचना अशी होती. संपूर्ण घर मातीचे होते. घरासमोर साधारण वीस – पंचवीस फुट लांबीचा चिंचोळ्या आकाराचा ओटा किंवा अंगण होते.

अंगण संपल्यानंतर त्या गावातील बऱ्यापैकी वर्दळीचा छोटासा रस्ता आणि त्या पलीकडे हेअर कटींग सलूनची तीन दुकाने होती. रस्त्यावरून लांब उडी मारली की कमी श्रमात आणि फारच कमी वेळात कटींगसाठी समोरच्या दुकानात जाता येत असल्यामुळे मला या दुकानांचा त्यावेळी फार अभिमान होता. कारण येथे कटींग करण्यासाठी बरोबरच्या मुलांना दूरवरुन यावे लागे.

या दुकानात नाना नावाच्या भल्या गृहस्थांचे त्यातले त्यात बऱ्यापैकी सजविलेले दुकान होते. नाना पन्नाशीत असले तरी त्यांच्याशी माझी चांगली मैत्री होती आणि गप्पा मारण्यासाठी व पेपरची लहानमुलांची पुरवणी वाचण्यासाठी मी त्यांच्या दुकानी अधूनमधून जात असे. सकाळी आणि सायंकाळी या दुकानावर सतत गर्दी असे आणि आमच्या घराच्या दारातून जेव्हा बघू तेव्हा कोणाची दाढी किंवा कोणाची कटींग करताना नाना नजरेस पडत असत. असो तर मी अंगणाच्या रस्त्याकडील टोकाला सुतळीबॉम्ब उडविण्याचे ठरविले.

सायंकाळची वेळ होती. नानांच्या दुकानात नेहमीसारखी गर्दी होती आणि तेही बऱ्यापैकी कामात गढलेले होते. त्यामुळे त्यांना ही सुतळीबॉम्बची गोष्ट मी सांगितली नाही. तसं सांगितले असते तर त्यांनी माझ्या मदतीला माझ्यापेक्षा खूपच मोठ्या असलेल्या दोन मुलांपैकी एकाला पाठविलेही असते. परंतु सुतळी बॉम्ब फुसके असल्याने कोणाची मदत घेतली तर आपली प्रतिष्ठा खालावेल म्हणून मीच सुतळीबॉम्ब पेटवायचे ठरविले. आणि नेहमीच्या “कागद’ पद्धतीने सुतळीबॉम्ब पेटविला आणि बचावाचा उपाय म्हणून घराच्या दारात पळून आलो.

आता नुसताच उजेड दिसेल असे वाटले. पण या खेपेस तसे घडले नाही आणि जोरात धडाम्‌ऽऽ असा आवाज आला. धमाका फारच मोठा होता. अनपेक्षितरित्या आलेल्या या आवाजाने बरेच जण दचकले. अर्थात त्यात मीही होतो. पण त्यातून एक गोष्ट चांगली झाली आणि ती म्हणजे मी स्वावलंबीपणाने सुतळीबॉम्ब उडवू शकतो असा आत्मविश्‍वास आला.

ही घटना नंतर मी विसरुन गेलो. पण दुसऱ्या दिवशी सायंकाळी बाहेरुन आल्यावर वडील माझ्यावर बऱ्यापैकी चिडले. पण मी काय केले? असा मला प्रश्‍न पडला. “तू गल्लीत सूतळीबॉम्ब फोडला म्हणून समोरचे नाना सांगत म्हणाले’ त्यांची आगपाखड सुरु झाली. ” पण, मी तर आपल्या अंगणात फोडला होता.

यात त्यांचा संबंध कुठे येतो?’ माझे स्पष्टीकरण. ” ते सगळं ठिक आहे, पण त्याचा जो आवाज झाला त्यामुळे ते दचकले आणि गिऱ्हाईकाची दाढी करताना त्यांच्या हातून वस्तरा सटकला ना ! ‘ वडीलांनी खरे कारण सांगितले. त्यांच्या चिडण्यामुळे मी नाराज झालो. मात्र तरीही समोरचे नाना ग्राहकाची मन लावून दाढी करताहेत आणि अचानक मोठा धमाका होऊन त्यांच्या हातातून वस्तरा सटकतो… मग त्या ग्राहकाचे काय झाले असेल? ही कल्पना डोळ्यासमोर लढवून मी बाजूला जाऊन पोटभर हसून घेतले. झाल्या प्रकाराने आधी रागावलेले वडीलही नंतर बऱ्यापैकी हसत होते.

मी मात्र या घटनेतून बोध घेतला. बॉम्ब खरा असो की सुतळीबॉम्ब त्याची चाचणी घेतल्यावर विलक्षण हंगामा होतो.

  • पंकज जोशी (digi.edit1@deshdoot.com)

LEAVE A REPLY

*