Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

कोपरगाव तालुक्यातील 40 हजार शेतकर्‍यांचे 32 हजार हेक्टर क्षेत्र बाधित

Share

राज्य सरकारच्या तुटपुंज्या मदतीने शेतकर्‍यांची घोर निराशा

कान्हेगाव (वार्ताहर)- गेल्या काही दिवसांपासून झालेल्या परतीच्या पावसाने कोपरगाव तालुक्यातील 79 गावांतील 32 हजार 374.17 हेक्टर खरिपातील पिकाचे क्षेत्र बाधित झाले आहे. मात्र राज्य सरकारने बाधित शेतकर्‍यांना हेक्टरी केवळ 8 हजार रुपयांची मदत जाहीर केल्याने बळीराजाची घोर निराशा झाली. एक प्रकारे ही शेतकर्‍यांची थट्टाच सरकारने चालवल्याने शेतकर्‍यांमधून संताप व्यक्त होत आहे.

गेल्या वर्षी कोपरगाव तालुक्यात पडलेल्या दुष्काळाचा निधी अद्यापही शेतकर्‍यांना मिळालेला नाही. प्रशासनाने पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण केलेले आहे. मात्र झालेल्या नुकसानीचा मोबदला कधी मिळणार? असा प्रश्न शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीस यावर्षी पाऊस चांगला झाल्याने शेतकर्‍यांनी खरिपाच्या पेरण्या मोठ्या उत्साहात केल्या होत्या. परंतु पिके चांगली आली असताना परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने होत्याचे नव्हते झाले.शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला.
कोपरगाव तालुक्यातील 79 गावांमध्ये खरिपाचे एकूण क्षेत्र 32 हजार 374.17 बाधित झाले आहे.

यामध्ये मका, सोयाबीन, कपाशी व बाजरी आदी पिकांचा समावेश आहे. परतीचा पाऊस 17 ऑक्टोबरपासून सुरू झाल्याने अनेक शेतकर्‍यांनी सोंगणी केलेली मका पूर्णपणे पाण्यात भिजली. त्यामुळे त्या कणसांना कोंब फुटले. तसेच सोयाबीन पावसात जास्त दिवस भिजल्याने तिला मोड आले.

याबरोबरच कपाशी व बाजरी ही पिकेही बाधित झाल्याने उत्पादनात मोठी घट होऊन शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे सुमारे 40 हजार शेतकर्‍यांना याचा फटका बसलेला आहे. या पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल शासनाला पाठवला असल्याची माहिती तहसीलदार योगेश चन्द्रे व नायब तहसीलदार जयवंत भांगरे यांनी दिली.

मदत कधी मिळणार ?
कोपरगाव तालुक्यात मागील चार वर्षांपासून दुष्काळजन्य परिस्थिती होती. पिण्याचे पाणीही दुरापास्त झाले होते. गेल्या वर्षी शासनाने तालुक्यात दोन मंडलात दुष्काळ जाहीर केलेला होता; मात्र वर्षाहून अधिक काळ गेला असला तरी संबंधित शेतकर्‍यांना अद्याप निधी मिळालेला नाही. तसेच सण 2017-18 चे बोंड अळीचे अनुदान 240 शेतकर्‍यांना अद्यापही मिळालेले नाही. या परिस्थितीचा विचार करता अवकाळी पावसाच्या नुकसानीचा मोबदला वेळेवर मिळेल का याबाबत शेतकरी साशंक आहेत.

पिकाचे नाव व बाधित क्षेत्र
मका – 1343 हेक्टर
सोयाबीन – 1238 हेक्टर
बाजरी – 290.20 हेक्टर
कपाशी – 50.74 हेक्टर
फळपिके – 1354.52 हेक्टर
विमा उतरवले क्षेत्र- 3894.37 हेक्टर
विमा न उतरवलेले क्षेत्र – 28479.80 हेक्टर
एकूण बाधित शेतकर्‍यांची संख्या- 40022
अपेक्षित निधी – 42 कोटी 42 लाख 87,903 रुपये.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!