कोपर्डी अत्याचार प्रकरण : बचाव पक्षाच्या साक्षीदारांच्या यादीत अ‍ॅड. उज्ज्वल निकमांचे नाव

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – कोपर्डी खटल्यामध्ये आरोपीचे वकील बाळासाहेब खोपडे यांनी बचाव पक्षाच्या सहा साक्षीदारांची यादी जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्याकडे सादर केली आहे. या सहा साक्षीदारांमध्ये विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, डॉक्टर राजाभाऊ थोरात (असिस्टंट डायरेक्टर मेडीकल स्टेट ब्युरो हेल्थ इंटेलिजन्स पुणे) जिल्हाधिकारी अभय महाजन, ज्येष्ठ पत्रकार उदय निरगूडकर, डायरेक्टर फॉरेंसिक सायन्स नाशिक यांच्यासह सहा जणांची नावे बचाव पक्षाकडून न्यायालयात हजर करून साक्षीचा अर्ज दाखल करण्यात आला. यावर जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.

गुरूवारी (दि.22) या घटनेतील दुसरा आरोपी संतोष भवाळ याचे जबाब नोंदविण्यात आले. भवाळ याला काही प्रश्‍न विचारण्यात आले. त्यावेळी विचारलेल्या प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर तो नकारात्मक, माहित नाही, केलेले आरोप खोटे आहे, साक्षीदार खोटे आहेत, मी घटनास्थळी नव्हतो. या गुन्ह्याशी माझा काही एक संबंध नाही, मला बळच या गुन्ह्यात गोवण्यात आले आहे अशी उत्तरे देत होता.

त्यावर न्यायालयाने त्यास विचारले की; साक्षीदार तुझ्या विरोधात का बोलत आहेत.. त्यावर तो म्हणाला. साक्षीदार खोटी माहिती देत आहेत. घटना घडण्याच्या वेळी किंवा त्या दरम्यान मी त्या ठिकणी उपस्थित नव्हतो. मला या घटनेविषयी काही माहित नाही, जातीयवाद व राजकीय दबावामुळे मला आरोपी करण्यात आले आहे. त्यामुळे मला साक्षीदार म्हणून विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम व जिल्हाधिकारी अभय महाजन, रवींद्र चव्हाण, डॉ. राजाभाऊ थोरात, डॉ. उदय निर्गुडकर, न्याय वैद्यकीय चाचणी विभागाचे अधिकारी (नाशिक) अशा सहा जणांना तपासायचे आहे. असा अर्ज आरोपी पक्षाचे वकील अ‍ॅड. बाळासाहेब खोपडे यांनी न्यायालयात सादर केला आहे.

तावडेंनी सांगितले होते
अ‍ॅड. निकम गुन्ह्यातील शंका काढत आहेत.
न्यायालयात सहा साक्षीदार तपासण्यासाठी न्यायालयात नावे दिली आहेत. तसेच न्यायालयात एक सीडी देखील दाखल केली आहे. त्यात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दोषारोपपत्र दाखल होण्याच्या आधीच एका वृत्तवाहिनीवर मुलाखतीत सांगितले होते की, अ‍ॅड. निकम हे गुन्ह्यातील शंका भरुन काढत आहेत. त्यामुळे हा गुन्हा रचण्यात आला आहे. म्हणून काही साक्षीदार तापासण्यात येणार आहे. भवाळ हा कोपर्डीचा नाही हे आधारकार्ड व रेशनकार्डे यांच्या आधारे न्यायालयात सिद्ध केले आहे. तर मोर्चे निघाल्यानंतर दबावाखाली भवाळला आरोपी करण्यात आले आहे.
– अ‍ॅड. बाळासाहेब खोपडे (आरोपी पक्षाचे वकील)

 

अ‍ॅड. निकम आज म्हणणे मांडणार – अ‍ॅड. निकम आज म्हणणे मांडणार  या अर्जानंतर न्यायालयाने सरकार पक्षाचे वकील अ‍ॅड. निकम यांचे काय म्हणणे आहे अशी विचारणा केली  आहे. यावर आज अ‍ॅड. निकम म्हणणे मांडणार आहे. आरोपी पक्षाच्या या मागणीमुळे एकच खळबळ उडाली असून या प्रकरणात नेमके काय होईल हे चित्र आज स्पष्ट होणार आहे. या खटल्याचे कामकाज आज नियमितपणे चालणार आहे.

LEAVE A REPLY

*