कोपर्डी प्रकरण : सीडी देणार्‍यास साक्षीदार म्हणून तपासण्यास परवानगी

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोपर्डी प्रकरणात अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्यासह सहा जणांना आरोपीचा साक्षीदार म्हणून तपासण्याची मागणी आरोपीच्या वकिलांनी केली होती. यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपिल करण्यात आले होते. ही मागणी उच्च न्यायालयाने देखील गुरुवारी (दि. 3) फेटाळली आहे. मात्र मुख्यमंत्री, अ‍ॅड. निकम व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भाषणे व मुलाखती जमा करणार्‍या राहुल चव्हाण यांना साक्षीदार म्हणून तपासण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे.

कोपर्डी अत्याचार व खून खटल्याचा तपास अंतीम टप्प्यात आहे. सध्या 31 पेक्षा जास्त साक्षीदार तापासून झाले आहेत. खटल्याला निकालाकडे घेऊन जात असताना संतोष भवाळ व नितीन भैलुमे यांच्या वकिलांनी मोठी खळबळजनक मागणी केली. आरोपी पक्षाचे साक्षीदार म्हणून चक्क विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तपासण्याची मागणी केली. यातील मुख्यमंत्र्यांचा अर्ज अ‍ॅड. प्रकाश आहेर यांनी काढून घेतला. मात्र अ‍ॅड. बाळासाहेब खोपडे हे त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले. 22 जुलै रोजी जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी हा अर्ज फेटाळल्यानंतर अ‍ॅड. खोपडे यांनी 29 जुलै रोजी उच्च न्यायालयात अपिल केले होते. या प्रकरणावर गुरूवारी (दि.3) युक्तिवाद करण्यात आला. मात्र तो निष्फळ ठरला.

न्यायालयाने सहा जणांची साक्ष घेण्यास नकार दिला असला तरी ज्या व्यक्तीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अ‍ॅड. उज्ज्वल निकम व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ज्या ठिकाणी मुलाखती दिल्या होत्या. तसेच भाषणे देखील केली होती, त्यांची सोशल मीडिया तसेच यूट्यूब वरुन माहिती घेऊन संकलन केलेल्या रवींद्र चव्हाण यांची साक्षीदार म्हणून साक्ष घेण्यास हरकत नाही असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे चव्हाण यांची साक्ष जिल्हा सत्र न्यायालयात नोंदविली जाणार आहे. आरोपीच्या वकीलांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात अपिल करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे कोपर्डी खटल्याच्या सुनावणीला अधिक दिवस लागणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयात अपिल करणार –
उच्च न्यायालयाने अ‍ॅड. निकम, जिल्हाधिकारी अभय महाजन, ज्येष्ठ पत्रकार, नाशिक प्रयोग शाळेतील तज्ज्ञ यांच्यासह सहा जणांचा अर्ज फेटाळल्यामुळे आम्ही सर्वोच्च न्यायालयात अपिल करणार आहोत. त्यामुळे या खटल्याची पुढील सुनावणी होणार नाही. 11 ऑगस्टनंतर यावर काय निर्णय होईल त्यावर पुढील युक्तिवादास सुरुवात केली जाणार आहे. आम्ही मांडलेले सर्व साक्षीदार आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहोत.
अ‍ॅड. विजयलक्ष्मी खोपडे (आरोपी पक्षाचे वकील)

LEAVE A REPLY

*