अहमदनगर (कर्मयोगिनी) : सौ. राहीबाई सोमा पोपेरे – मदर ऑफ सिड्स

0

कोंभाळणे, तालुका-अकोले जि. अहमदनगर
कार्य – पहिली गावरान बियाणे बँक घरीच सुरू करून बियाण्यांचा पुरवठा, बँकेत 114 प्रकारची स्थानिक व गावरान बियाण्यांचे सवंर्धन केले. गट : कृषी  

अकोले तालुक्यातील पहिले गावरान बियाणे कोष (बँक) बाईफच्या मदतीने राहीताईंनी उभारला. या बँकेतून आत्तापर्यंत हजारो शेतकरी, आदिवासी, महिला यांना जातिवंत बियाणे पुरवठा केला जात आहे. बियाणे बँकेत 114 प्रकारच्या स्थानिक व गावरान बियाण्यांचे सवर्धन करण्यात आलेले आहे. बियाणे निर्मिती व निवड यासाठी त्यांनी आपली जमीन उपयोगात आणली आहे. त्यासाठी कुठलीही अपेक्षा राहीताईंनी ठेवली नाही.

कोंभाळणे हे अकोल तालुक्यातील एक आदिवासी खेडेगाव. येथेच राहीताईंचे घर. घराच्या एका बाजूला उतरत्या छपराचा गोठा तर दुसर्‍या बाजूला छपराची एक खोली. त्या खोलीत प्रवेश करताच समोर दिसते ते पारंपरिक पद्धतीचे गाडगे, मडके, प्लॅस्टिकचे टीप, बाटल्या, प्लॅस्टिकच्या चौकोनी पेट्या ओळीने मांडून ठेवलेल्या. त्या प्रत्येकात वेगवेगळ्या प्रकारची बियाणे ठेवलेली. ही आहे राहीताई सोमा पोपेरे या आदिवासी महिलेची बियाणे बँक. विविध प्रकारच्या 53 पिकांच्या 114 वाणांचे बियाणे येथे आहे. हे सर्व गावरान बियाणे आदिवासींनी परंपरेने जपलेले. हे घर म्हणजे राहीबाईंचे रिसर्च सेंटरच. या बियाणे बँकेला भेट दिल्यानंतर आणि राहीताईंशी बोलल्यानंतर या सर्वाची यथार्थता पटते.

राहीताईंनी परंपरेने आलेले निसर्गाबद्दलचे हे ज्ञान त्यांनी जोपासले, वाढविले. लहानपणापासूनच त्यांना बियाणे जमविण्याचा छंद होता. पारंपरिक पद्धतीने त्या बियाणे गोळा करायच्या. शेतात त्याचा वापर करायच्या. सुमारे दशकभरापूर्वी बायफ संस्थेने त्यांची भेट घेतली, तेव्हा त्यांच्याकडे 17 धान्याचे 48 प्रकारचे वाण होते. पुढे बायफच्या मार्गदर्शन आणि सहकार्यामुळे त्यांच्या कार्याला एक दिशा मिळाली. आज राहीबाईंच्या बियाणे बँकेत 53 धान्याचे 114 वाण आहेत. कडधान्यांमधील घेवडा, वाल, उडीद, वाटाणा, तूर, हरभरा, हुलगा आदी 10 धान्याचे 35 वाण. भात, बाजरी, गहू, नागली आदी तृणधान्याचे 34 वाण. गळीत धान्यांमध्ये तीळ, भुईमूग, सूर्यफूल, जवस, खुरासणी या 5 धान्याचे 11 वाण.

विविध प्रकारच्या भाजीपाल्यातील 26 पिकांचे 32 वाण. रानभाज्यांमध्ये 6 प्रकारच्या कंदांचे 12 वाण. शिवाय त्यांच्या घराभोवती असणार्‍या अडीच-तीन एकर परिसरांत विविध प्रकारची चारशे-पाचशे झाडे आज उभी आहेत. घराच्या परिसरातही त्यांनी विविध प्रकारच्या वनस्पतींची जोपासना केली आहे. उन्हाळ्यात झाडांचा बचाव करण्यासाठी स्टोन मन्चिंग (दगडांचे आच्छादन) तंत्राचा त्यांनी वापर केला. परिसरातील डोंगरावरून गारगोट्या गोळा करून त्या झाडाच्या खोडाभोवती पसरवायच्या. त्यामुळे झाडाला घातलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होत नाही. झाडाभोवती गारवा टिकून राहतो. तेथे गवत उगवत नाही, झाडाला उधई लागत नाही. परंपरेने आलेल्या अशा अनेक गोष्टी राहीताईंकडे आहेत. विशेष म्हणजे या सर्व झाडांची जोपासना सेंद्रिय पद्धतीने केली जाते.

काही वर्षांपूर्वी हळदीकुंकवात राहीताईंनी वाण म्हणून आपल्या रोपवाटिकेत तयार केलेली झाडांची रोपे द्यायला सुरुवात केली. राहीताईंनी या गावात डांगी जनावरांचा पोळा सुरू केला. हजारो कुटुंबांना बियाणे निर्मितीच्या माध्यमाने रोजगार निर्माण करून दिला आहे. 2015 मध्ये बायफ पुणेतर्फे बेस्ट फार्मर पुरस्कार, 2016 मध्ये ग्लोबल ऑरगॅनिक अ‍ॅग्रीकल्चर मुव्हमेंट पुणे तर्फे शेतकरी मित्र पुरस्कार, जिल्हा परिषद अहमदनगर तर्फे प्रगतिशील शेतकरी पुरस्कार, 2017 मध्ये शिवसाम्राज्य प्रतिष्ठानतर्फे नवदुर्गा सन्मान, 2018 मध्ये कै. यशवंतराव भांगरे आदिवासी विकास प्रतिष्ठानतर्फे आदिवासी समाजरत्न पुरस्कार तर श्री स्वामी समर्थ सेवा संस्था राजूर तर्फे आदिवासी समाजभूषण पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन ममताबाई भांगरे, शांताबाई धांडे, जनाबाई भांगरे, हिराबाई गभाले, सोनाबाई भांगरे अशा अनेक महिला त्यांच्या चळवळीत सहभागी झाल्या आहेत. एक वेगळीच चळवळ राहीबाईंच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.

LEAVE A REPLY

*