राजकीय दबाव व आक्रोश मोर्चामुळे दोघांना गोवले

0

वकिलांचा आरोप

अहमदनगर (प्रतिनिधी) –  कोपर्डी अत्याचार व खून प्रकरणात आरोपी नितीन भैलुमे या आरोपीचे फिर्यादीत नाव नाही तसेच पुरवणी जबाबातही नाव नाही. पोेलीस अधिकार्‍यांनी भैलुमेचे नाव वगळण्यासाठी बैठका देखील घेतल्या होत्या. मात्र, राजकीय दबाव व जिल्ह्यात व राज्यात निघालेल्या आक्रोश मोर्चांमुळे भैलुमे यास आरोपी करण्यात आले आहे. असा युक्तीवाद आरोपी पक्षाचे वकील अ‍ॅड. प्रकाश आहेर यांनी न्यायालयात केला. भवाळ प्रकरण यापेक्षा वेगळे नाही असे अ‍ॅड. खोपडे यांनी सांगितले. आज नियमित कामकाज चालणार आहे.
सोमवारी (दि.22) जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू आहे. काल घटनेचे मुळ तपासी अधिकारी शिवाजी गवारे यांची उलटतपासणी घेण्यात आली. अ‍ॅड. खोेपडे यांनी स्टेशन डायरी, घटनास्थळाचा पंचनामा व साक्षीदारांचा जबाब हे अनेकवेळा बदलले असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक गवारे यांनी केला नसल्याचे खोपडे यांनी न्यायालयास सांगितले. दोषारोपपत्रात घटनास्थळाचे अनेक फोटो काढण्यात आले आहेत.

त्यातील केवळ एकाच फोटोत लिंबाचे झाड आहे. बाकीच्या फोटोत लिंबाचे झाड नाही. पीडित मुलीस ओढत नेल्याचे तपासात काय निष्पन्न झाले अशी विचारणा केली असता गवारे यांना काही सांगता आले नाही. त्यामुळे स्टेशन डायरी, तपास, जबाब, साक्ष यात वेगवेगळी तफावत असल्याचा आरोप अ‍ॅड. खोपडे यांनी केला आहे.
अ‍ॅड. आहेर यांनी तपासी अधिकारी गवारे यांची उलटतपासणी घेतली, आरोपी नितीन भैलुमेला कशाच्या आधारे अटक करण्यात आली आहे. त्यावर गवारे म्हणाले,त्याचे नाव काही साक्षीदारांनी घेतले होते. अ‍ॅड. खोपडे म्हणाले, दत्ता सुुद्रीक याने घटनेच्या वेळी काही अन्य लोकांना त्याच रस्त्यावरुन जे-जा करताना पाहीले होते. त्यांचे जबाब तुम्ही नोंदविले आहेत का? आरोपी भैलुमेचे फिर्यादीत नाव आहेत का? पुरवणी 3 चे जबाबात नाव आहे का? त्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे गवारे यांनी नकारात्मक दिली.
अ‍ॅड. आहेर म्हणाले की, घटनेतील काही साक्षीदारांवर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झालेले आहेत. याचे पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले आहेत. तसेच यातील काही साक्षीदार कोपर्डीमध्ये अवैध धंदे करीत असल्याचे पुरावे देखील न्यायालयात सादर करण्यात आल्याची माहिती अ‍ॅड. खोपडे यांनी दिली. त्यामुळे नितीन भैलुमे हा सुशिक्षीत तरूण आहे. तो शिक्षणासाठी पुण्यात राहतो, त्याचा कोपर्डीशी व या घटनेची काही संबंध नाही. त्यास राजकीय दबाव व मोर्चे यामुळे बळच या प्रकरणात गोवण्यात आले आहे असा युक्तीवाद अ‍ॅड. आहेर यांनी केला. आज या खटल्याची पुढील सुनावणी नियमीत चालणार आहे.
कुरूंद यांची साक्ष होणार
कोपर्डी खटल्याची सुनावणी सुरू झाल्यानंतर पोलिसांचा तपास, जबाब, साक्ष, दोषारोपपत्र, आरोपी, पुरावे अहवाल अशा अनेक त्रुटी निघाल्या, तर काही ठिकाणी साक्षीदारांच्या यादीत नावे नसलेल्या काही साक्ष महत्वाच्या होत्या. मात्र त्या रेकॉर्डवर नसल्यामुळे वादात्मक ठरल्या. अशाच एका पोलीस कर्मचार्‍याची साक्ष घेण्याची विनंती अ‍ॅड. निकम यांनी न्यायालयाला केली होती. ती न्यायालयाने मंजूर केली आहे. आज पोलीस कर्मचारी कुरूंद यांची साक्ष होणार आहे.
आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ व नितीन भैलुमे यांनी घटनेच्या दरम्यान जे मोबाईल वापरले होते. त्यात आयडीया व एअरटेलचे सिमकार्ड होते. त्याची तपासणी करणार्‍या नोडल अधिकार्‍यांची आज सरतपासणी व उलटतपासणी घेण्यात आली. सरकार पक्षाचे वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी विचारले की, घटनास्थळापासून टॉवर किती अंतरावर आहे, आरोपींनी विकत घेतलेले मोबाईल व सिमकार्ड कोणाच्या नावावर आहेत. त्यानंतर आरोपी पक्षाच्या वतीने उलटतपासणी घेण्यात आली.

आरोपी जितेंद्र शिंदे याच्या वतीने योहान मकासरे यांचे सहायक वकील म्हणून अ‍ॅड. सागर तिडके व अ‍ॅड. गोकुळ बिडवे यांनी काम पाहीले. अ‍ॅड. तिडके यांनी नोडल अधिकार्‍यांची उलटतपासणी घेतली. आरोपींनी घटनेच्या दरम्यान जे संभाषण केले. त्याची सीडी आपल्याकडे आहे का? असा प्रश्‍न केला असता अधिकारी म्हणाले, अशा प्रकारची सीडी उपलब्ध नाही.

आरोपी घटना घडण्याच्या वेळी कोणत्या अचुक ठिकाणी उभे होते, याची माहीती सांगता येर्ईल का? असा प्रश्‍न अ‍ॅड. आहेर यांनी केला. त्यावर अधिकारी म्हणाले, खेड्याच्या ठिकाणी एकाच टॉवरची रेंज 5 ते 6 किलोमीटर अंतरावर जाते. त्यामुळे अचुक लोकेशन सांगणे शक्य नाही.

आरोपी पक्षास दोेन हजार दंड
तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक गवारे यांची उलटतपासणी घेण्यासाठी मागील सुनावणीला आरोपी संतोष भवाळ याचे वकील अ‍ॅड. बाळासाहेब खोपडे गैरहजर राहीले होते. त्यामुळे न्यायालयाने दोन्ही आरोपींचे काम पाहण्यासाठी अ‍ॅड. मकासरे यांची नेमणुक केली होती. आज अ‍ॅड. खोपडे हजर झाल्यामुळेे त्यांनी गवारे यांची उलटतपासणी घेण्याची विनंती केली. न्यायालयाने त्यांना परवानगी दिली, मात्र आरोपी पक्षास दोन हजार रूपये दंड केला आहे.

 

LEAVE A REPLY

*