अहमदनगर (कर्मयोगिनी) : सौ. वंदना वसंत बंदावणे- संकटाचे केले संधीत रूपांतर

0

संगमनेर, जि. अहमदनगर
शिक्षणः – एम. ए., एम. एड, इंग्लिश, बी. जे. (इले), सी. जे. (प्रिंट)
कार्य – कारागृहातील कैद्यांचे मत परिवर्तन, महिला, मुली यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी कार्यरत, 
गट : सामाजिक

कुठलीही पार्श्‍वभूमी नाही….पाठबळ नाही…अशा परिस्थितीत शिक्षणाच्या जोरावर जिद्दीने संकटांचा सामना करत वंदनाताईंनी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रांत आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखविले. शिक्षिका म्हणून कार्यरत राहून विविध क्षेत्रांतील त्यांचा अभ्यास व कार्य तळागाळातील महिलांसाठी संजीवनी देणारा ठरला आहे. संकटातून संधी शोधणारे व्यक्तिमत्त्व कारागृहातील कैद्यांना प्रेरणादायी ठरलं. याची दखल राज्य शासनानेही घेतली आहे.

एखादी व्यक्ती संकटाचे संधीत रूपांतर कसे करू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे वंदनाताई होत. स्त्री असूनही संकट आल्यावर खचून न जाता त्यावर मात करून आपल्या कर्तृत्वाचे पैलू जगासमोर आणण्याचे धाडस वंदनाताईंनी केले. 1993 साली पतीच्या मदतीने कलाश्री चित्रकला महाविद्यालय ही शैक्षणिक संस्था चालू केली. तिच्या उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारुन ती संस्था अल्पवधीत महाराष्ट्रात नावारुपाला आणली.

सुखाचा संसार चालू असतानाच पतीला एका गुन्ह्यात अटक झाली. सात वर्षे पती कारागृहात असताना त्यांनी आपले नेहमीचे शैक्षणिक काम सांभाळून संसाराचा गाडा चालविला. पतीला भेटण्यासाठी वारंवार कारागृहात जावे लागे. तिथल्या लोकांशी व कारागृहातील मुलांची अवस्था बघून त्यांनी या मुलांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला व कारागृहात पतीच्या मदतीने संस्कार वर्ग सुरू केला. अनावधानाने गुन्ह्यात अडकलेल्या शेकडो मुलांचे त्यांनी मत परिवर्तन केले. घरातील व्यक्तीला अटक झाल्यावर सगळे कुटुंब हादरून जाते. अशा वेळी कुटुंबाचे समुपदेशन करणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते.

त्यासाठी पुण्याच्या शहर पोलीस आयुक्तालयाने अशा कुटुंबासाठी समुपदेशनाचे अनेक कार्यक्रम घेतले. त्यासाठी त्यांनी वंदनाताईंना वेळोवेळी पाचारण करुन त्या कुटुंबांना मार्गदर्शनाची संधी उपलब्ध करून दिली. ‘संवाद परिवर्तनाचा’ हा कार्यक्रम राज्यातील विविध कारागृहांमध्ये सातत्याने घेतला जात आहे. गुन्हेगारीपासून परावृत्त होण्यासाठी बंदिजनांचे व त्यांच्या कुटुंबाचे समुपदेशन करण्याचे मोठेकाम त्यांनी केले.

शैक्षणिक कार्यातही त्या सातत्याने अग्रेसर राहिल्या आहे. विज्ञान, कला, गणित प्रदर्शनात सातत्याने सहभाग घेऊन शाळेला व वैयक्तिक अनेक पारितोषिके त्यांनी मिळविली आहेत. दिल्ली येथील सीसीआरटी संस्थेच्या अभ्यासकामासाठी त्यांची कुरुक्षेत्र येथे निवड झाली होती. त्या इंग्रजी विषयाच्या अध्यापक असल्याने त्या संगमनेर तालुका इंग्रजी टिचर्स असोसिएशनच्या अध्यक्षा म्हणून तर माध्यमिक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा म्हणून सध्या कार्यरत आहे. संगमनेर तालुका सांस्कृतिक मंडळाच्या त्या अनेक वर्षे उपाध्यक्ष होत्या. त्या काळात तालुक्यातील प्राथमिक शाळांतील मुलांच्या सांस्कृतिक कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांनी सातत्याने स्पर्धांचे आयोजन केले होते. त्या स्वतः उत्कृष्ट अभिनेत्री असून राज्य शासनाचे अभिनयाचे सुवर्णपदक त्यांनी मिळविले आहे.

कारागृहातील बंदींच्या जीवनावर त्यांनी ‘बंदिशाळा’ या मालिकेची निर्मिती करुन कार्यकारी निर्माती म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. दूरदर्शनवरील ‘आमची माती आमची माणसं’ या कृषीविषयक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्यांनी केले. बंदीशाळा, चकवा, क्राईम डायरी, संत तुकडोजी महाराज, यू आर अंडरअरेस्ट, देवाचिया दारी या मालिकांमधून त्यांनी अभिनयाला साज चढविला. संत नारायणगिरी महाराज, ऑर फॅन किड्स, मिशन वन टु-थ्री फोर व्हिक्टोरिया क्रॉस या चित्रपटांमध्येही त्यांनी उत्कृष्ट भूमिका साकारली. गुड बाय डॉक्टर, अंमलदार, सरोगेट, काळोख, देत हुंकार, सरनौबत, कुर्‍हाडीला तहान रक्ताची, संसार हा सुखाचा आदी त्यांची नाटकं गाजली.

सावट, थेंब थेंब आभाळ, सरोगेट, असूड या नाटकांमधील त्यांच्या भूमिकेने राज्य नाट्य स्पर्धेत उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून त्यांना गौरविण्यात आले. सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करत असताना भारतभर त्यांनी प्रवास केला. सर्पमैत्रीण म्हणूनही त्यांची ओळख आहे. अखिल गुरव समाज संघटनेच्या महिला आघाडीच्या त्या संघटन सरचिटणीस म्हणून कार्यरत आहे. विद्यार्थ्यांसाठी बोधकथांवर मालिका, महिला व मुलींसाठी खास विषयांचे लेखनही त्यांनी केले. त्यांच्या सडेतोड लिखाणाने समाजजागृती झाली. संकटाला संधी मानून जीवनात कसे काम करावे याचे उदाहरण
म्हणजे वंदनाताई आहेत.

LEAVE A REPLY

*