Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

कोपरगाव: दहेगाव बोलका येथील जवान सुनील वलटे शहीद

Share

कोपरगाव (प्रतिनिधी)- तालुक्यातील दहेगाव बोलका येथील भारतीय लष्करात नोकरीस असलेले नायब सुभेदार सुनील रावसाहेब वलटे (वय 38) यांना जम्मू-काश्मीर भागातील नवशेरा सेक्टर मध्ये अतिरेक्यांशी लढताना मंगळवारी दुपारी तीन वाजता वीर मरण आले. ही घटना कोपरगाव तालुक्यात समजतात सर्वत्र दुःखाची छाया पसरली आहे. त्यांच्यावर आज गुरुवारी दहेगाव बोलका येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

त्यांच्या मागे आई, वडील, एक भाऊ, एक बहीण, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. सुभेदार सुनील वलटे यांचे वडील रावसाहेब जनार्धन वलटे दहेगाव बोलका येथे शेती करतात. सुनील वलटे यांनी दहावीपर्यंत वीरभद्र विद्यालय दहेगाव येथे शिक्षण घेतले. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी संजीवनी फ्री क्रेडिट ट्रेनिंग सेंटर येथे सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण घेतले. 1999 मध्ये भारतीय लष्करात शिपाई या पदावर भरती झाले. जम्मू काश्मिर, श्रीनगर परिसरात त्यांनी बारा वर्षे सेवा केली. भारतीय सैन्यात त्यांची एकूण वीस वर्षे सेवा झाली. सध्या ते जम्मू-काश्मीरच्या नवशेरा सेक्टरमध्ये कार्यरत होते. त्यांची एक मुलगी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी सीबीएससी माध्यमात इयत्ता आठवीचे शिक्षण घेत आहे तर छोटा मुलगा संत ज्ञानेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल येथे शिक्षण घेत आहे. पत्नी सौ. मंगल या गोधेगाव येथील कोळसे परिवारातील आहे.

सुनील वलटे यांचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ होता. त्यामुळे ते सर्वांना परिचित होते. ही घटना संपूर्ण कोपरगाव तालुक्यात समजताच सर्वत्र दुःखाची छाया पसरली आहे. 2008 मध्ये मुंबईवर अतिरेकी हल्ला झाला त्यावेळी नरीमन हाउस येथे अडकून पडलेल्यांची सुटका करण्यासाठी विकास मुळेकर हे प्यारा मिलिटरी फोर्स अंतर्गत कमांडो म्हणून उतरले होते व त्यांनी नरिमन हाऊसमध्ये अडकून पडलेल्यांची सुटका केली होती. विकास मुळेकर हे अलीकडेच भारतीय लष्करातून निवृत्त झाले आहेत. सुनील व विकास मुळेकर या दोघांनी संजीवनी ट्रेनिंग सेंटर मधून प्रशिक्षण घेतले होते. शहीद सुनील हे मराठा रेजिमेंटमध्ये भरती झाले.

शहीद सुनील यांना जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, खा. सदाशिव लोखंडे, खा. सुजय विखे, आ. स्नेहलता कोल्हे, माजी मंत्री शंकरराव कोल्हे, माजी आमदार अशोक काळे, संजीवनी उद्योगसमूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, आशुतोष काळे, कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, दहिगावचे त्र्यंबक सरोदे, विलास कुलकर्णी आदींनी श्रद्धांजली अर्पण केली. दिवाळीच्या काही दिवस अगोदर ही घटना घडल्याने दहेगाव बोलका परिसरात शोकाकूल वातावरण पसरले आहे. दरम्यान त्यांचे पार्थिव पुणे येथून काल रात्री नऊ वाजता दहेगाव बोलका येथे मूळ गावी आणण्यात येणार होतेे.

सुनील माझा बालपणीचा मित्र होता ,आम्ही दोघेही देशसेवेत अनेक वर्ष सोबत नोकरी देखील केली आहे.सुनीलने मोठा भाऊ यानात्याने मला खूप सहकार्य केले. मी माझा मोठा भाऊ गमावला आहे.त्याला वीर मरण आले असे मरण मला जरी आले असते तरी मला आनंद झाला असता. ज्या आई वडिलांनी जन्म देऊन याला देशसेवेसाठी पाठवलं त्या आईवडिलांचा खरोखर खूप अभिमान आहे.
– शहीद सुनील वलटे यांचा मित्र देविदास गवांदे

आमच्या कुटुंबाची पार्श्वभूमीवर देशसेवेची आहे. आमच्या घरातील अजून एक मुलगा सैन्यात कर्नल असून लहाना देश सेवा करण्याचे स्वप्न पाहत आहे. सुनील हा नायक सुभेदार या पदापर्यंत पोहोचला व देशसेवा करत असताना शहीद झाला.शहीद होणं ही खूप मोठी बाब आहे .त्याच्यावर आम्हाला गर्व आहे.आमच्या कुटुंबाचा मला अभिमान आहे.
– शहीद सुनीलचे चुलते बाबासाहेब वलटे

शासकीय प्रतिनिधी म्हणून तहसीलदार यांनी दहेगाव बोलका येथील स्मशानभूमीची पाहणी करून आसपासचा परिसर स्वच्छ करून घेतला असून अंत्यसंस्कारची संपूर्ण तयारी केली आहे. गावातील प्राथमिक शाळेत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच गोधेगाव ,घोयेगाव, दहेगाव बोलका आदींसह पूर्व भागातील अनेक गावे बंद पाळून शहीद सुनील वलटे यांना श्रद्धांजली वाहणार आहे.

शहीद वलटेंच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च सिद्धिविनायक ट्रस्ट उचलणार
मुंबई- जम्मू-काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये अतिरेक्यांबरोबर झालेल्या चकमकीत वीरमरण आलेले नायब सुभेदार सुनील वलटे यांच्या मुलांच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी सिद्धीविनायक मंदिर न्यास उचलणार आहे. तशी माहिती सिद्धीविनायक मंदिर न्यासाने दिली आहे. शहीद वलटे यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!