Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये प्रशासन मतदानासाठी सज्ज

Share

कोपरगाव (प्रतिनिधी)- कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी प्रशासनाच्यावतीने करण्यात आली असून दिवसभर पाऊस सुरू असताना मतदान यंत्र मतदान केंद्रावर पोहोचविण्याची लगबग सुरू होती. कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये 2 लाख 64 हजार 832 मतदार असून सोमवार दि. 21 ऑक्टोबर रोजी विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान केंद्रावर नागरिकांना मतदान करण्याची वेळ आहे. मतदारसंघांमध्ये 269 मतदान केंद्र असून प्रत्येकी एक याप्रमाणे 269 मतदान यंत्र सज्ज करण्यात आले आहेत. मतदान यंत्रामध्ये बिघाड झाला तर यासाठी 53 मतदार यंत्र राखीव ठेवण्यात आले आहेत. मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 1 हजार 744 कर्मचारी काम करीत आहेत. त्यांच्या वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी तसेच मतदान यंत्र मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी 28 मोठ्या बस, 12 मिनीबस, 5 क्रुझर असे 45 वाहने तर भरारी पथकासह इतर कामासाठी 39 वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदार संघातील मतदान केंद्रासह इतर ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा म्हणून पोलीस यंत्रणा सज्ज आहे. यासाठी 1 पोलीस उपाधीक्षक, 3 पोलीस निरीक्षक,8 सहाय्यक व पोलीस उपनिरीक्षक, 182 पोलीस कर्मचारी, 160 होमगार्ड तसेच राखीव पोलीस दल म्हणून कर्नाटक येथून शंभर पोलिसांचा स्वतंत्र ताफा कोपरगाव मतदार संघात सज्ज ठेवण्यात आला आहे. संपूर्ण मतदान प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी 2 हजार 198 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी राहूल मुंडके सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी योग्य त्या सुविधा पुरवण्यात आल्या. कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत मतदान प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी कोपरगावचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, राकेश माणगावकर यांची पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. रिमझिम पावसाने चिखलमय झालेल्या परिसरांमधून निवडणुकीसाठी आलेली वाहने, शिक्षक कर्मचारी यांची चांगली दाणादाण उडाली. शहरातील सेवानिकेतन विद्यालयात निवडणूक प्रक्रिया राबवण्याच्या यंत्रणेचे वाटप व नियोजन करण्यात आले होते. चिखलमय झालेल्या परिसरातून कर्मचारी काम करीत होते. अशा स्थितीमध्ये कर्मचारी नियुक्त केलेल्या मतदान केंद्रावरती रवाना झाले. शासनाने निवडणूक यंत्रणा सज्ज केली आहे. नागरिकांनी लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके यांनी मतदारांना केले आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!