कुकडी परिवाराचा आधारवड हरपला

0

कुकडीचे अध्यक्ष कुंडलिकराव जगताप यांचे निधन; आज अंत्यविधी

 

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – तालुक्यातील पिंपळगावपिसा येथील लमाण बाबांच्या माळावर सहकारी तत्वावर तालुक्यातील दुसरा साखर कारखाना उभा करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करून कुकडी सहकारी साखर कारखान्याचे स्वप्न साकार करणारे नगर जिल्ह्याच्या समाजकारण, राजकारण, सहकार क्षेत्रात प्रभावीपणे काम करणारे कुंडलिकराव जगताप (तात्या) यांचे कोईमतुर येथे उपचारा दरम्यान निधन झाल्याने श्रीगोंदा तालुका शोकमग्न झाला. त्यांच्या मागे पत्नी अनुराधा, मुलगा आमदार राहुल यांच्यासह अश्‍विनी देशमुख, मनीषा काळे, जयश्री काळे व सुजाता सोले या मुली तसेच तीन भाऊ, एक बहीण, पुतणे, पुतण्या असा मोठा परिवार आहे.

 

कुकडीचे संस्थापक कुंडलीकराव जगताप हे मागील काही वर्षांपासून मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. त्यावरील उपचारासाठी त्यांना तामिळनाडूतील कोईमतूर येथील कोवई मेडिकल सेंटर व हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार चालू असतानाच काल दि. 15 रोजी सकाळी 10.30 वाजता हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचे निधन झाले. त्यावेळी त्यांचे पुत्र आमदार राहुल, पत्नी अनुराधा यांच्यासह जगताप यांच्या कन्या व जवळचे नातेवाईक त्यांच्यासमवेत होते. जगताप यांचे पार्थिव सोमवारी पहाटे विमानाने कोईमतूर येथून पुण्यात येईल. तेथून ते मोटारीने पिंपळगाव पिसा येथे आणण्यात येणार आहे.

 

 

पिंपळगाव पिसा परिसरातील शेतकर्‍यांच्या हितासाठी दीर्घकाळ संघर्ष करीत जगताप यांनी कुकडी सहकारी साखर कारखाची निर्मिती केली. राज्यातील उत्तम प्रशासन व देखभाल असलेल्या प्रमुख कारखान्यांमध्ये कुकडीचा समावेश आहे. अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी कारखान्याची सूत्रे स्वतःकडे ठेवली होती. त्यामध्ये कडक शिस्तीच्या माध्यमातून विस्तार करण्यावर त्यांनी भर दिला होता. सहकारी क्षेत्रात आशिया खंडात अग्रेसर असलेल्या नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही जगताप यांनी दीर्घकाळ काम पाहिले.

 

जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, कुकडी कारखाना संस्थापक, शिक्षण संस्था सुरुवात केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मधून मुलगा राहुल जगताप यांना आमदार करण्यासाठी तालुक्यातील सर्व विरोधकांना एकाच व्यासपिठावर आणून त्यांनी मुलाला आमदार करण्याचे स्वप्न पूर्ण केले. तालुक्याच्या राजकारणावर त्यांचा प्रभाव होता. गावोगावी कार्यकर्ते उभे करून कुकडी पाटपाण्याच्या प्रश्नासाठी त्यांनी लढा उभारला. त्यांच्या निधनाने तालुक्यात शोक व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

*