कोपर्डी अत्याचार प्रकरण : दोषारोपपत्रातील 150 चुकांवर बोट, अ‍ॅड. मकासरेंचा युक्तीवाद संपला

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोपर्डी प्रकरणात पीडितेवर अत्याचार करून ठार केल्याचा आरोप आरोपींवर आहे. मात्र, मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे यांचे रक्त व वीर्य घेऊनही त्याची तपासणी करण्यात आली होती. यात वैद्यकीय अहवालात अत्याचार केल्याचा कोणताही पुरावा नाही. त्यामुळे ही घटना खरी आहे की बनाव? असा युक्तीवाद मुख्य आरोपीचे वकील अ‍ॅड. यौहान मकासरे यांनी केला. चार दिवस चाललेल्या अंतिम युक्तीवादात मकासरे यांनी दोषारोपत्रातील महत्त्वाच्या 150 चुका पुराव्यासह न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या.

कोपर्डी अत्याचार व खून प्रकरणी जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर गुरुवार (दि.26) पासून सलग सहा दिवस अंतिम युक्तीवाद सुरू आहे. पीडितेच्यावतीने अ‍ॅड. निकम यांनी दोन दिवस युक्तीवाद केला. त्यांच्यानंतर मुख्य आरोपी शिंदे याचे वकील अ‍ॅड. मकासरे यांनी सलग साडेतीन दिवस आरोपीची बाजू मांडली.

मंगळवारी (दि.31) दुपारनंतर दुसरा आरोपी संतोष भवाळच्यावतीने अ‍ॅड. खोपडे व अ‍ॅड. विजयालक्ष्मी खोपडे यांनी बाजू मांडली. पहिल्या सत्रात अ‍ॅड. मकासरे यांनी पुन्हा दोषारोपपत्रातील चुकांचा पाढा वाचला. आरोपीने अत्याचार केला, असा एकही वैद्यकीय पुरावा नाही. तर रक्ताचे डिएनए पुरावे पोलिसांनी नंतर तयार केले आहेत. पोलीस कॉन्स्टेबल जंगम हे डीएनएचा अहवाल आणण्यासाठी मुंबईला गेले होते. तशी त्यांनी साक्ष दिली आहे.

मात्र, मुंबई डीएनएच्या कार्यालयात हा अहवाल सय्यद नूर यांच्याकडे दिल्याची नोंद आहे. तशी सही देखील रजिस्टरवर आहे. हा अहवाल पोलीस निरीक्षक गवारे यांच्याकडे 19 जुलै रोजी देण्यात आला होता. मात्र, त्यावर 20 जुलैची नोंद करण्यात आली आहे. मग हा अहवाल रात्रभर कोठे होता, त्याचे काय केले. याबाबत शंका उपस्थित करण्यात आली. त्याचे उत्तर सरकारकडे नाही, असे मकासरे यांनी युक्तीवादात म्हटले.

पहिल्यावेळी छेडछाड झाली. तेव्हा दोघे एका पुलावर बसले होते. त्यांनी तिघांना गाडीहून जाताना पाहिले होते. त्यावेळी या दोघांचे तोंड पूर्वेकडे होते. तरी देखील यांना पश्चिमेकडे जाणारे कसे दिसले हा प्रश्न उपस्थित होतो. याहून तपासातील विसंगती लक्षात आणून देताना मकासरे यांनी न्यायालयाला नकाशा दाखविला. त्यात पूल दाखवण्यात आलेला आहे. मात्र, वास्तविक पाहता या रोडवर कोठेच पूल नाही. त्यामुळे ते नेमके कोठे बसले होते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मंगळवारी मकासरे यांचा अंतीम युक्तीवाद संपला. त्यांना अ‍ॅड. गॅब्रेलीया, अ‍ॅड. सागर तडके, के. पी. घुले, गोकुळ बिडवे, प्रकाश गायकवाड यांनी सहाय्य केले.

आरोपीची गाडी जप्त करण्यात आली तेव्हा ती चिखलाने भरलेली होती. त्याचे चित्र न्यायालयात दाखविण्यात आले. मात्र, नंतर त्या गाडीचे टायर कोरे होते. चिखल कोेठे गेला, असे विचारले असता पोलिसांनी सांगितले. पावसात वाहून गेला. गाडी पावसात भिजली, पडून होती, मग गंजली कशी नाही, याचे उत्तर पोलिसांकडे नव्हते. आरोपी चारी रोडवर चावी शोधत होते असे सांगण्यात आले. मात्र चिखलात गाडी जाईल का व तेथे चावी कोणी शोधेल का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. तसेच पोलिसांकडे गुन्ह्यातील माल सुरक्षीत नसतो, याकडे मकासरे यांनी लक्ष वेधले.

पोलिसांनी तयार केली माळ –
आरोपींच्या गळ्यातील व हातातील माळ तहसीलदार व पोलीस निरीक्षक गवारे यांच्यासमोर जप्त करण्यात आली. मात्र, गवारे म्हणाले मी तहसीलदारांना ओळखत नाही. या माळेचा साक्षीदार संदीप सुद्रीक यास करण्यात आले. तो म्हणतो की, ही माळ मला लकी आहे, असे आरोपी म्हणाला होता. मात्र माळ जप्त करताना पोलीस निरीक्षक किंवा तहसीलदाराने संदीपला बोलावले नव्हते. संदीप घटनेनंतर चार दिवस कोल्हापूरला होता त्यानंतर त्याचे जबाब घेतले. त्याला घटनास्थळी नेले नाही. माळ दाखविली नाही. घटनाक्रम माहित नाही. राशीनहून माळ घेतली त्या दुकानदाराचे जबाब नाही. अचानक सुद्रीक जबाबाला कसा आला याचे उत्तर नाही. त्यामुळे ही माळ तयार करून दाखविण्यात आली आहे, असे मकासरे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

वडील-भाऊ कोठे होते? –
एक साक्षीदार सांगते, घटना घडली तेव्हा पीडित मुलीचे वडील घटनास्थळाच्या जवळच शेतात काम करत होते. यावर भर देत अ‍ॅड. मकासरे म्हणाले, वडील रात्री पाऊणे आठपर्यंत शेतात काम कसे करतात? पीडित मुलीच्या रडण्याचा आवाज घरापर्यंत येतो, पण वडिलांपर्यंत गेला नाही का?, जर वडील घटनास्थळी आले होते. तर त्यांचा दोषारोपपत्रात कोठेही उल्लेख नाही, त्यांची साक्ष नाही, भावाची आहे. मात्र त्याचे जबाब घेण्यात आले नाहीत. त्यामुळे हा सर्व घटनाक्रम बनावट आहे. वास्तव घटना वेगळी आहे, असे त्यांनी न्यायालयात सांगितले. 

LEAVE A REPLY

*