नगराध्यक्षांनी सुचविलेल्या कामात मुख्याधिकार्‍यांकडून खोडा

0

बेबनावामुळे आरोग्य, पाणी, रस्ते आदी प्रश्‍न समस्यांच्या गर्तेत

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) – मुख्याधिकार्‍यांच्या हेकेखोरपणामुळे नगरपालिकेच्या पाणी शुद्धीकरणाचा ठेका घेतलेल्या कंत्राटदाराचे पैसे चुकते न केल्यामुळे व वारंवार विनंत्या करुनही बिले निघत नसल्याने संबंधित कंत्राटदाराने काम करण्यास नकार दिल्याने नगराध्यक्षांना स्वत: लक्ष घालून एक महिना मुदत दिल्याने शुद्ध पाण्याचा तिढा तूर्त संपला.
या प्रश्नाव्यतिरिक्त अन्य अनेक प्रश्नावर नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी पत्रकारांशी संवाद केल्यानंतर मुख्याधिकारी नगराध्यक्षांनी सुचवलेल्या कुठल्याच कामात लक्ष घालीत नसल्याचे स्पष्ट झाल्याने मुख्याधिकारी शिल्पा दरेकर व नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्यात झालेल्या बेबनावामुळे शहराचे आरोग्य,पाणी,रस्ते सार्वजनिक प्रश्नांची ऐशीतैशी झाल्याचे चित्र आहे.
नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना येणार्‍या अडचणी संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद बोलावली होती त्यात प्रामुख्याने त्यांनी जलशुद्धीकरण यंत्रणेचा ठेका घेतलेल्या अनिकेत बडजाते यांच्या आकृती कन्स्ट्रक्शनची पाच ते सहा महिन्याची बिले रु 2 लाख 73 हजार 420 रूपये मुख्याधिकारी यांचेकडून मंजूर होत नसल्याने ते अडचणीत आले. प्रत्यक्षात या ठेकेदाराची कामाची मुदत 27 ऑक्टोबर पर्यंत होती. दरम्यान निवडणूका आल्याने 31 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली.
पुढील मुदत वाढवण्यासाठी बडजाते यांनी 26 जानेवारीस मुख्याधिकार्‍यांना पत्र दिले. काम चालू ठेवायचे कि बंद ठेवायचे याबाबत मुख्याधिकार्‍यांकडून उत्तर आले नाही. दरम्यान कामाचे नवीन टेंडर निघाले त्याची वर्क ऑर्डर निघालेली नसल्याचे वहाडणे यांनी सांगितले. संबंधित ठेकेदार यांनी मुख्याधिकारी शिल्पा दरेकर यांना अनेकवेळा विनंत्या केल्या शेवटी ते रडकुडीला आले व त्यांनी 11 जूनपासून सदरचे काम बंद करण्याचे सांगितले.
एकूणच गांवाचा पिण्याचा प्रश्न त्यांत रमजान महिना बघता वहाडणे यांनी मध्यस्थी करुन सदर ठेकेदारास एक महिना मुदत देण्यास सांगितले. वहाडणे यांचे शब्दावर बडजाते यांनी विश्वास ठेवला व त्यांनी पुढे एक महिना काम करण्याचे कबूल केले तूर्त हा तिढा सुटला असला तरी वहाडणे दरेकर असा संघर्ष आजच्या क्षणी टोकाला गेला आहे.
नगरपालिकेचा कारभार सात महिन्यापासून हाती घेतल्यानंतर विजय वहाडणे यांना मुख्याधिकारी शिल्पा दरेकर यांच्या कारभाराविषयी पदोपदी अडचणी येवू लागल्याचे त्यांनी बोलून दाखवले. कुठल्याही कामाची वर्क ऑर्डर काढणे हे मुख्याधिकार्‍यांचे हातात आहे परंतु सदरच्या कामाची नगराध्यक्षांनी मंजूरी शिफारस केल्यानंतर त्याला खोडा घालण्याचे धोरण मुख्याधिकार्‍यांनी अवलंबलेले आहे.
नगरपालिकेची मुख्य इमारत, आठवडे बाजारचे ओटे व नगरपालिकेची जुनी इमारत पाडून नवीन बांधकामाच्या निविदा शासनाच्या निकषामुळे स्थानिक ठेकेदार घेवू शकत नाही हे दुर्देव आहे. त्यामुळे ईटेंडरींग करतांना बाहेरचा ठेकेदाराकडून काम करुन घ्यावे लागेल असे दिसते. मुख्याधिकार्‍यांच्या या हेकेखोर वागण्याबद्दल मी स्वत: जिल्हाधिकार्‍यांशी बोललो पुढे फरक पडला नाहीतर मंत्रीपातळीवर जावून याचा सोक्षमोक्ष लावला जाईल असे त्यांनी सांगितले.

  नगरपालिकेचा कारभार पहातांना कर्मचारी, अधिकार्‍यांना हाताशी घेऊन काम करावे लागते. मुख्याधिकारी सोडल्यांस अधिकारी कर्मचारी हे वहाडणेंना प्रतिसाद देत असल्याचे चित्र असतांना वर्कऑर्डर काढण्याअगोदर ज्या टिपण्या असतात त्यावर नगराध्यक्षांची सही नसतांनाही ती कामे मंजूर झाल्याचे वहाडणे यांनी पत्रकार परिषदेत उघड केले. मर्जीतल्या ठेकेदारंाची कामे करण्यात मुख्याधिकार्‍यांना विशेष रस असून यापूर्वीच्या वर्कऑर्डर निघून अर्धवट कामे केलेल्या ठेकेदारांच्या बिलांच्या थप्प्या नगरपालिकेच्या रेकॉर्डला लागल्या आहेत. 

LEAVE A REPLY

*