Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

कोपरगावच्या ‘त्या’ शिक्षकांवरील कारवाई मागे घेऊ नका

Share

सदस्य जालिंदर वाकचौरे यांची शिक्षण समितीच्या सभेत मागणी : इस्त्रो सफरची तयारी सुरू

अहमदनगर (प्रतिनिधी)- गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात गाजत असलेल्या कोपरगाव प्रकरणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई केली आहे. ही कारवाई चौकशी समितीच्या अहवालानुसार करण्यात आली असून शिक्षक संघटनांच्या दबावाला बळी न पडता शिक्षण विभागाने त्यात कोणताही बदल करून नये, अशी मागणी गुरूवारी झालेल्या शिक्षण समितीच्या बैठकीत सदस्य जालिंदर वाकचौरे यांनी केली. दरम्यान याच सभेत जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) ची सफरची तयार सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. यंदाही त्यासाठी प्रत्येक तालुक्यातून विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.

शिक्षण समितीची सभा उपाध्यक्षा राजश्री घुले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेला सदस्य राजेश परजणे, जालिंदर वाकचौरे, विमल आगवण, उज्ज्वला ठुबे, सुवर्णा जगताप, प्राथमिक शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी दिलीप थोरे आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेतर्फे दरवर्षी विद्यार्थ्यांना इस्रोची सहल घडविण्यात येते. त्यासाठी परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. गेल्या वर्षी 44 विद्यार्थ्यांची सहल नेण्यात आली होती. यंदाही सहल जाणार आहे. इस्रोच्या सहलीव्यतिरिक्त समग्र शिक्षा अभियानांतर्गत राज्याच्या बाहेरील सहलीसाठी 100 विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. राज्यातील सहलीसाठी 650 विद्यार्थ्यांना संधी मिळेल. त्यासाठीचा खर्च जिल्हा परिषदेतर्फे करण्यात येणार आहे. सहलीसाठी आवश्यक निधी जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाला आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळांच्या परिसरातील विजेचे खांब इतरत्र हलविण्यासाठी नियोजन समितीने 78 लाखांचा निधी दिला. मात्र हा निधी माध्यमिक शाळांच्या परिसरातील खांब हलविण्यासाठी वापरण्यात आला. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विजेचे खांब तसेच आहेत. हे खांब तातडीने हलविण्याची मागणी जालिंदर वाकचौरे यांनी केली. तसेच 2005 नंतर दोन पेक्षा अधिक अपत्ये असलेल्या शिक्षकांची नावे आठ दिवसांत सादर करण्याची मागणी त्यांनी केली. माहिती प्राप्त झाल्यावर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेतील पाचवी ते आठवीच्या शंभर टक्के विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेस बसविण्यासाठीचे शुल्क जिल्हा परिषदेमार्फत भरण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे खाजगी शाळेतील किमान पन्नास टक्के विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेला बसविण्याचे निर्देश देण्यात आले. सभेच्या सुरुवातीला शिक्षण विभागाकडील विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. तसेच सद्यस्थितीत सुरू असलेल्या बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.

सभेत अन्य विषयासह तीन आपत्य असणार्‍या शिक्षकांची माहिती संकलित करण्यासोबतच शाळेवर कामकाज करत असतांना नियमितपणे महाविद्यालयात बीएड् पूर्ण केलेल्या शिक्षकांची माहिती संकलित करण्याचे आदेश दिले आहेत. नियमित नोकरीसह या शिक्षकांनी बीएड् कसे पूर्ण केले, त्यासाठी महाविद्यालयात 80 टक्के हजेरीची अट या शिक्षकांनी कशी पूर्ण केली यांची माहिती संकलित करण्याचे आदेश देण्यात आले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!