Wednesday, April 24, 2024
Homeनाशिककृउबातील हमाल मापारी कर्मचाऱ्यांना ओळखपत्र देण्याची मागणी

कृउबातील हमाल मापारी कर्मचाऱ्यांना ओळखपत्र देण्याची मागणी

पंचवटी | वार्ताहर
नाशिक बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर शेतीमालाची खरेदी व विक्री होत असून, लाखो रुपयांची उलाढाल होत असते. याठिकाणी काम करणारे हमाल व मापारी कर्मचारी कमी शिकलेले व झोपडपट्टीत राहणारे असल्याने, अनेकजण गुन्हेगारी क्षेत्राशी निगडित आहेत. गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीत शेतकऱ्यांना मारहाण करणे, त्यांची लूटमार करणे यासह मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. येथील हमाल मापाऱ्यांना समितीने ओळखपत्र देण्याची मागणी करणारे निवेदन विभागीय सहनिबंधक यांना जनता दल (सेक्युलर) सचिव डॉ. गिरीश मोहीते यांनी दिले आहे.
नाशिक कृषि उत्पन्न बाजार समिती अर्थकारणाचे केंद्र समजले जाते. याठिकाणी अनेक राजकीय क्षेत्रातील दिग्गज शिरकाव करण्यासाठी प्रयत्नशील असतात. रोजच्या रोज खेळता पैसा खिशात पडत असल्याने, पेठरोड, दिंडोरी रोड आदी भागात राहणाऱ्या झोपडपट्टीतील अशिक्षित, कमी शिकलेले स्त्री पुरुष काम करण्यासाठी येत असतात. येथील आडते, व्यापारी यांच्याकडे काम मिळवत आपला उदरनिर्वाह चालवितात. अशातच नाशिक बाजार समिती सुरवाती पासून गुन्हेगारीचा अड्डा बनले असून, बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांना रिंगण करून मारहाण करणे, त्यांची लूटमार करणे यासह मोबाईल चोरीच्या घटना नियमित घडत असतात.
कृउबातील हमाल मापारी यादीत वाढ होऊ नये याकरिता असे काम करणाऱ्या हमाल मापाऱ्यांना बाजार समिती सभासद करून घेत नसल्याचे या निवेदनात उल्लेख करण्यात आलेला आहे. याचा गैरफायदा जवळपास राहणारे गुंड प्रवृत्तीचे काहीजण उचलत बाजार समितीत हमाल व मापारी असल्याचे सांगून राजरोसपणे प्रवेश मिळवितात. या सर्व घटनांवर आळा बसण्यासाठी बाजार समिती मधील सर्वच हमाल मापारीचे काम करणाऱ्यांना तात्काळ ओळखपत्र देण्याची मागणी करणारे निवेदन सोमवारी (दि.३०) विभागीय सहनिबंधक कार्यालय, नाशिक शहर पोलीस आयुक्तालय कार्यालय तसेच पंचवटी पोलीसांना देण्यात आले आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या सर्व हमाल मापारी कर्मचाऱ्यांचे चारित्र्य पडताळणी देखील करावी असे या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते डॉ. गिरीश मोहीते यांनी स्वाक्षरी केलेली आहे.
- Advertisment -

ताज्या बातम्या