कोपर्डी अत्याचार प्रकरण : साक्षीदारांमध्ये तावडे, अ‍ॅड.निकम यांच्या समावेशास कोर्टाचा नकार

0

उच्च न्यायालयात अपील करणार : अ‍ॅड. खोपडे

अहमदनगर (प्रतिनिधी) – कोपर्डी अत्याचार प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, वृत्तवाहिनीचे संपादक, विशेष सरकारी वकील व जिल्हाधिकारी यांच्या साक्षीची मागणी करणारे आरोपी पक्षाचे सर्वच अर्ज आज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळले. या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात अपील करणार असल्याची माहिती आरोपीचे वकील बाळासाहेब खोपडे यांनी दिली. 24 जुलै रोजी या खटल्याची पुढील सुनावणी होणार आहे.

कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपी संतोष भवाळ याचे वकील अ‍ॅड. बाळासाहेब खोपडे यांनी साक्षीदार म्हणून विशेष सरकारी वकील अ‍ॅड. निकम यांना तपासण्याची मागणी केली होती. तसेच मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याही नावाचा त्यात समावेश होता. आरोपी पक्षाच्या या मागणीमुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती. देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, अ‍ॅड. निकम यांच्या वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवरील मुलाखतीची माहिती जमा केली आहे.

त्याच्याआधारे कोपर्डीचे दोषारोपपत्र पूर्व नियोजित असल्याचे सिद्ध करण्याचा खटाटोप आरोपी पक्षाकडून सुरू आहे. मुख्यमंत्री तसेच अ‍ॅड. निकम यांना आरोपीच्या बाजूने साक्षीदार म्हणून उभे राहण्याची वेळ येते की काय असा प्रश्‍न निर्माण झाला होता. न्यायालयाने आरोपी पक्षाचे सर्व अर्ज फेटाळून लावत त्यावर पडदा टाकला.

न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आरोपीचे वकील अ‍ॅड. बाळासाहेब खोपडे हे उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. त्यासाठी जिल्हा न्यायालयाने त्यांना 24 जुलै पर्यंत कालावधी दिला आहे. अपील केल्यानंतर त्याचे स्टेटस काय आहे, याची माहिती जिल्हा न्यायालयाला कळवावी, त्यानंतर पुढील सुनावणी होईल असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*