कोपर्डी प्रकरण : मुख्य आरोपीतर्फे न्यायालयात 189 पानांचा अहवाल दाखल

0
अंतिम सुनावणीकडे लक्ष
अहमदनगर (प्रतिनिधी) – कोपर्डी अत्याचार व खून खटल्यातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याच्यावतीने अ‍ॅड. योहान मकासरे यांनी सोमवारी (दि. 13) जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर 189 पानांचा अहवाल दाखल केला. त्यात आरोपीविरोधातील दोषारोप कसे बनावट आहेत, तपासातील त्रुटी, तपासी अधिकार्‍यांची तपासातील संदिग्धता, यासह अन्य मुद्द्यांचा समावेश असून त्या न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. अहवालाचा अभ्यास करून येत्या 18 नोव्हेंबरला न्यायालय आपला निकाल जाहीर करणार आहे.
कोपर्डी खटल्यात वकिलांनी 70 पैकी 31 साक्षीदार तपासले आहेत. तपासातील संदिग्धता, विसंगती, कागदपत्रांची अदला-बदल, पोलिसांचा अपारदर्शी कारभार हे तीनही आरोपींच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच या घटनेचे दोषारोपपत्र बनावट असल्याचा आरोप यावेळी आरोपींच्या वकिलांनी केला. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी 24 मुद्द्यांच्या आधारे घटनेतील वास्तव न्यायालयसमोर मांडले. अ‍ॅड. बाळासाहेब खोपडे यांनी संतोष भवाळ याची बाजू मांडताना 70 पानांचा अहवाल सादर केला आहे. त्यात 123 मुद्द्यांच्या आधारे भवाळ कसा निर्दोष आहे, हे मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.
नितीन भैलुमे याचे वकील अ‍ॅड. प्रकाश आहेर यांनी 20 पानांचा अहवाल न्यायालयात सादर केला आहे. दोन दिवस त्यांनी 16 मुद्द्यांची मांडणी न्यायालयासमोर केली. दरम्यान, काही मुद्दे वारंवार समोर येऊ लागल्याने न्यायालयाने आरोपींच्या वकिलांना लेखी अहवाल सादर करण्यास सांगितले. त्यामुळे अ‍ॅड. खोपडे, अ‍ॅड. आहेर यांनी आपले म्हणणे मांडले. मात्र, मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याचे वकील अ‍ॅड. मकासरे यांनी अंतिम क्षणापर्यंत दोषारोपत्राचा अभ्यास करुन सोमवारी 189 पानांचा अहवाल न्यायालयात सादर केला आहे. शनिवारी (दि. 18) या खटल्यावर अंतिम सुनावणी होण्याची शक्यता असल्याने सर्वांना शनिवारची प्रतीक्षा आहे.

 

LEAVE A REPLY

*