जिल्ह्यातील 88 हजार शेतकर्‍यांचा ‘कृषी संजीवनी’त सहभाग

0

 35 कोटी 15 लाख रुपयांचा भरणा

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्ह्यातील जवळपास 88 हजार शेतकर्‍यांनी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभाग नोंदवला. या शेतकर्‍यांनी त्यांच्या वीज बिलापोटी 35 कोटी 15 लाख रुपयांचा भरणा महावितरणकडे केला आहे. 

थकबाकीदार कृषीपंप ग्राहकांना वीजबिल भरणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी राज्य सरकारने नोव्हेंबरच्या सुरुवातीला मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना आणली. या योजनेद्वारे शेतकर्‍यांना त्यांच्या थकीत वीजबिलातील दंड व व्याज वगळून मूळ रकमेचे सुलभ हप्ते चालू बिलासह वर्षभरात भरण्याची सुविधा देण्यात आली.

शेवटच्या टप्प्यात योजनेला प्रतिसाद वाढविण्यासाठी 30 हजार रुपयांपेक्षा कमी थकबाकीसाठी तीन तर 30 हजारांपेक्षा अधिकच्या थकबाकीसाठी पाच हजार रुपये भरून योजनेचा लाभ देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. तसेच वीज बिलाबाबतच्या सर्वच शंकांचे निरसन करण्यासाठी डिसेंबर महिन्यात फिडरनिहाय कृषिपंप ग्राहकांच्या शिबिरांचेही नियोजन करण्यात आले.

योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत म्हणजेच 30 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील 87 हजार 649 कृषिपंप ग्राहकांनी महावितरणकडे भरणा केला आहे. एकूण थकबाकीदार कृषिपंप ग्राहकांच्या तुलनेत 25 टक्के ग्राहकांनीच योजनेत सहभाग नोंदविला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील 3 लाख 56 हजार 626 कृषिपंप ग्राहक मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेसाठी पात्र ठरले होते. त्यांच्याकडे वीज बिलाची 1 हजार 338 कोटी रुपये मूळ थकबाकी आहे. अंतिम मुदतीपर्यंत योजनेत सहभागी झालेल्या ग्राहकांची संख्या लक्षात घेता जिल्ह्यातील 2 लाख 69 हजार शेतकर्‍यांनी सुलभ हप्ते तसेच व्याज व दंडमाफीसह थकबाकीमुक्त होण्याची संधी गमावली आहे.

अहमदनगर मंडलातील विभागनिहाय आकडेवारी
(अनुक्रमे सहभागी कृषिपंप ग्राहक व जमा केलेली रक्कम)
अहमदनगर शहर: ग्राहक- 12 हजार 813,
भरणा- 5 कोटी 79 लाख,
अहमदनगर ग्रामीण: ग्राहक- 9 हजार 333,
भरणा- 3 कोटी 87 लाख,
कर्जत: ग्राहक- 8 हजार 655,
भरणा- 3 कोटी 18 लाख,
संगमनेर: ग्राहक- 28 हजार 304,
भरणा- 11 कोटी 79 लाख रुपये.
श्रीरामपूर: ग्राहक- 28 हजार 544,
भरणा- 10 कोटी 52 लाख,
अहमदनगर मंडल: एकूण ग्राहक- 87 हजार 649,
भरणा- 35 कोटी 15 लाख रुपये.

LEAVE A REPLY

*