कोपर्डी घटनेचा आज अंतिम युक्तिवाद

0

आज निकालाची शक्यता, खून केला नसल्याचा मुख्य आरोपीचा दावा

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्यभर गाजलेल्या कोपर्डी अत्याचार व खून प्रकरणातील तीनही आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी धरले आहे. काल (दि. 21) मंगळवारी आरोपींच्या शिक्षेवर युक्तिवाद झाला. यावेळी आपल्याला कमी शिक्षा का व्हावी, यावर मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे व नितीन भैलुमे यांनी आपले म्हणणे मांडले. शिंदे म्हणाला एक दिवस काय अन् हजार दिवस काय शिक्षा भोगायचीच आहे. त्यामुळे काय द्यायची ती शिक्षा द्या. मात्र, मी खून केलेला नाही, असा दावा त्याने केला. भैलुमे म्हणाला, मला या प्रकरणात गोवण्यात आले आहे, त्यामुळे मी दोषी नाही. न्यायालयाने या दोघांचे म्हणणे नोंदवून घेतले. आज बुधवारी (दि. 22) अन्य आरोपी संतोष भवाळ याने आपले म्हणणे मांडल्यानंतर अ‍ॅड. उज्ज्वल निकम हे अंतिम युक्तिवाद करणार आहेत. त्यानंतर न्यायालय आपला निकाल सुनावणार आहे.  

कोपर्डी अत्याचार व खून प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ व नितीन भैलुमे या तिघांना यापूर्वीच दोषी धरले आहे. त्यांच्यावर अत्याचार, खून, बाललैंगिक अत्याचार, छेडछाड, कट कारस्थान, गुन्ह्यास प्रवृत्त करणे हे गुन्हे सिद्ध झालेले आहेत. त्यातील महत्त्वाच्या कलमांना फाशी व जन्मठेप अशी शिक्षा आहे. मात्र, संविधानाच्या तरतुदीनुसार आरोपींना आपले मत मांडण्याचा अधिकार आहे.

दोषी धरण्यात आलेल्या कलमानुसार असणारी शिक्षा ही कमीत कमी का द्यावी, यासाठी आरोपींना आपली बाजू मांडण्याची तरतूद आहेे. त्यामुळे तिघांना दोषी धरल्यानंतर आरोपींना व त्यांच्या वकिलांना बाजू मांडण्यासाठी न्यायालयाने मंगळवारी वेळ दिला होता. आज आरोपी क्रमांक तीन नितीन भैलुमे याचे वकील अ‍ॅड. प्रकाश आहेर यांनी आरोपीची बाजू मांडली. त्यांनी वेगवेगळ्या खटल्यांचे दाखले न्यायालयासमोर सादर केले. ते म्हणाले, घटना घडली तेव्हा भैलुमे हा तेथे उपस्थित नव्हता. त्याच्यावर खुनाचा कलम नाही, अत्याचाराचाही कलम नाही. वैद्यकीय अहवालात त्याच्या विरुद्ध कोणताही पुरावा नाही. घर झडतीत काही आढळून आले नाही. भैलुमेस पाहणारा एकही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही. त्यामुळे त्याच्यावर कट रचणे व गुन्ह्यास प्रेरित करणे हे कलम देखील सिद्ध होत नाही. त्यामुळे न्यायालयाने शिक्षा देताना दयेचा विचार करावा, असा युुक्तिवाद न्यायालयात केला.

भैलुमे हा मागासवर्गीय कुटुंबातील आहे. घरची परिस्थिती बेताची आहे. आईचे एका आजाराचे ऑपरेशन झाले असून ती घरी असते, तर वडील मजुरी करतात. एक भाऊ मिळेल ते काम करतो. अशा कठीण परिस्थितीवर मात करीत त्याने बी. एससी. चे शिक्षण पूर्ण केले आहे. या गुन्ह्याच्या व्यतिरिक्त त्याच्यावर साधा अदखलपात्र गुन्हा देखील दाखल नाही. तो एक सुशिक्षित विद्यार्थी असून, सध्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेेत आहे. त्याचे वय व शिक्षण याचा विचार करून त्यास कमीत कमी शिक्षा द्यावी, असे म्हणणे अ‍ॅड. आहेर यांनी न्यायालयासमोर मांडले.

भैलुमे यास न्यायालयासमोर उभे केल्यानंतर न्यायाधीशांनी तुला कमीत कमी शिक्षा का द्यावी असा प्रश्न विचारला. त्यावर तो म्हणाला, माझा या गुन्ह्याशी काही एक संबंध नाही. त्यामुळे मला कमीत कमी शिक्षा द्यावी. बाकी मला काही म्हणायचे नाही, असे म्हणून त्याने न्यायालयास हात जोडले.

फाशी नको, जन्मठेप द्या
मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याचे वकील अ‍ॅड. योहान मकासरे यांनी आपला युक्तिवाद फक्त पाच मिनिटांत आटोपला. शिंदेच्या घरी आई, वडील, पत्नी आहेत. त्याच्यावर कौटुंबिक जबाबदारी आहे. त्यामुळे त्यास फाशीच्या शिक्षेऐवजी जन्मठेप द्यावी असे ते म्हणाले. शिंदे याला न्यायालयाने विचारणा केली असता तो म्हणाला, एक दिवस शिक्षाच व हजार दिवस शिक्षाच आहे. जी द्यायची ती द्या. मात्र मी खून केला नाही, हे सत्य आहे.

आता प्रतीक्षा निकालाची
न्यायालयाने तिघांना दोषी धरल्यानंतर आरोपींची शिक्षा कमी का करावी यावर म्हणणे मांडले जाणार आहे. अ‍ॅड. योहान माकासरे हे आज (दि. 22) युक्तिवाद करणार होते. मात्र त्यांनी एक दिवस आधीच म्हणणे सादर केले आहे. त्यामुळे आज अ‍ॅड. बाळासाहेब खोपडे भवाळची बाजू मांडणार आहेत. तर तिघांना काय शिक्षा द्यावी यावर अ‍ॅड. उज्ज्वल निकम या खटल्यातील अंतिम युक्तिवाद करणार आहेत. त्यानंतर न्यायालय शिक्षा सुनावण्याची शक्यता आहे.

दोषींना फाशी व्हावी : चित्रा वाघ

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्यातील जनतेची भावना समजून घेत कोपर्डी खून व अत्याचार प्रकरणातील दोषींना फाशीचीच शिक्षा व्हावी. राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून राष्ट्रीय अपराध रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार गेल्या तीन वर्षांत 30 हजार महिलांचा विनयभंग तर 10 हजार 500 महिलांवर अत्याचार झाल्याची नोंद झाली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी दिली.

राष्ट्रवादी भवन येथे मंगळवारी वाघ पत्रकारांशी बोलत होत्या. जिल्हा व सत्र न्यायालयात कोपर्डी प्रकरणातील दोषींच्या शिक्षेबाबत युक्तिवाद ऐकून न्यायालय त्यांना कठोरातील कठोर शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा सुनावेल, असा विश्‍वास वाघ यांनी व्यक्त केला. कोपर्डीच्या निकलानंतर आरोपींवर शिक्षेची तातडीने अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात सरकार अपयशी ठरले असून सरकारचा ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ची घोषणा फोल ठरली आहे. राज्यात महिलांवरील अत्याचारात 20 टक्के वाढ झाली असून कोपर्डी प्रकारणात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, ते त्यांनी पाळले नाही. राष्ट्रवादीने या विरोधात आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर घाईघाईने पोलीसांन आरोपपत्र दाखल केला असल्याचा आरोप वाघ यांनी केला.

जेल असो, वा समाज महिला कोठेच सुरक्षित नाहीत, हे मंजुळा शेटे हत्या प्रकरणातून समोर आले असल्याचे वाघ स्पष्ट केले. महागाईचा आलेख वाढत असून रेशनवरून गहू, तांदूळ आणि साखर गायब झाली आहे. सरकारचे हेच अच्छे दिन आता जनता भोगत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून सत्ताधारी भाजपचे बगलबच्चे राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांवर खाल्याच्या पातळीवर आरोपी, टीका करत आहेत. या विरोधात राष्ट्रवादीच्या महिला गप्प बसणार नसल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. यावेळी जिल्हाध्यक्षा मंजूषा गुंड, शहरजिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे आदी उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

*