कोपरगाव : नमुना नंबर सात पाणी अर्ज 27 नोव्हेंबरपर्यंत भरावेत

0

आमदार स्नेहलता कोल्हे यांचे आवाहन

कोपरगाव (वार्ताहर)- नाशिक पाटबंधारे कार्यक्षेत्रातील गोदावरी कालव्याच्या रब्बी हंगामासाठी नमुना नंबर सात पाणी मागणी अर्जाबाबत जाहीर प्रकटन प्रसिध्द करण्यात आले असून जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी आपले अर्ज पाटबंधारे विभागाकडे 27 नोव्हेंबर पूर्वी भरून द्यावेत, असे आवाहन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केले आहे.
2017 ते 18 रब्बी हंगामातील भुसार बारमाही फळबागा पिकांना पाणीपुरवठा करण्याबाबतचे परिपत्रक प्रसिध्द झाले आहे. शेतकर्‍यांनी पाणी मागणी अर्ज भरून नोंदणी नोंदवावी. गोदावरी उजवा आणि डाव्या कालव्याचे सर्वाधिक विस्तीर्ण सुमारे 25 हजार हेक्टर लाभक्षेत्र आहे. चालू वर्षी उर्ध्व गोदावरी खोर्‍यातील धरण कार्यक्षेत्रात चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याने दारणा, गंगापूर धरणे शंभर टक्के भरली आहेत. रब्बी हंगाम पाटपाण्याचे व कोपरगाव शहराला पिण्यासाठी पाणी नियोजन तात्काळ करून आवर्तन सोडण्याबाबत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आपण समक्ष भेटून मागणी केली आहे.
त्याचप्रमाणे संजीवनीचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री विजय शिवतारे, पालकमंत्री राम शिंदे व मुख्य अभियंता जलसंपदा विभाग नाशिक यांच्याकडे समक्ष भेटून पाटपाण्याच्या समस्येबाबत सविस्तर चर्चा करून तुटीच्या उर्ध्व गोदावरी खोर्‍यात पाणी वाढविण्यासाठीच्या उपाय योजनांची तात्काळ अंमलबजावणी करून गोदावरी कालवे नूतनीकरणासाठी पुरेशा प्रमाणात निधीची मागणीही केली आहे.
जिरायत भागासाठी वरदान असलेल्या निळवंडे धरणाचे कालवे काढून संबंधित क्षेत्रास पाणी देण्याबाबत कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ व उर्ध्व प्रवरा कालवे विभाग घुलेवाडी, संगमनेर यांना आदेश व्हावेत.
सन 2012 पासून सलग चार वर्षे गोदावरी कालव्यावरील बारमाही लाभधारक शेतकर्‍यांचे पाण्याअभावी कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यातच समन्यायी पाणी वाटपाचा फटकाही गोदावरी कालव्यांना सोसावा लागत आहे. तेव्हा या महत्त्वाच्या प्रश्‍नांची सोडवणूक होण्यासाठी आपला पाठपुरावा सुरू असून कालवा सल्लागार समितीच्या आगामी बैठकीत तसेच हिवाळी अधिवेशनात मंत्रीमहोदयांचे लक्ष आपण वेधणार असल्याचे आमदार कोल्हे म्हणाल्या. दरम्यान मुंबई मंत्रालय येथे गोदावरी कालवे सल्लागार समितीची बैठक 17 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता होणार आहे.

 

LEAVE A REPLY

*