‘कृषिथॉन’ने 350 जणांना रोजगार; इव्हेंट मॅनेजमेंटचे ज्ञान; कृषी विद्यार्थ्यांचे सानुभव अर्थार्जन

0
नाशिक । शहरात कुठलाही मोठा इव्हेंट असला तर त्यामध्ये लक्षणीय सहभाग असतो तरुणाईचा. मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या कृषिथॉन आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात कृषी महाविद्यालयातील सुमारे 350 हून अधिक विद्यार्थ्यांना ज्ञान, अनुभवासह अर्थार्जनाची नवी संधी उपलब्ध करून दिली.

अशा राष्ट्रीय प्रदर्शनामुळे शेतीविषयी नवे तंत्रज्ञान समजून घेता आलेच शिवाय इव्हेंट मॅनेजमेंटचा नवा अनुभव मिळाल्याच्या प्रतिक्रिया तरुणाईने दिल्या.

ठक्कर डोम येथे सुरू असलेल्या कृषिथॉन प्रदर्शनात शहरातील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वैविध्यपूर्ण अनुभव आणि ज्ञानाचे नवे आयाम गवसले. के. के. वाघ कृषी महाविद्यालयातील कृषी पदवीचे शिक्षण घेणार्‍या विशी-पंचवीशीतील तरुणाईला इव्हेंट मॅनेजमेंटसह स्टॉलवरील नवे कृषी तंत्रज्ञान, परिषदा, चर्चासत्र आणि व्याख्यानाच्या माध्यमातून ज्ञानाची नवी कवाडे उघडली.

कृषी अभियांत्रिकी, जैवतंत्रज्ञान, उद्यान विद्या, दुग्धव्यवस्थापन, अन्न तंत्रज्ञान आणि कृषी मालावर आधारित उद्योग प्रक्रिया या आणि इतर बाबींशी सर्व पैलू गेल्या पाच दिवसात मिळाल्याने या विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर वेगळा आत्मविश्वास दिसून आला.

प्रदर्शनाचा समारोप करिअर जत्रेने झाला. या दिवशीही कृषी विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील करिअरचे नवे क्षितिज गवसल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या.

इव्हेंट मॅनेजमेंट अनुभव : कृषिथॉनमध्ये मी प्रारंभीपासून काम करत होते. गेल्या पाच दिवसांत मला कृषी क्षेत्रातील दिग्गजांशी तसेच राजकीय नेत्यांशी भेटण्याचा योग आला. इव्हेंट मॅनेजमेंटचा अनुभव खूप शिकवून गेला. या प्रदर्शनाने आमच्या शिक्षणक्रमात शिकवल्या जाणार्‍या संकल्पना प्रत्यक्षात पाहावयास मिळाल्या. नवे तंत्रज्ञान, नॅनो टेक्नॉलॉजी, कृषी अवजारे याची माहिती मिळाली
– तुषार जाधव
विद्यार्थी, कृषी महाविद्यालय.

ज्ञानासह अर्थार्जन : कृषिथॉनमध्ये मला डाळिंब, द्राक्ष, दुग्धव्यवसाय, नर्सरी आदी चर्चासत्रे, परिसंवादातून उपयुक्त ज्ञान मिळाले. अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञान, सेंद्रीय खते, जैवतंत्रज्ञान याचे प्रात्यक्षिकातून ज्ञान मिळाले. अशा मोठ्या प्रदर्शनातून माहिती, ज्ञानासह अर्थार्जनचाही आम्हास फायदा झाला.
– संंकल्प मोरे
विद्यार्थी, कृषी महाविद्यालय.

LEAVE A REPLY

*