Type to search

Featured सार्वमत

कोठारी फर्मवर कारवाईबाबत साशंकता

Share

कामे रद्द करताना आपल्याच अहवालाला लावल्या वाटाण्याच्या अक्षता

अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिकेने मे. ए. सी. कोठारी फर्मवर केलेली कारवाई किती खरी आणि किती खोटी, असा प्रश्‍न उपस्थित करणारी ठरत आहे. महापालिका फंडातील कामे करण्यास कोणताही ठेकेदार धजावत नाही. या कामांची बिले महापालिकेतून लवकर मिळत नसल्याने ठेकेदार ही कामे घेत नाहीत. महापालिकेने मे. कोठारी यांच्यावर कारवाई करताना त्यांच्याकडे असलेली मोठी कामे तशीच ठेवून केवळ महापालिका फंडातील कामे रद्द केली आहेत. शिवाय ती करताना आपणच तयार केलेल्या अहवालाला छेद दिला असल्याचे समोर येत आहे.

बोल्हेगाव परिसताली एका रस्त्याच्या कारणावरून मे. कोठारी फर्म अडचणीत आली आहे. वास्तविक महापालिकेची सर्वाधिक कामे करणारी ही ठेकेदार संस्था आहे. बर्‍याच कामांच्या निविदा भरायच्या, त्या मंजूर झाल्यानंतर कार्यारंभ आदेश घ्यायचा आणि काम लवकर सुरू करायचे नाही, असा या संस्थेचा फंडा होता. सर्वाधिक कामे या संस्थेकडे असल्याने या संस्थेबद्दल सर्वाधिक तक्रारी असायच्या. बोल्हेगाव येथील काम देखील याच संस्थेकडे होते. ते अर्धवट ठेवल्यामुळे महापालिकेत आंदोलन झाले. या दरम्यान शहर अभियंत्यांवर बूट फेकण्यात आला. त्याचे गुन्हे दाखल झाले. राजकीय आरोप प्रत्यारोप झाल्याने या संस्थेच्या कारभाराची दखल महापालिकेने घेतली. यापूर्वी अनेक तक्रारी असूनही या संस्थेच्या कारभाराकडे दुर्लक्ष केले जात होते. यापूर्वी केलेल्या अनेक कामांची कोट्यवधींची बिले महापालिकेने आपणास दिलेली नाहीत, असे या संस्थेतर्फे सातत्याने सांगण्यात येते. पहिलेच पैसे नाहीत, तर दुसरे काम करू कशाला, असा या संस्थेचा सवाल असतो.

बूट फेक प्रकरणानंतर या संस्थेकडील 19 कामे रद्द करण्यात आली. त्यामुळे या कामासाठी जमा केलेली अनामत रक्कम जप्त होणार आहे. ही सुमारे 10 लाख रुपयांपर्यंत रक्कम आहे. तसेच या संस्थेकडे असलेली कामे पूर्ण झाल्याशिवाय इतर कामांसाठी त्यांना निविदा दाखल करता येणार नाहीत, असे बंधनही घालण्यात आले आहे. कामे रद्द करण्याची कारवा़ई संस्थेसाठी पर्वणी मानली जात आहे. कारण ही सर्व कामे महापालिका फंडातील होती. ती केली असती तरी बिले कधी मिळाली असती, याची खात्री नव्हती. त्यामुळेच ती अपूर्णावस्थेत किंवा सुरू करण्यात आली नव्हती. मात्र हे करताना याच संस्थेकडे सुमारे सहा कोटी रुपये खर्चाचे नाट्यगृहाचे काम आहे. हे काम देखील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.

मात्र यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महापालिकेची असताना ती पार पाडण्यात आलेली नाही. त्यामुळे काम बंद असल्याचे ठेकेदार संस्थेकडून सांगितले जाते. तसेच सीना नदीवरील रेल्वेस्टेशन रस्त्यावरील पुलाचे काम देखील या संस्थेकडे आहे. ते देखील अनेक वर्षांपासून सुरू आहे. ही दोन्ही कामे अर्धवट असूनही बंद करण्यात आलेली नाहीत. महापालिका फंडातील 19 कामांचा अहवाल देताना त्यातील जवळपास नऊ कामे चालू अवस्थेत, प्रगतीपथावर, सुरू केले असा शेरा मारलेला आहे. जर कामे प्रगतीपथावर असतील तर ते रद्द का केले, याचे उत्तर महापालिकेकडे नाही. अशी कामे रद्द करण्यापूर्वी संबंधित ठेकेदार संस्थेला नोटीस देणे आवश्यक असते. ती कार्यवाहीही झालेली नाही. थेट रद्द करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामुळेच या संस्थेवर केलेली कारवाई खरी की खोटी, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

बोल्हेगाव रस्त्यास जबाबदार कोण?
बोल्हेगाव परिसरातील रस्त्याचे काम अर्धवट ठेवण्याच्या प्रकारामुळे जो प्रसंग उद्भवला त्यावरून कारवाईचे सत्र सुरू झाले आहे. मात्र या रस्त्याचे काम अर्धवट का राहिले, याची चौकशी होण्याची गरज आहे. बूट फेकण्याचा प्रकार झाल्यानंतर घाईघाईने या रस्त्याचे काम पूर्ण करण्याची धावपळ सुरू झाली. अद्याप ते वेगाने सुरू झालेले नाही. मात्र संबंधित अभियंत्यांनी पाहणी केल्यानंतर तेथे रस्त्याच्या मध्ये येणारे बांधकाम व इतर अतिक्रमणे अद्याप काढलेली नसल्याचे समोर आले. ठेकेदार संस्थेकडे एखाद्या रस्त्याचे काम आल्यानंतर ती जागा पूर्णपणे अतिक्रमण मुक्त करून देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. असे असतानाही अतिक्रमणे न काढताच रस्त्याचे काम पूर्ण का केले नाही, म्हणून मे. ए. सी. कोठारी संस्थेला जाब विचारण्यात येऊन कारवाई करण्यात येत असल्याचे अधिकार्‍यांमध्येच बोलले जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!