कोपरगाव तहसीलवर राष्ट्रवादीचा ‘हल्लाबोल’

0

शासनाच्या धोरणाचा निषेध; मागण्या मान्य न झाल्यास टोकाची भूमिका घेण्याचा इशारा

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी)- सत्तेत येण्यापूर्वी जी आश्वासने राज्यातील जनतेला दिली त्याची पुर्तता हे शासन करू शकले नाही, संपूर्ण राज्यात आरोग्य व्यवस्था, कुपोषण व बालमृत्यूचे प्रमाण वाढले असून शिक्षण व्यवस्था ढासाळली आहे.
सर्वच क्षेत्रात सरकारचा अंदाधुंद कारभार सुरू आहे. राष्ट्रवादी पक्षाने या संदर्भात तहसीलदार कदम यांना निवेदन दिले. या निवेदनात आमच्या मागण्यांचा सरकारने सकारात्मक विचार न केल्यास पक्षाला टोकाची भूमिका घ्यावी लागेल असा इशारा देण्यात आला आहे.
सरकारला दिलेल्या निवेदनात म्हटले की, मागील तीन वर्षांपासून राज्यात भाजपा शिवसेना पक्षाचे सरकार आहे. हे सरकार सर्वसामान्य जनता, शेतकरी, व्यापारी व उद्योग व्यवसायाच्या समस्या सोडविण्यात अयशस्वी ठरले आहे. केंद्र सरकारच्या नोटबंदी व जीएसटीच्या आत्मघातकी निर्णयामुळे देशासह राज्याची अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे.
राज्याला आवश्यक असणार्‍या मुलभूत सोयींकडे जाणून बुजून हे सरकार दुर्लक्ष करीत असून आवश्यक राज्यातील जनतेची कोणतीही मागणी नसताना नको ते प्रकल्प राज्यात राबविण्याचा घाट भाजपा शिवसेना पक्षाचे सरकार घालीत आहे.
शेतकर्‍यांना छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजने अंतर्गत देण्यात येणारी कर्ज माफी सरसकट सर्वच शेतकर्‍यांना करून शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करावा. मागील तीन वर्षांत शेतमालाच्या निर्यातीत 64 हजार कोटी रुपयांची घट होऊन आयात 65 हजार कोटींनी वाढली आहे. राज्याच्या शेतकर्‍यांच्या व शेतीविरोधी धोरणामुळे शेती मालाला हमीभाव एवढा बाजारभाव मिळू शकला नाही.
विषारी औषध फवारणीमुळे मृत्यूमुखी पडलेल्या शेतकर्‍यांच्या व शेतमजुरांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपये आर्थिक मदत देऊन या कुटुंबीयांच्या मुलामुलींच्या शिक्षणाची जबाबदारी शासनामार्फत करण्यात यावी. दुग्ध व्यवसाय तोट्यात गेल्यामुळे गायीच्या दुधाला प्रती लिटर 30 रुपये व म्हशीच्या दुधाला प्रती लिटर 40 रुपये दर जाहीर करण्यात यावा, शेतकर्‍यांना मागील तीन वर्षांपासून शेततळे, ग्रीन हाऊस, पॉलिहाऊस, मल्ची, प्लॅस्टीकच्या कागद, ठिबक तुषार सिंचन व तुषार संच यांचे अनुदान मिळालेले नाही ते शेतकर्‍यांना तातडीने देण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर प्रदेश सचिव संदीप वर्पे, जिल्हा संघटक दीपक साळुंके, शहर अध्यक्ष सुनील गंगुले, तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, कृष्णा आढाव, नवाज कुरेशी, निखिल डांगे, जि.प. सदस्य सुधाकर दंडवते, कौसरभाई सय्यद, संजय मांजरे, हरिभाऊ शिंदे, भगवान माळी आदींच्या सह्या आहेत.

 

 

LEAVE A REPLY

*