Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

आमदार म्हणून नव्हे राज्याचा गाडा हाकण्यासाठी कर्तृत्ववान नेतृत्व म्हणून आशुतोषची निवड- शरद पवार

Share

कोपरगाव (प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी राज्यात तरुण नेतृत्वाला संधी दिली. त्यावेळी ज्येष्ठानी त्यांना विचारले, तरुणांना एवढ्या मोठ्या प्रमाणात संधी का? तेव्हा त्यांनी सांगितले, पुढील 30 ते 35 वर्षे महाराष्ट्राचा गाडा ओढण्यासाठी कर्तृत्ववान नेतृत्वाची गरज आहे. ते घडविण्यासाठीच तरुणांना संधी दिली. त्यातून अनेक कर्तृत्ववान नेते तयार झाले. या संधीमुळेच मी 27 व्या वर्षी विधानसभेवर गेलो. हाच विचार पुढे नेण्यासाठी मी आशुतोषला उमेदवारी दिली आहे. मला आशुतोषला केवळ आमदार करायचे नाही तर उद्याचा महाराष्ट्र घडविण्यासाठी कर्तृत्ववान नेतृत्वाची गरज आहे. ते कर्तृत्ववान नेतृत्व म्हणून आशुतोषची निवड आपण केली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉग्रेस, कॉग्रेस, महाआघाडीचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आयोजित जाहीर सभेत शरद पवार बोलत होते. व्यासपीठावर माजी आमदार अशोकराव काळे, उमेदवार आशुतोष काळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, उपाध्यक्ष संदीप वर्पे, चैतालीताई काळे, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजीव भोर, संभाजी काळे, पद्माकांत कुदळे, स्नेहलता शिंदे, डॉ. अजय गर्जे, माजी नगराध्य मंगेश पाटील, कपिल पवार, अशोक खांबेकर आदींसह कॉग्रेस, राष्ट्रावदी महाअघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबवाव्या म्हणून कॉग्रेस आघाडी सरकारच्या काळात 71 हजार कोटीची कर्जमाफी देऊन 7/12 कोरा केला.

पीक कर्ज शून्य टक्के व्याजदराने देण्याचा निर्णय घेतला. मात्र विद्यमान सरकाच्याच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी पुन्हा कर्जबाजारी झाला. कर्ज वाढले म्हणून शेतकर्‍यांना जप्तीच्या नोटिसा दिल्या जात आहेत. यातून महाराष्ट्रात पाच वर्षात 16 हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. भाजप सरकारने ऑनलाईन कर्जमाफी जाहीर केली. त्यासाठी 100 नियम बनविले. मुख्यमंत्र्यांनी सांगितले एका वर्षात 100 टक्के कर्जमाफी देऊ. आज पाच वर्षे झाली 30 टक्केही कर्जमाफी झाली नाही. आम्ही अनेक ठिकाणी औद्यागिक वसाहती सुरू केल्या. मात्र या सरकारने घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे देश मंदीच्या सावटाखाली आहे.

यात या औद्यागिक वसाहती हजारो कंपन्या बंद पडल्या असून लाखो तरूण बेरोजगार झाले. महाराष्ट्राची अस्मिता असलेले छत्रपतींचे गडकिल्ले हे तरुणांसाठी नेहमी स्फूर्तिस्थान राहिले. मात्र भाजप सरकार हे गडकिल्ले हॉटेल, दारूचे बार सुरू करण्यासाठी देण्याचा विचार करते. अशा सरकारच्या ताब्यात पुन्हा सत्ता द्यायची का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शेती, पाणी, कारखाने आदींच्या समस्या सोडविण्यासाठी दृष्टी, कर्तृत्व असलेला नेता हवा. हे नेतृत्व आशुतोषकडे आहे. केवळ आमदार म्हणून नव्हे तर उद्याचा महाराष्ट्र घडविण्यासाठी आशुतोषचे होत बळकट करा. 21 तारखेला आशुतोषला प्रचंड मताने विधानसभेत पाठवा असे आवाहन त्यांनी केले.

युवा नेते आशुतोष काळे म्हणाले, तालुक्याच्या विद्यमान आमदारांनी पुणतांब्याचा शेतकरी संप मोडण्याचे पाप केले. समृध्दी महामार्गातील बाधीत शेतकर्‍यांच्या बाजूने त्यांनी भूमिका घेतली नाही. रब्बी अनुदान, पाटपाणी, दुष्काळी यादीतुन तालुका वगळला यावेळी लोकप्रतिनीधी गप्प राहिल्या. त्यामुळे शेतकर्‍यांना जिवंतपणी सरणावर बसण्याची वेळ आली. तालुक्याच्या अकार्यक्षम आमदारांमुळे तालुक्याची मोठी हानी झाली. लोकप्रतिनीधी लाटेवर निवडून आल्या आहेत. त्यामुळे त्यांना सर्वसामान्याच्या प्रश्नाची जाण नाही. त्यामुळे तालुक्यात परिवर्तन नक्की आहे. आमदारकी ही माझी हौस नाही. सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांच्या अग्राहास्तव निवडणूक लढवीत आहे. 21 तारखेला पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी मला मतदान करा असे आवाहन त्यांनी केले.

370 कलम रद्द करण्यासाठी संसदेत पाठिंबा
संसदेत 370 कलम रद्द करण्याचा ठराव मांडला. त्यावेळी माझ्यासह सर्वांनीच याला पाठिंबा दिला. केवळ दोन चार जणांनी त्याला विरोध केला. मात्र पंतप्रधान मोदी व अमित शाह महाराष्ट्रात येऊन कॉग्रेस राष्ट्रवादीने कलम 370 बद्दलची भूमिका स्पष्ट करावी अशी टिमकी वाजवितात. पंतप्रधान मेदी व अमित शहा यांना माझे नाव घेतल्याशिवाय करमत नाही. ते झोपेतही माझ्याच नावाच जप करतात.

निवडणूका झाल्यानंतर आशुतोष माझ्याकडे ये. कोपरगावचा वर्षांनुवर्षे प्रलंबीत पाणी प्रश्नावर चर्चा करू. दिल्लीत संबधित विभागाकडे पाठपुरावा करून हा प्रश्न कायमचा मार्गी लावू. आशुतोष तू एकटा नाहीस. संपूर्ण राष्ट्रवादी तुझ्याबरोबर आहे.

मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना शंकरराव काळे माझ्या मंत्रिमंडळात मंत्री होते. त्यांनी त्या काळात धोरणात्मक निर्णय घेऊन अनेक कामे केली. मात्र ते विचारधारेपासून कधीही बाजूला गेले नाही. श्वास सुरू असेपर्यंत त्यांनी विचारधारा सोडली नाही. शंकरराव कोल्हे हे माझे सहकारी होते. त्यांच्यावर मी टीका करणार नाही. मात्र आमची विचारधारा कधीही रूजली नाही अशा भाजपच्या वाटेवर ते गेले, याचे दुखः आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!