Type to search

Featured सार्वमत

कोपरगावात अतिवृष्टी, प्रचंड नुकसान

Share

कोपरगाव मंडलात 5 इंच पावसाची नोंद, ब्राम्हणगावातील बंधारा फुटला

अहमदनगर (प्रतिनिधी)- दारणा, गंगापूर धरण पाणलोटात दांडी मारणार्‍या आर्द्रा नक्षत्राच्या पावसाने शनिवारी रात्री कोपरगाव मंडल व अन्यत्र पहिल्याच दिवशी धुमाकूळ घातला. त्यात कोपरगावकरांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. मानवी वस्तीत पाणी घुसल्याने शेतीसह संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्याने दु:खाला पारावार राहिलेला नाही. या सर्व नुकसानीचे पंचनामे करून त्वरित शासकीय मदत जाहीर करावी अशी मागणी होत आहे.

ब्राम्हणगाव, टाकळी, धारणगाव, मुर्शतपूरलाही या पावसाचा तडाखा बसला. अनेक ठिकाणी कांदा भिजल्याने कांदा उत्पादकांसह व्यापार्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही ठिकाणी घरातील वस्तू, अन्नधान्य, लहान मुलांच्या वह्या, पुस्तके वाहून गेले आहेत. तर काहींचे भिजल्याने नुकसान झाले आहे. जनावरांचेही हाल झाले. नेवासा, राहाता, शेवगाव, राहुरी, श्रीगोंदा, पाथर्डीतही सर्वदूर पाऊस झाल्याचे सांगण्यात आले. ज्या ज्याठिकाणी दमदार पाऊस झाला आहे. तेथील शेतकरी मशागतीच्या कामाला लागले आहेत. अकोले तालुका वगळता अन्य ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे. या पावसामुळे दुष्काळात होरपळणार्‍या जनता आणि शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. अजूनही या भागात मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत शेतकरी आहेत.

राहाता तालुक्यातील गणेशनगर परिसरात शनिवारी झालेल्या वादळी पावसाने रांजणगाव येथे अनिल लुटे यांच्या घरावर वीज पडली तर गणेश कारखान्याच्या वसाहती मध्ये 8 ते 10 घरांचे छत उडाले. या घटनेत अनेकजन जखमी झाले आहे.विद्युत रोहीत्र उखडून पडले. अस्तगाव येथे विजेच्या गडगडाटासह झालेल्या पावसात वीज अंगावर पडल्याने एक बैल जागीच ठार झाला आहे तर पिंपळस येथे एक गायीवर वीज पडल्याने तीही जागीच ठार झाली. राहुरी, पाथर्डी, श्रीगोंद्यात पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे.  शेवगाव तालुक्यातही विविध ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील ठाकूर पिंपळगाव बंधारा पहिल्याच पावसाचे भरल्याने शेतकरी सुखावले आहेत.

जिल्ह्यात पडलेला पाऊस असा (मिमी)-
कोपरगाव – 130, पोहेगाव 45, सुरेगाव 65, दहिगाव बोलका 36, रवंदे 52
श्रीगोंदा – 47, पेडगाव 16, काष्टी 14, चिंभळा 15, बेलवंडी 6, देवदैठण 3, मांडवगण 13 , कोळगाव 52
कर्जत – 4.5, राशीन 2.7, भांबोरा 36, कोंभळी 7, माही 28, मिरजगाव 22
जामखेड – 22, खर्डा 13, नायगाव 33, अरणगाव 11.2, नान्नज 19
श्रीरामपूर – 14, उंदिरगाव 20, बेलापूर 12, टाकळीभान 22
राहुरी – 47.2, वांबोरी 2, देवळाली प्रवरा 12, सात्रळ 12, ब्राम्हणी 18, टाकळीमियॉ 19, ताहाराबाद 4
राहाता – 20, पुणतांबा 65, बाभळेश्‍वर 42, लोणी 38, शिर्डी 11
नेवासा (नेवासा खुर्द) – 70, नेवासा बुद्रुक 72, सलाबतपूर 70, कुकाणा 40, चांदा 14, घोडेगाव 9, वडाळा बहिरोबा 32, सोनई 9
नगर(नालेगाव) – 2, जेऊर 5, रूईछत्तीसी 5, कापूरवाडी 12, केडगाव 12, चास 5, भिंगार 5, नागापूर 2, वाळकी 0, चिंचोडी पाटील 14, सावेडी 9
पाथर्डी – 60, टाकळीमानूर 20, कोरडगाव 25, करंजी 8, मिरी 2, माणिकदौंडी 30
शेवगाव – 19, बोधेगाव 18, चापडगाव 39, भातकुडगाव 36, एरंडगाव 45, ढोरजळगाव 32
पारनेर – 13, सुपा 2, वडझिरे 0, निघोज 0, टाकळी ढोकेश्‍वर 7, वाडेगव्हाण 2, पळशी 5, भाळवणी 0
संगमनेर – 8, धांदरफळ 4, आश्‍वी बु. 13, शिबलापूर 13, तळेगाव 4, समानपूर 6, साकूर 32, घारगाव 8, डोळासणे 4, पिंपरणे 9
अकोले – 8, राजूर 4, शेंडी 0, ब्राम्हणवाडा 0, समशेरपूर 5, कोतुळ 2, वीरगाव 3, साकीरवाडी 0

भंडारदरा, मुळा धरण पाणलोटात दांडी
उशीरा का होईना जिल्ह्याच्या अन्य भागात पाऊस पडता झाला असलातरी जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा आणि मुळा पाणलोटात अद्यापही मान्सून सक्रिय नसल्याने पाणलोटासह लाभक्षेत्रातील शेतकरी चिंतातूर झाले आहेत. भंडारदरा पाणलोटात गेल्या चारपाच दिवसांपूर्वी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यानंतर आशा पल्लवित झाल्या होत्या. पण गत तीन दिवसांपासून पाणलोटात ऊन असल्याने सर्वजण हबकून गेले आहेत. असाच प्रकार राहिला तर पिके तर सोडाच पिण्याच्या पाण्याचे कसे होणार या विचाराने सर्वजण हैराण झाले आहेत. भंडारदरा आणि मुळा पाणलोटात पाऊस कसा पडतो यावरच लाभक्षेत्रातील शेतकरी पिकांचे नियोजन करीत असतात. पण जून संपण्याच्या मार्गावर आलातरी या भागात पाऊस नाही. भंडारदरात निच्चांकी पाणीसाठा आहे. मुळातही फारसे पाणी नाही. त्यामुळे सर्वांचे डोळे पावसाकडे लागलेले आहेत. येणारा दिवस पावसाविना जात असल्याने भविष्यात काय संकट लिहून ठेवलय या शंकेने नगरकर हादरून गेले आहेत. 1972 प्रमाणेच पाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

 • आदिवासी
 • वसाहत पाण्यात
 • अनेकांच्या संसारोपयोगी वस्तू, अन्नधान्य, शालेय साहित्य वाहून गेले
 • शेतकरी, व्यापार्‍यांचा कांदा भिजला
 • दुकानदारांच्या मालाचेही नुकसान
 • शेळ्या-मेंढ्या दगावल्या
 • ठाकूर पिंपळगावतलाव भरला
 • नेवासा, कुकाण्यात जोरदार पाऊस
 • रांजणगाव येथे घरावर वीज पडली
 • वीज कोसळल्याने बैल ठार
 • पिंपळसमध्ये गाय दगावली
 • राहाता, शेवगाव, पाथर्डी आणि राहुरीत दमदार पाऊस
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!