कोपर्डी प्रकरण : आरुषी हत्याकांडासारखा कोपर्डीचा घटनाक्रम काल्पनिक

0

अ‍ॅड. खोपडेंचा आरोप, अ‍ॅड. आहेरांचा युक्तीवाद सुरू

अहमदनगर (प्रतिनिधी) – जगप्रसिद्ध आरुषी हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी काल्पनिक पुरावे तयार केले होते. त्यात आरुषीच्या आई वडिलांनाच दोषी धरून जन्मठेप झाली होती. मात्र दोघांना वरिष्ठ न्यायालयाने निर्दोष मुक्त केले होते. त्यामुळे कोपर्डी प्रकरणात देखील पोलिसांनी काल्पनीक पुरावे सादर केले आहेत.
घटनाक्रम बनावट तयार केला आहे. त्यामुळे आरुषी खटल्याप्रमाणे निरापराधांना शिक्षा होऊ नये. अशी अपेक्षा अ‍ॅड. विजयालक्ष्मी खोपडे यांनी व्यक्त करून आरुषी हत्याकांडाचा दाखला न्यायालयात दिला आहे. आज बुधवारी (दि.1) खोपडे यांचा अंतीम युक्तीवाद पूर्ण झाला. तर तिसरा आरोपी नितीन भैलुमे याचे वकील अ‍ॅड. प्रकाश आहेर यांनी युक्तीवाद सुरू केला आहे. पुढील सुनावणी बुधवार दि. 8 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
कोपर्डी खून व अत्याचार खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर सलग सहा दिवस सुरू होती. बुधवारी आरोपी संतोष भवाळ याचे वकील अ‍ॅड. खोपडे यांनी युक्तीवाद केला. त्यांनी अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्या 24 मुद्यांवर आरोप केले. अ‍ॅड. निकमांची नियुक्ती ही बेकायदेशीर आहे. हे स्पष्ट करण्यासाठी खोपडे यांनी वरिष्ठ न्यायालयाचे दोन दाखले दिले.
त्यांनीच साक्षीदार तयार केले आहेत. त्यांच्या जबाबात तथ्य नाही. त्यांनी जे सांगितले आहे. त्यावर विश्वास ठेवायला ते देव नाहीत. न्यायालय कागदपत्रे, पुरावे यांच्यावर चालते. त्यामुळे कोणी कितीही काल्पनिक घटनाक्रम तयार केला तरी, आम्हाला योग्य न्याय मिळेल. दोषारोपपत्रात जे सरकारी रजिस्टरचे पुरावे आहेत.
त्यातील ग्रामपंचायत, पोलीस ठाणे, रुग्णालय, अहवाल व शाळा या सर्वांमध्ये खाडाखोड करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक पुरावा तयार करण्यात आलेला आहे. तसेच घटनास्थळाचा नकाशा हा आठ ते नऊ महिने अ‍ॅड. निकमांच्या ताब्यात होता. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर तो पोलिसांकडे देण्यात आला आहे. तसेच घटनास्थळी फॉरेन्सीक लॅबचे पथक आले होते. याचा कोठेही उल्लेख नाही. स्टेशनडायरीला नोंद नाही. त्यांनी घटनास्थळी जप्त केलेला मुद्देमाल नाही. त्यापैकी एकाचाही जबाब नाही.
घटना घडल्यानंतर पोलिसांना घटनास्थळाहून एका व्यक्तीचा पोलीस ठाण्याच्या लॅण्डलाईन फोनवर फोन आला होता. तो फोननंबर पोलिसांनी कसा नोंद केला. स्टेशनडायरीत अन्य कोणत्याही गुन्ह्यांत खाडाखोड दिसत नाही. मात्र कोपर्डी खटल्याच्या नोंदींमध्ये मोठ्या प्रमाणावर खाडाखोड करण्यात आली आहे. तसेच जी स्टेशनडायरी न्यायालयात दाखल केली.
तिच्यावर पोलीस ठाण्याचा शिक्का नाही. पोलिसांनी या घटनेत पोक्सोचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र पीडित मुलगी अल्पवयीन होती. याचा कोणताही पुरावा सादर करण्यात आला नाही. घटनास्थळी आरोपीच्या गळ्यातील व हातातील निळ्या व लाल रंगाची माळ हस्तगत केल्याचे म्हटले आहे. मात्र घटना घडल्यानंतर तेथे चारशे ते पाचशे लोक जमा झाले होते.
त्यापैकी एकाचाही पाय त्या मण्यांवर पडला नाही. पोलिसांनी फोटो काढले त्यात सर्व माळ व मणी अगदी वरवर व नुकतेच टाकल्याचे स्पष्ट दिसते. त्यामुळे पुरावा जमा करण्यासाठी व फोटो काढण्यासाठी बनावट माळ व मणी तेथे टाकल्याचे अ‍ॅड. विजयालक्ष्मी यांनी युक्तीवादात म्हटले आहे. तसेच घटनास्थळी कपडे, डोक्याची क्लिप, कपडे या वस्तू मिळून आल्या. त्यापैकी एकालाही माती लागलेली नाही. नव्या वस्तुंसारख्या दिसून येतात. त्यामुळे हे विश्वसनीय पुरावे होऊच शकत नाहीत. असा युक्तीवाद करण्यात आला.
त्यानंतर अ‍ॅड. प्रकाश आहेर यांनी युक्तीवाद केला. घटना घडण्यापूर्वी सुद्रीक नावाचे दोघे एका पुलावर बसले होते. मात्र एकाचाच जबाब का घेण्यात आला आहे. दुसर्‍या व्यक्तीचा जबाब का घेतला नाही?, घटनेच्यावेळी एक महिला म्हणते, मी घटनास्थळी शेळी चारत होते मात्र सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास शेळी चारण्याची वेळ नाही. त्यामुळे हे सर्व एकमेकांचे नातेवाईक आहेत.
त्यांना अन्य आरोपींना यात गोवायचे आहे. त्यामुळे हा सर्व घटनाक्रम तयार करण्यात आला आहे. असा आरोप आहेर यांनी केला. तसेच आरोपीकडे दुचाकी होती, असे फिर्यादीत म्हटले आहे. मात्र त्याच्याकडे चालक परवाना आहे का?, वाहनाचा वीमा आहे का?, त्याला वाहन चालविता येते का? याचा तपास पोलिसांनी का केला नाही. जेव्हा तिघे आरोपींनी पीडित मुलीची छेडछाड काढली होती.
तेव्हा पोलीस ठाण्यात गैरवर्तनाचा गुन्हा दाखल का केला नाही. पोलिसांच्या नकाशात एक बाभळीचे झाड दाखविण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्ष चारी रस्त्यावर कोठेही बाभळीचे झाड नाही, चारी रस्त्याने वाहन जात नाही. असे सांगण्यात आले आहे. मात्र तेथे दुचाकी, चारचाकी, बैलगाडी, जनावरे सर्व सहज जाऊ शकतात असा रस्ता आहे. अशी जबाबातील विसंगती अ‍ॅड. आहेर यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिली. बुधवारी दुसर्‍या सत्रात न्यायालयाचे कामकाज थांबविण्यात आले. पुढे बुधवारी (दि.8) या खटल्याची नियमित सुनावणी सुरू होणार आहे.

नार्कोचा अहवाल गेला कोठे? –
आरोपींना अटक केल्यानंतर त्यांची नार्को करण्यासाठी तिघांना मुंबईला नेण्यात आले होते. त्या रात्री तिघांना खारघर पोलीस ठाण्यात ठेवले होते. त्यांची नार्को करण्यात आली. मात्र रिपोर्ट कोठे गेले याबाबत काहीही सांगण्यात आले नाही. त्या अहवालाचा निकाल आरोपींच्या बाजूने होता. म्हणून पोलीस निरीक्षक पाटोळे यांनी तो अहवाल न्यायालयात सादर केला नाही. साधा एक देखील सबळ पुरावा आरोपींच्या विरोधात नाही.

वडिलांसह चौघांच्या नार्कोची मागणी –
घटना घडली तेव्हा पीडित मुलीचे वडील घटनास्थळाच्या जवळच असणार्‍या शेतात होते. तरी देखील ते घटनास्थळी कोठे दिसत नाहीत. घटनेतील फिर्यादी, त्याचा मित्र, भाऊ यांनी चुकीचे जबाब दिले आहेत. सर्व घटना वेगळी आहे. या चौघांची नार्को केल्यास सत्य घटनेचा उलगडा होईल. त्यामुळे चौघांची नार्को करावी अशी मागणी अ‍ॅड. आहेर यांनी केली आहे. 

तीने टीव्हीएस गाडी अंधारात ओळखली ! –
घटनेच्या दिवशी आम्ही तिघांना गाडीहून जाताना पाहिले. त्यावेळी, अंधार पडत चालला होता. असे दोघांनी जबाबात म्हटले आहे. मात्र जबाब देणारी महिला निरक्षर आहे. तीने चक्क टिव्हीएस कंपनीची निळ्या रंगाची गाडी आरोपींकडे होती. असे वस्तुनिष्ठ उत्तर दिले. अंधार असून, गाडी कोणती होती, रंग कोणता होता. हे महिलेने ओळखले कसे? त्यामुळे हे जबाब पाठ करून देण्यात आले आहेत. हे स्पष्ट होते. तसेच या रोडवर इतके सर्व साक्षीदार होते. तर त्यांची एकमेकांशी भेट का झाली नाही. असे प्रश्न अ‍ॅड. आहेर यांनी उपस्थित केले.

LEAVE A REPLY

*