Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

कोपरगाव महाविद्यालयातील 40 सेवकांच्या बदल्या

Share

कोपरगाव (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेच्या कोपरगाव येथील एसएसजीएम महाविद्यालयात गेल्या दोन दिवसांपासून तब्बल 40 पेक्षा जास्त बदल्या झाल्यामुळे रयत शिक्षण संस्थेच्या सेवकांमध्ये खळबळ उडाली असली तरी संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी घेतलेल्या धडक निर्णयाचे सर्व स्तरावरून स्वागत होत आहे.
संस्थेच्या प्रत्येक महाविद्यालयात प्राचार्यांबरोबरच स्थानिक व्यवस्थापन समिती असते. कोपरगावच्या महाविद्यालयाच्या जडणघडणीत माजी खा. स्व. शंकरराव काळे तसेच माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे मोठे योगदान आहे.

त्यामुळे स्थानिक व्यवस्थापन समितीत त्यांचा व शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान असणार्‍या मान्यवरांचा समावेश असतो. राजकारणात एकमेकांचे कट्टर स्पर्धक असणार्‍या काळे-कोल्हे यांनी या शैक्षणिक संस्थेत कारभार करताना राजकीय जोडे बाजूला ठेवल्यामुळे संस्थेतील एक आदर्श महाविद्यालय म्हणून या महाविद्यालयाचा गौरव होता मात्र गेल्या काही वर्षापासून काळे व कोल्हे यांच्यापेक्षा या शाखेत काम करणार्‍या सेवकांमध्ये काळे व कोल्हे गटाला माननारे सेवक अशी विभागणी झाल्यामुळे महाविद्यालयात घडणार्‍या प्रत्येक बारीकसारिक घटनांची माहिती दोन्ही गटांकडे जाऊ लागली. त्यामुळे महाविद्यालयात काम करणार्‍या प्राचार्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती.

थोडी चूक जरी झाली तरी प्राचार्यांना रोषाला जावे लागत होते. त्यामुळे अनेक प्राचार्यांच्या तडकाफडकी बदल्या झालेल्या आहेत. त्यामुळे या महाविद्यालयात काम करण्यास प्राचार्य मंडळी सहजासहजी तयार होत नव्हती. संस्थेत काम करतांना 8 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तो सेवक बदलीस पात्र असतो असा संकेत आहे मात्र या महाविद्यालयात काम करणार्‍या अनेक सेवकांनी आपापल्या नेत्यांची मर्जी संपादन केलेली असल्यामुळे बरेच सेवक वर्षानुवर्ष एकाच शाखेत काम करत होते. आपली कोणी बदली करू शकत नाही याचा आभिर्वाव त्यांच्यात निर्माण झाल्यामुळे त्याचा परिणाम शैक्षणिक कामकाजावर होऊन कॉलेजची विद्यार्थी संख्या व प्रतिमेवर होऊ लागली.

याची जाणीव संस्थेच्या पदाधिकार्‍यांना सुध्दा झाली.हे प्रकरण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापर्यंत गेल्यामुळे शाखेच्या हितासाठी ठोस निर्णय घेण्याच्या सूचना त्यांनी संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील व सचिव प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे यांना दिली. त्यानुसार या शाखेत काही महिन्यापूर्वी संस्थेबाहेरच्या व्यक्तीची प्राचार्यपदी निवड करण्यात आली. नवीन प्राचार्यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांना काम करतांना अडचणी जाणवू लागल्यामुळे त्यांनी पदाधिकार्‍यांची भेट घेऊन धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज स्पष्ट केली. त्यात ज्या सेवकांनी अनेक वर्ष या महाविद्यालयात बस्तान बसविले आहे त्यांच्या बदल्या करण्याबाबत संस्थेच्या प्रशासनाच्या कार्यकारी समितीत निर्णय झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे परवा वरिष्ठ महाविद्यालयातील 15 प्राध्यापकांच्या श्रीरामपूर, मंचर, लोणंद सह अनेक ठिकाणी बदल्या करण्यात आल्या. काल पुन्हा 25पेक्षा जास्त प्राध्यापक व शिक्षकेतर सेवकांच्या बदल्या करण्यात आल्या असून अजूनही बदल्या होण्याचे संकेत आहे.

या बदल्यामध्ये काहींनी बदल्या रद्द करण्यासाठी जोमाने प्रयत्न सुरु केले आहेत. संस्था प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्यामुळे त्यांना किती यश येईल यात साशंकता आहे. बर्‍याच महाविद्यालयाचे नॅक पूर्ण झाल्यामुळे संस्थेतील गुणवत्ताधारक सेवक वर्गाची या महाविद्यालयात बदल्या करून महाविद्यालयाची गुणवत्ता वाढविण्यासाठी व उज्वल प्रतिमा निर्माण करण्यासाठी संस्था प्रशासनाने चांगले पाऊल उचले आहे. तरी गैरसोयीने बदलून आलेले सेवक कसा प्रतिसाद देतात याकडेही सर्वांचे लक्ष आहे.

संस्थेच्या कार्यक्षेत्रात असणार्‍या ज्या महाविद्यालयाचे नॅक झाले आहे मात्र मोठया प्रमाणात खर्च करून ज्यांना चांगली ग्रेड मिळाली नाही तेथील महाविद्यालयातील प्राचार्य व चांगले काम न करणार्‍या सेवकांच्या बाबतीतही संस्था प्रशासन लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्याची शक्यता असल्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

‘रयत’मध्ये सर्जिकल स्ट्राईक!
दरम्यान एका शाखेत एकाचवेळी 40 पेक्षा जास्त बदल्या करून रयत शिक्षण संस्थेने ’सर्जिकल स्ट्राईक’ केल्याची संस्थेत चर्चा आहे. सध्या तरी संस्थेच्या 14 जिल्ह्यांतील10 हजारांपेक्षा जास्त सेवक या सर्जिकल स्ट्राईकमुळे खडबडून जागे झाले आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!