कोपर्डी : आता भय संपले….

0
आरोपींना फाशी देण्याच्या मागणीसाठी मराठा समाजाच्यावतीने नगर जिल्ह्यासह राज्यभरात 58 महामोर्चे काढण्यात आले होते. न्यायालयाने फाशी दिल्याने सर्वत्र स्वागत होत आहे.
  • स्पेशल स्टोरी, सागर शिंदे

बहुचर्चीत कोपर्डी खटला राज्यभर गाजला. काय होईल शिक्षा याची प्रत्येकाच्या मनात धाकधूक होती. या खटल्याच्या एकूण 43 सुनावण्या झाल्या, त्यात एकही साक्षीदार फितूर झाला नाही. त्यामुळे तिघांना फाशीच्या फंद्यापर्यंत नेणे शक्य झाले. यात जे साक्षीदार महत्वाचे होते. ते न्यायाचे खरे शिलेदार ठरले आहे. त्यामुळेच जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ व नितीन भैलुमे यांना फाशीची शिक्षा होणे शक्य झाले आहेत. गुन्ह्यात भवाळ व भैलुमे या दोघांनी दिग्दर्शक म्हणून पडद्याआडची भुमिका पार पाडली आहे. तर शिंदे खरा खलनायक होता. मात्र 31 साक्षीदारांनी सगळ्यांनाच मैदानात घेऊन त्यांच्या गळ्यात कुकर्मचा फास टाकला आहे. त्यामुळे ‘आता इथले भय संपले’ आहे.

मुख्य आरोपी जितेंद्र शिंदेला शिक्षा
विनयभंग (345) तीन वर्षे
अत्याचार (376) जन्मठेप व 20 हजार रुपये दंड
खून (302) फाशी (मृत्युदंड)
वरील दंड न भरल्यास 3 वर्षे साधी कैद.

संतोष भवाळ यास शिक्षा
विनयभंग (345) तीन वर्षे
अत्याचार (376) जन्मठेप
गुन्ह्यास प्रवृत्त करणे (109) जन्मठेप
गुन्ह्याचा कट रचणे (120 (ब)) जन्मठेप व 20 हजार दंड. खून (302) व प्रवृत्त करणे व कट रचणे फाशी (मृत्युदंड) वरील दंड न भरल्यास 3 वर्षे साधी कैद, तसेच सुनावणी दरम्यान वकील गैरहजर राहिल्यामुळे 18 हजार रुपये झालेला दंड महसुल खात्याने वसूल करावा.

नितीन भैलुमे यास शिक्षा
विनयभंग (345) तीन वर्षे
अत्याचार (376) जन्मठेप
गुन्ह्यास प्रवृत्त करणे (109), गुन्ह्याचा कट रचणे (120 (ब)) व खून (302) यात फाशी (मृत्युदंड) तसेच 20 हजार दंड. दंड न भरल्यास 3 वर्षे साधी कैद.

 

फाशीसाठी मांडलेले 13 मुद्दे –
आरोपींनी 11 ते 13 जुलैपर्यत घटनेचा कट रचला व त्यानुसार शिंदेने अत्याचार केला. तर भवाळ व भैलुमे याने त्यास सहाय केले होते.
11 जुलैला निर्भया व मैत्रीण सायंकाळी 5 वाजता चारी रोडने पायी घराकडे जात होते. तेव्हा. शिंदे, भैलुमे व भवाळ या तिघांनी निर्भायाची छेड काढली होती.
निर्भयावर तिघे पाळत ठेऊन होते. ती शाळेतून येत असताना शिंदेने तिच्यावर अत्याचार करण्यासाठीच तिचा हात ओढला होता.
जितेंद्र शिंदे छेडछाडीचे राक्षसी कृत्य करीत असताना दोघे हसून आनंद घेत होते. तर त्याला गुन्हा करण्यासाठी प्रेरीत करीत होते. त्यामुळे ते 109 कलमामध्ये बसतात.
निर्भयाची मैत्रीण रडल्यामुळे मोठा आवाज झाला. कोणी छेडछाड करतांना पाहिले तर अडचण नको. म्हणून, चल हिला आपले नंतर कामच दाखवू असे दोघे म्हणाले होते.
13 जुलैला सायंकाळी 7 वाजता जितेंद्र शिंदे अत्याचार करण्यासाठी गेला तेव्हा. संतोष भवाळ व नितीन भैलुमे रस्त्यावर पहारा देत होते.
घटना घडली तेव्हा निर्भयाच्या पालकांनी जितेंद्र शिंदेला घटनास्थळाहून पळतांना पाहिले. पप्प्या थांब कोठे पळतोस असा आवाज दिला होता.
जितेंद्र शिंदे हा अत्याचार करुन आल्यानंतर तिघांना पळ काढण्यासाठी अडथळा येऊ नये. यासाठी भवाळ व भैलुमेने शिंदेची दुचाकी बाभळीखाली सोईच्या ठिकाणी लपविली होती.
निर्भयाचे कपडे, चपला, डोक्याचे बेल्ट, मसाला, हे दक्षिणेला पडलेले होते. तर निर्भयाचा मृतदेह उत्तरेला मिळून आला. हा घटनाक्रम पाहता हे कृत्य एकट्याने करणे शक्य नाही. त्यामुळे भवाळ व भैलुमे हे देखील त्यात आरोपी आहेत.
निर्भयाला रुग्णालयात दाखल केले तेव्हा तिच्या अंगावर दातांचे व्रण होते. हे व्रण डॉ. देशपांडे यांनी तपासले होते. त्याचे नमुने शिंदेच्या दातांशी मिळते जुळते निघाले.
घटना घडत असताना निर्भयाने आरोपीस विरोध केला. मात्र त्याच्या राक्षसी कृत्यासमोर तिचा ठाव लागला नाही. त्यावेळी तिचे दोन्ही हात कोपर्‍यापासून निखळलेले होते.
अत्याचार व खून केल्यानंतर मुख्य आरोपी शिंदेने नितीन भैलुमे यास 30 सेकंदाचा कॉल केला आहे. त्यामुळे ही दोघे देखील तेथेच दडलेले. होते. त्यांनी मिसकॉल म्हणजे, सांकेतीक भाषेचा वापर केला होता.
जितेंद्र शिंदेला घटनास्थळी पाहिले. तेव्हा, तो पळाला मात्र त्याला अत्याचार करीत असतांना शिंदेच्या गळ्यातील व हातातील माळ झटापटीत घटनास्थळी पडली होती. ती मिळून आली.

106 अत्याचार –
13 जुलै ते 30 ऑगस्ट 2016 या काळात सर्वाधिक म्हणजे 66 महिलांच्या छेडछाड काढण्यात आल्या. तर 24 बाल लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले. 8 महिलांवर अत्याचार झाले तर 4 अल्पवयीन मुली अत्याचाराच्या बळी पडल्या. तर याच काळात कोपर्डी पोलीस ठाण्यात दोन विनयभंग, एक खून, अत्याचार असे गुन्हे दाखल झाले आहेत.

…त्या जखमा
दोन्ही हात निखळलेले, छातीवर ओरखडे, डावा खांदा निखळलेला, मानेवर काळेनिळे व्रण, गुढग्यावर जखमा, घोट्यांना खरचटलेलं, पाठीवर दातांचे व्रण, गुप्तभागावर दातांचे व्रण, दोन्ही मांड्या सुजलेल्या, गळ्याला काळे व्रण, पोटरीवर रक्त गोठलेेले, हातांवर ओरबडलेले, नाकातून रक्तस्त्राव, खालचा ओठ चावे, वरचा ओठ सुजलेला, हाताची ढोपरे सोलपटलेली.

कोपर्डीच्या न्यायाचे शिलेदार…!

शिवाजी गवारे (पोलीस निरीक्षक)
घटनास्थळाचा पंचनामा केला. जितेंद्र शिंदेची दुचाकी हस्तगत केली. पीडित मुलीला रुग्णालयात नेले. फिर्याद घेतली होती. घटनास्थळी उपस्थित झालेल्या चौघांचे जबाब घेतले. पहिले तपासी अधिकारी असल्यामुळे घटनाक्रमाची संपूर्ण माहिती होती. बहुतांशी जबाब गवारे यांनी नोंदविले होते. आरोपी जितेंद्र शिंदे, नितिन भैलुमे व संतोष भवाळ तिघांना यांनीच अटक केली होती. मुख्य म्हणजे शिंदेच्या अंगावरील रक्ताचे कपडेेे, चपला, माळ गवारे यांनीच पंचांच्या समक्ष जप्त केली. यामुळे त्यांची साक्ष महत्वाची ठरली.

शशिराज पाटोळे (पोलीस निरीक्षक)
20 जुलैला तपास हाती घेतल्यानंतर, पाटोळे यांनी तिघ आरोपींना आगाऊ पोलीस कोठडी घेतली. अत्याचार कसा केला याचे प्रात्यक्षिक करून घेतले. आरोपींनी छेडछाड केेली होती. ही घटना पाहणार्‍या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचा शोध घेतला. त्यांचे जबाब घेतले. त्यामुळेच तर तिघांवर 120 (ब) व भवाळ व भैलुमे यांच्यावर 109 हा गुन्ह्यास प्रवृत्त करणारा कलम लावले. तसेच आरोपींची नार्को, दंत तपासणी, वैद्यकीय अहवाल, आरोपीच्या घरातून अश्‍लिल सीडी जप्त असा सखोल तपास करुन 86 दिवसात दोषारोपपत्र दाखल केले.

डॉ. हेमलता देशपांडे (दंतचिकित्सक)
पीडित मुलीच्या अंगावर जे दातांचे व्रण होते. त्याची मुंबईच्या डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात देेशपांडे यांनी असे म्हणले की, भैलुमे, भवाळ यांच्या दातांचे नमुने पीडित मुलीच्या अंगावर असणार्‍या व्रणशी जुळत नाही. मात्र, जितेंद्र शिंदे याच्या दातांचे व्रण तंतोतंत जुळतात. हा महत्वाचा पुरावा न्यायालयाने ग्राह्य धरला आहे. हा पुरावा शिंदेला थेट फासावर घेऊन गेला.

डॉ. दयानंद पवार (कोपर्डी)
पीडित मुलीचा केसपेपर काढण्यात आला. ती मयत असल्याची खात्री झाल्यानंतर रात्री पंचनामा करण्यात आला. दुसर्‍या दिवशी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले. पीडित मुलीच्या अंगावर एकूण 26 जखमा होत्या. तर अंगावर ओरखडे देखील होते. शरीरावर चावे होते. तसेच हा नैसर्गिक मुत्यू नसल्याचे पवार यांनी सांगितले. त्यामुळे पवार यांची साक्ष महत्वाची ठरली.

नामदेव तोरडमल (दुचाकी दुकानदार)
11 जुलैला जितेंद्र शिंदे याने 45 हजार रूपये देऊन दुचाकी खरेदी केली. उरलेली रक्कम तो नंतर देणार होता. रक्कम बाकी असल्यामुळे त्यांची लेखी नोंद (बिल) तयार केले नव्हते. घटनास्थळी पोलिसांनी जी दुचाकी हस्तगत केली आहे. ती विकत घेतलेलीच दुचाकी आहे. या गाडीची चेसी व इंजिन नंबर खरेदी केलेल्या गाडीचाच आहे. तोरडमल यांच्या साक्षीमुळे शिंदे हाच घटनास्थळाहून पसार झाला. त्याची दुचाकी तेथेच राहिली. जी संतप्त ग्रामस्थांनी पेटून दिली. त्यामुळे ही साक्ष देखील न्यायालयाने ग्राह्य धरली आहे.

नवनाथ पाखरे
15 जुलैला पाथरे हे भाजीपाला विकण्यासाठी पुण्याला गेले होते. त्यावेळी त्यांची भेट दत्तात्रय सुद्रिक यांच्यासोबत झाली. तेव्हा त्यांनी सुद्रिक यांना सांगितले. कोपर्डीत एका मुलीवर अत्याचार करुन तिला ठार मारण्यात आले आहे. ही घटना जितेंद्र शिंदे याने केली आहे. त्यावर सुद्रिक म्हणाले की, 13 जुलैला सायंकाळी 7 वाजता बाबासाहेब सुद्रीक व मी (दत्तात्रय) हे चारी पुलावर बसलो होतो. तेव्हा शिंदे, भवाळ व भैलुमे ही तिघे रोडने चकरा मारत होते. तेव्हा बाबासाहेब यांनी तिघांना विचारले. इकडे काय करीत आहात. तेव्हा तिघे म्हणाले. आम्ही चावी शोधत आहोत. या माहितीमुळे पाखरे यांची विशेष साक्ष घेण्यात आली होती. त्यामुळे दत्ता सुद्रिक यांच्या साक्षीला महत्व आले होते.

संजय लोखंडे (ठाणेअंमलदार)
घटना घडली तेव्हा कर्जत पोलीस ठाण्यात संजय लोखंडे ठाणे अंमलदार होते. 13 जुलैला रात्री 10:41 वाजता पोलीस ठाण्यात फोन आला. कोपर्डीत एका मुलीवर अत्याचार करुन तिला कोणीतरी ठार मारले आहे. याची नोंेद त्यांनी स्टेशन डायरीला घेऊन पीआय गवारे यांना सांगितले. याबाब 26, 27, 28 क्रमांकाच्या नोंदी घेतल्या आहेत. फिर्याद गवारे यांच्या हस्ताक्षरात आहे. तर नोंदी माझ्या हस्ताक्षरात आहे. असे लोखंडे यांनी जबाबात म्हटले आहे.

महादेव ढगे (कर्जत तलाठी)
घटनास्थळी दक्षिणेला गुलाबी रंगाची नॅपकीन, काळ्या रंगाची पॅन्ट, फाटलेला ड्रेस तर उत्तरेला चप्पल, हेअर बँण्ड अशा वस्तू मिळून आल्या. त्यामुळे कपडे व अत्याचाराची जागा. या एकमेंकाच्या विरुद्ध अंतरावर आहे. एक व्यक्त हे कृत्य करू शकत नाही. त्यामुळे या तिघांनी कट करुन ही घटना केल्याचा युक्तीवाद अ‍ॅड. निकमांनी केला. ढगे म्हणाले, पुढे सायकल, कॅरेजला बांधलेला मसाला, रक्ताने माखलेेले कपडे, उत्तरेला खुर्दळलेली जागा, आरोपीची चप्पल अशा वस्तू पोलिसांनी हस्तगत केल्या. ढगे यांची साक्ष 120 (ब) हा कलम लागण्यास प्रबळ ठरली आहे.

श्रीकांत दातीर (लिपीक)
मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याच्या अंगावरील कपडे जप्त करण्यात आले, तेव्हा दातीर पंच होते. शिंदेच्या अंगात हिरव्या रंगाचा फुल बाह्यांचा लालसर रंगाच्या रेघा असणारा शर्ट घातलेला होता. शर्टच्या बाह्यावर मनगटाजवळ रक्ताचे दाग लागलेले होते.त्यावर मातीचे दाग होते. तसेच त्याच्या बनियेलवर देखील रक्ताचे दाग होते. या जबाबामुळे डिएनए तपासण्यात मदत झाली. यामुळे घटनास्थळी शिंदेच होता, हे स्पष्ट झाले.

दत्तात्रय सुद्रीक (भाजीपाला व्यापारी)
घटना घडण्याच्या आधी 13 जुलैला बाबासाहेब सुद्रिक व दत्तात्रय हे चोरी रोडच्या पुलावर बसले होते. तेव्हा तिघे आरोपी याच रोडहून फिर्‍या मारत होते. तेव्हा बाबासाहेब यांनी विचारणा केली. त्यावर आरोपी म्हणाले, आम्ही चावी शोधत आहोत. मात्र, आम्ही दुर्लक्ष केले. त्याच दिवशी दत्तात्रय पुण्याला निघून गेले. घटनेनंतर दोन दिवसांनी नवनाथ पाथरे पुण्याला गेल्यानंतर त्यांनी सुद्रिक यांना घडलेली घटना सांगितली. त्या क्षणी त्यांना आरोपी चारी रोडवर चकरा का मारत होते. याचा संशय आला. व त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन साक्ष दिली. या साक्षीमुळे महत्वाचा 120 (ब) य 109 चा आरोप सिद्ध करण्यास मदत झाली आहे.

संदीप सुद्रिक (विटभट्टी मालक)
आरोपी शिंदे यास संदीप यांनी दुचाकी घेण्यासाठी 40 हजार रुपये दिले होते. जी दुचाकी गुन्ह्यात वापरलेली आहे. शिंदे याने 11 जुलैला नवी दुचाकी घेतली. ती दाखविण्यासाठी संदीप यांच्याकडे गेला होता. त्यावेळी शिंदेच्या गळ्यात व हातात काळ्या व निळ्या मन्यांची माळ होती. हिच माळ घटनास्थळी मिळून आली आहे. ती संदीप यांनी ओळखली आहे. त्यामुळे जितेंद्र शिंदे हाच घटनास्थळाहुन पळाला हे सिद्ध झाले आहे. ही माळ त्यास फाशीपर्यंत घेऊन गेली.

सुधाबाई सुद्रीक
घटना घडण्याच्या दिवशी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास सुधाबाई या चारी रोडवर बांधलेली शेळी घरी आणण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी संतोष भवाळ व नितीन भैलुमे ही दोेघे एक दुचाकी घेऊन आडोशाला उभे असल्याचे पाहिले. सुधाबाई यांनी विचारले, तुम्ही दोघे इकडे कशाला चालला आहात. त्यावेळी ते म्हणाले गावाकडे चाललो आहे. या घटनेला अधोरेखीत करत अ‍ॅड. निकम म्हणाले, शिंदे अत्याचार करीत होता. तेव्हा ही दोघेे जवळच आसपास होती. याचा अर्थ ते शिंदेला संरक्षण देत होते. रोडवर पहारा घालत होते. शिंदेने अत्याचार केल्यानंतर या दोघांनाही अत्याचार करायचा होता. मात्र, योग्य संधी मिळाली नाही. म्हणून हे दोघे कटात सहभाग आहेत. त्यांच्या युक्तिवादानंतर तिघे शिक्षेस पात्र ठरले आहेत. त्यामुळे ही साक्ष अत्यंत महत्वाची ठरली.

पीडितेची बहिण
घटनेच्या एक दिवस आधी म्हणजे 12 जुलैला निर्भयाची मुलीची बहिण कॉलेजहुन दुपारी 2 वाजता आली होती. तेव्हा निर्भया शाळेत गेलेली दिसली नाही. म्हणून तिला विचारणा केली. त्यावर आईने सांगितले तिला बरे नसेल. त्यानंतर 13 जुलैला देखील ती घरातच झोपलेली दिसली. म्हणून तिला 4 वाजता विचारणा केली. तेव्हा निर्भयाने उत्तरे दिले. जितेंद्र शिंदे हा मला त्रास देतो. त्याच्या सोबत नितीन भैलुमे व संतोष भवाळ देखील असतात. शिंदे हा घाणेरड्या शब्दात बोलतो व दोघे मोठ्याने हसतात. 11 जुलैला सायंकाळी शिंदेने मला आडवून चारी रोडवर ओढले व थांब तुला आता मी माझं कामच दाखवितो, असे म्हणून गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला, तर दोघे हसत होते. यावेळी मैत्रीण मोठ्याने ओरडली. म्हणून भैलुमे व भवाळ म्हणाले आपण हिला आपले कामच दाखवू. त्यामुळे ती शाळेत जात नव्हती. या जबाबामुळे तिनही आरोपींना अ‍ॅड. निकम यांनी या कठोर शिक्षेपर्यंत नेले आहे. त्यामुळे ही साक्ष घटनाचा कणा ठरली.

पीडितेची मैत्रीण
ही मैत्रीण निर्भयाची पाचवीपासूनची सोबती आहे. घटना घडल्यानंतर तिच्या वडीलांनी ही माहिती दिली होती. ती ऐकून मैत्रिणीला धक्का बसला. तिने वडीलांना सांगितले. जितेंद्र शिंदे याने परवा (दि.11 जुलै) निर्भयाला अडविले होते. तो म्हणाला होता, तुला आता मी माझं कामच दाखवितो. त्याने ठरल्याप्रमाणे कृती केली. तसेच अन्य दोघे शिंदेच्या कृतीकडे पाहुन हसत होते. त्यामुळे तिघांनी मिळून हे कृत्य केले हे मैत्रीणीच्या साक्षीतून सिद्ध केले आहे. कट, छेडछाड व गुन्ह्यास प्रवृत्त केले हा कलमांसाठी ही मैत्रीण प्रत्यक्षदर्शी साक्षीदार ठरली आहे. त्यामुळे या घटनेत मैत्रिण ही न्यायाचा आत्मा ठरली आहे.

भाऊसाहेब सुद्रिक
मसाला आणण्यासाठी गेलेली निर्भया घरी येईना म्हणून तिचे आई व बहिण भाऊसाहेब सुद्रिक यांनी रस्त्यात भेटले होते. त्यावेळी त्या म्हणाल्या, निर्भया दिसली तर घरी पाठवुन द्या. मात्र, थोडे पुढे जाताच तिची सायकल चारीच्या कडेला पडलेली दिसली. ती उचलली व निर्भयाला आवाज देऊ लागलो. भाऊचे मित्र शिवराम हे हातातील बॅटरी लावून थोडे पुढे चालत गेले. तोच एक तरूण त्यांना दिसला. त्याच्या चेहर्‍यावर प्रकाश मारला असता. तो पप्पू उर्फ जितेंद्र शिंदे असल्याचे समजले. शिवराम यांनी आवाज दिला. पप्प्या तू येथे काय करतो, थांब असे म्हणताच त्याने घटनास्थळाहून पळ काढला. यावेळी त्याची चप्पल तेथेच पडली. या साक्षीत शिंदेला घटनास्थळी पहाणारे पाच साक्षीदार होते. त्यामुळे त्याच्या गळ्या भोवतीचा फास त्याच दिवशी आवळला गेला होता. यावर अ‍ॅड. निकमांनी जोरदार युक्तीवाद केला व फाशीवर शिक्कामोर्तब केले आहे.

बाबासाहेब कायगुडे (वर्गशिक्षक)
शिक्षक निर्भयाला चांगले ओळखत होते. कारण ती अभ्यासात हुशार होती. डान्स, खो-खो यात पारंगत होती. 1 जुलै ते 11 जुलै पर्यत निर्भया शाळेत नियमीत हजर होती. मात्र, 12 व 13 जुलैला गैरहजर होती. तशी हजेरी पत्रकावर नोंद आहे. यावर अ‍ॅड. निकम म्हणाले, याच काळात पीडित मुलगी शाळेत गेली नाही. याचे कारण तिने बहिणीस सांगितले होते की या आरोपींपासून मला धोका आहे. त्यामुळे छेडछाडीच्या भितीपोटीच ती गैरहजर होते हे निकमांनी सिद्ध केले. यातून निर्भया भेदरलेल्या अवस्थेत जगत असल्याचे सिद्ध करण्यात आले.

मिलिंद कोेडवडकर व दत्तात्रय आंग्रे
(सिमकार्ड अधिकारी)
घटना घडण्याच्या आधी तसेच घटना घडल्यानंतर जितेंद्र शिंदे याने नितीन भैलुमे याला फोन केलेला नाही. मात्र, 30 सेकंदाचा मिसकॉल दिलेला आहे, असे सांगितले. या मुद्याला अधोरेखीत करीत अ‍ॅड. निकम म्हणाले, मिसकॉल ही एक सांकेतिक भाषा होती. मी मिसकॉल देईल. त्यानंतर तुम्ही यायचे. मात्र, घडले वेगळेच. त्यामुळे आरोपी हे घटनेच्या वेळी याच परिसरात शिंदेच्या संरक्षणासाठी बसले होते. त्यांना संधी मिळाली नाही. नाहीतर या दोघांनीही पीडितेवर अत्याचार केला असता. त्यामुळे ही दोघे कटात सामील असून त्यांनी शिंदेला गुन्हा करण्यात प्रोत्साहीत केले. हे सिद्ध करुन दिल्यामुळे दोघांनाही या शिक्षेला सामोरे जावे लागले.

भाऊसाहेब कुरूंद (पोलीस)
घटनेनंतर मुख्य आरोपी शिंदे हा पसार झाला. त्याला शोधण्यासाठी पथक रवाना झाले होते. यावेळी सायंकाळी पोलीस निरीक्षक गवारे यांनी फोन करुन सांगितले की, आरोपी हा श्रीगोंदा बस स्थानकावर येणार आहे. त्यावेळी कुरुंद यांच्यासह अन्य दोघांनी बस स्थानकावर सापळा रचून जितेंद्र शिंदे यास अटक केली. त्यामुळे गुन्हा करणाराच व्यक्ती पसार होऊ शकतो. त्यामुळे शिंदे गुन्हेगार आहे. हे सिद्ध करण्यास ही साक्ष सहाय ठरली. या सर्वांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या आहेत.

 

 

 

LEAVE A REPLY

*