Thursday, May 2, 2024
Homeनाशिकमुसळधार पावसामुळे पाझर तलाव फुटला

मुसळधार पावसामुळे पाझर तलाव फुटला

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

गत सात ते आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ( Heavy Rain) नदी-नाल्यांना मोठे पूर आले असून तालुक्यातील देवारपाडे-नाळे ( Devarpade- Nale ) या गावांसाठी वरदान ठरलेला खिर्डी नाल्यावरील पाझर तलाव अतीवृष्टीने फुटून लाखो लिटर पाणी वाहून गेले. फुटलेल्या तलावाचे हे पाणी तलावाच्या खाली असलेल्या शेतात घुसल्याने कापसासह मका, बाजरी, भुईमूग व तुर पिकाची अतोनात हानी झाली. शेतजमीनीची मातीच पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे वाहून गेल्याने शेतकर्‍यांचे लक्षावधी रूपयांचे नुकसान झाले आहे.

- Advertisement -

गत दोन वर्षापासून मुसळधार पाऊस होत असल्याने तलाव तुडूंब भरून ओव्हरफ्लो होत होता. त्यामुळे मातीच्या या पाझर तलावाची उंची वाढवावी, अशी मागणी केली जात होती. मात्र संबंधित विभागाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आपद्ग्रस्त शेतकर्‍यांनी पत्रकारांशी बोलतांना केला.

तालुक्यातील नाळे व देवारपाडे गावाला जोडणार्‍या खर्डी नाल्यावर 1982 मध्ये पाझर तलावाची निर्मिती शासनातर्फे करण्यात आली आहे. या पाझर तलावामुळे नाळे व देवारपाडे येथील शेतकर्‍यांचा जनावरांचा पिण्याचे पाणी तसेच शेतीसिंचनाचा प्रश्न देखील सुटला होता. या भागात पुर्वी मुसळधार पर्जन्यवृष्टी होत नसल्याने मातीच्या पाझर तलावास धोका निर्माण झाला नव्हता. .

मात्र गत दोन वर्षापासून या भागात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असल्याने हा तलाव तुडूंब भरून वाहत होता. तलाव भरल्यानंतर देखील मुसळधार पाऊस होत असल्याने पाण्याचा दबाव वाढून तलावास धोका निर्माण होत असल्याचे शेतकरी व ग्रामस्थांच्या लक्षात आले होते. यामुळे दोन वर्षापासून या तलावाची उंची वाढवावी अशी मागणी सातत्याने केली जात होती. मात्र या मागणीची दखल संबंधित विभाग अथवा लोकप्रतिनिधींतर्फे घेण्यात आली नसल्याची तक्रार शेतकर्‍यांनी बोलून दाखवली.

गत सात-आठ दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पाझर तलाव पाण्याने तुडूंब भरले. मात्र संततधार सुरूच असल्याने पाण्याचा वेग वाढल्याने दबावामुळे मातीने बांधण्यात आलेला हा पाझर तलाव फुटला. यामुळे लाखो लिटर पाणी तलावातून बाहेर पडून तलावालगत असलेल्या शेतांमध्ये घुसले. पाण्याचा वेग मोठ्या प्रमाणात असल्याने शेतात उभी असलेली कापणीयोग्य कापसासह मका, बाजरी, भुईमूग व तुर पिके वाहून गेली. तर अनेक शेतातील पिकांसह मातीच वाहून गेली तर काही शेतकर्‍यांच्या विहिरीच पाणी व मातीने बुजल्या गेल्या.

पहाटे तलाव फुटून झालेल्या पिकांच्या वाताहतीचे दृष्य दिसताच शेतकरी अक्षरश: हताश झाले आहेत. हातातोंडाशी आलेला घास फुटलेल्या तलावाच्या पाण्यात वाहून गेल्याने मनीष सूर्यवंशी, सुधाकर सरोदे, भिकन गुढे, देवबा म्हस्के, भरत चिकणे, नितीन सरोदे, रामा म्हस्के, साहेबराव म्हस्के, बाळू म्हस्के आदींसह अनेक शेतकर्‍यांचे लक्षावधी रूपयांचे नुकसान झाले आहे. तलावाची उंची वाढविली असती तर आजचे नुकसान टळले असते. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करत नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आपद्ग्रस्त शेतकर्‍यांनी केली आहे.

पाझर तलाव फुटून शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळताच प्रांत विजयानंद शर्मा, शिवसेना युवानेते अजिंक्य भुसे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करीत तलावाची त्वरीत दुरूस्ती करावी, असे निर्देश बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे यांनी प्रांत शर्मा यांना दिले आहेत.

दरम्यान, भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश नाना निकम यांनी देवारपाडे, नाळे, शेंदुर्णी येथे भेट देत अतीवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. धरण फुटल्याने नाळे व देवारपाडे येथील शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात डाळींबासह कपाशी, मक्का, कांदा पिके तसेच सुपीक माती देखील वाहुन गेली असल्याने जमीन नापीक झाली आहे. सदर धरण फुटल्याने पाणी साठा संपल्याने भविष्यात पाण्याची मोठी अडचण भासण्याचे चिन्हे दिसत आहे. त्यामुळे या धरणाची त्वरीत दुरूस्ती करावी, अशी मागणी निकम यांनी अधिकार्‍यांकडे केली. यावेळी देवा पाटील, एकनाथ लांबखेडे, मनीष सूर्यवंशी, श्याम गांगुर्डे, स्वप्नील भदाणे यांच्यासह आपद्ग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या