Type to search

Featured सार्वमत

पहिल्याच पावसाने कोपरगाव तालुक्यात दाणादाण

Share

ब्राह्मणगावात मंडपी नाला फुटला, आदिवासी वसाहत पाण्यात, कोल्हे कारखान्याची मदत

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी)- तालुक्यातील रवंदे परिमंडळात शनिवारी रात्री 56 मिलीमिटर पडलेल्या पावसामुळे ब्राम्हणगाव शिवारातील मंडपी नाल्यास तसेच टाकळी धारणगाव शिवारातील म्हसोबावाडी, कोपरगाव शहरातील खडकी येथे मोठ्या प्रमाणात पाणी आले. त्यामुळे येथील आदिवासी वस्तीत तसेच शेतात सगळीकडे पाणीच पाणी शिरले. पाण्यात अडकलेले पशुधन, अबालवृध्द नागरिक महिला यांना सहकारमहर्षि कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या नेर्तृत्वाखाली संजीवनीच्या आपत्ती निवारण पथकाने सुरक्षीत बाहेर काढले. त्यांना साईबाबा संस्थान शिर्डीच्यावतीने सकाळचा नाष्टा तर कोल्हे कारखान्याच्यावतीने जेवणाची सोय करण्यात आली.

रविवारी भल्या सकाळी बिपीन कोल्हे यांनी प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना घटनास्थळी पाचारण करून तहसिलदार योगेश चंद्रे, तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांच्यासह प्रत्यक्ष पाहणी करून झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून त्यांना आवश्यक ती शासकीय मदत द्यावी, अशी मागणी केली. कोपरगावच्या पूर्व भागात 132 मिलीमिटर पाऊस पडल्याची नोंद आहे तर पोहेगावच्या वरच्या भागातील गावात जेमतेम पाऊस आहे. या पावसामुळे 10 मेंढ्या, दोन गायी, शेळ्या-कोकरं तसेच वर्षभर साठवणूक करून ठेवलेली धान्याची पोती वाहून गेली. दरम्यान आ. स्नेहलता कोल्हे यांनी या आपत्तीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व मंत्र्यांना माहिती दिली व पंचनामे करून मदत देण्यांची मागणी केली.

सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे पुढे म्हणाले की, संकटं कोपरगाव तालुक्याला नवीन नाहीत. गारपीट, दुष्काळ, महापूर, भूकंप आदी नैसर्गिक तसेच मानव निर्मीतीत संकटात माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वत: मदतीचे काम केलेले आहे. म्हणूनच आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून सभापती हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते गेल्या वर्षी 2018 मध्ये संजीवनी आपत्ती निवारण कक्षाचे उद्घाटन केले आणि त्याची कसोटी त्याच दिवशी 21 जून 2018 रोजी लागली. चांदेकसारे भागातील आनंदवाडी येथे अचानक 68 मिलीमिटर पाऊस होवून त्यात 258 नागरिक अबालवृध्द महिला, पशुधन अडकले होते. त्या सर्वांची सुटका केली होती आणि याही वाढदिवसाला 22 जून 2019 रोजी येवला तालुक्यातील निमगाव मढ भागात झालेल्या पावसाचे आणि कोपरगावच्या ब्राम्हणगाव, टाकळी, धारणगाव, खडकी भागात मुसळधार झालेल्या पावसामुळे आदिवासी वस्तीत पाणी शिरले. मंडपी नाल्यास आलेल्या पाण्याच्या तडाख्याने शेतीसह पशुधनाने अतोनात नुकसान झाले. संसारउपयोगी वस्तू वाहून गेल्या.

वर्षभर साठवून ठेवलेले धान्याची पोती देखील वाहून गेली तर टाकळी रस्त्याला राजेंद्र सांगळे, संतोष ठक्कर, महेंद्र ठक्कर या कांदा व्यापार्‍यांचे अतोनात नुकसान झाले. राजेंद्र सांगळे यांचा सुमारे 11 लाख रूपये किमंतीचा 967 टन कांदा पावसाच्या पाण्यात वाहुन गेला. टाकळी येथील शंकर महाजन यांचा तीन एकर डाळिंबाचा बाग पावसाच्या पाण्यात पूर्णपणे उद्ध्वस्त झाला तर टाकळी चर नाल्याचे पाणी अशोक आव्हाड यांच्या शेतात घुसले. राहुल देवकर यांच्या पोल्ट्री फार्मचे नुकसान झाले. कोपरगाव तालुक्यात चालु पावसाळ्यात पहिल्याच झालेल्या पावसाने दाणादाण उडाली. पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या सर्वांचे पंचनामे करून त्यांना शासकीय मदत तात्काळ मिळवून द्यावी, अशी मागणी बिपीन कोल्हे यांनी केली. याप्रसंगी सहकारमहर्षि कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष संजय होन, संचालक निवृत्ती बनकर, प्रदीप नवले, सुभाषराव आव्हाड, आप्पासाहेब दवंगे, निवृत्ती यमाजी बनकर, मंडलाधिकारी खिवराज दुशिंग, तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव आदींनी नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून आपत्तीग्रस्तांना नाष्टा पाकीटे देऊन जेवणाची सोय केली.

कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगावात मुसळधार पावसाने हजेरी लावली. ब्राम्हणगावचे गावतळे क्षमतेपेक्षा जास्त भरल्यानेे फुटले आणि ते पाणी सरळ गावच्या दिशेने वाहू लागले. त्या पाण्याचा प्रवाह अतिशय जोरात होता. पाणी काही वेळात गावात गेल्याने गावातील घरात घुसले. त्यामुळे तळ्याच्या शेजारील शेतात, गावातील घरात आणि मेन चौकातील सगळ्याच दुकानांत पाणी घुसले. अनेकांच्या घरातील भांडे, टीव्ही, पलंग, कपडे, कोंबडी फार्म हाऊसमधील भांडे वाहून गेले तसेच दुकानातील मालाचे नुकसान झाले आहे. पोहेगाव मंडळात 45 मीमी, सुरेगाव मंडळात 65 मीमी, कोपरगाव मंडळात 130 मीमी, रवंदे 52 मीमी पाऊस झाला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!