कोपर्डी खटल्यातील सर्व साक्षी पूर्ण : 21 जूनला आरोपींचे अंतिम जबाब

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – कर्जत तालुक्यातील कोपर्डी अत्याचार व हत्याकांड खटल्यातील अंतिम साक्षीदार पोलीस नाईक भाऊसाहेब मुरलीधर कुरुंद यांची साक्ष जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर घेण्यात आली. या खटल्यातील सर्व साक्षीपुरावे नोंदविण्यात आले असून हा खटाला आता अंतिम टप्प्यात असल्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले. या खटल्याची पुढील सुनावणी 21 जूननंतर तीन दिवस चालणार आहे. त्यावेळी आरोपी जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे व संतोष भवाळ यांचे जबाब नोंदविले जाणार आहेत.
बुधवारी (दि. 24) अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी पोलीस नाईक भाऊसाहेब कुरुंद यांची सरतपासणी घेतली. कोपर्डी प्रकरणातील तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली तेव्हा कुरुंद यांची उपस्थिती होती. त्याची माहिती पोलीस कर्मचार्‍याने कथन केली. घटनेच्या दुसर्‍या दिवशी जितेंद्र शिंदे या मुख्य आरोपीला 14 जुलै रोजी श्रीगोंदा बस स्थानक येथून ताब्यात घेण्यात आले होते. त्यावेळी पोलीस कर्मचारी भिंगारे, हजारे, जाधव, घोडके हे देखील उपस्थित होते. असे कुरुंद यांनी न्यायालयाला सांगितले. 16 जुलैला पिंपळवाडीतून आरोपी संतोष भवाळ यास ताब्यात घेतले होते. तर तिसरा आरोपी नितीन भैलुमे याला 17 जुलै रोजी पुण्यातील जहांगीर रुग्णालयासमोर ताब्यात घेतले असे जबाब कुरुंद यांनी दिले.
त्यानंतर आरोपी पक्षातर्फे अ‍ॅड. बाळासाहेब खोपडे, अ‍ॅड. प्रकाश आहेर व अ‍ॅड. योहान मकासरे, यांनी पोलीस नाईकाची उलटतपासणी घेतली. जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे, संतोष भवाळ यांना अटक केल्यानंतर त्याची स्टेशन डायरीला नोंद केली का? अटक कोणी केली, स्टेशन डायरीला नोंद का घेतली नाही असे प्रश्‍न तिन्ही आरोपींच्या वकिलांनी विचारले. त्यांना समाधानकारक उत्तरे दिल्यानंतर अर्ध्या तासात ही साक्ष संपली.

खटला अंतिम सुनावणीवर
कोपर्डीतील अत्याचार व खून प्रकरणात एकूण 31 जणांची सरतपासणी व उलटतपासणी घेण्यात आली आहे. कुरुंद यांच्यानंतर या खटल्यात साक्षीदार संपले आहेत. यानंतर एकही साक्षीदार तपासण्यात येणार नाही. 21 जून रोजी होणार्‍या सुनावणीला तिन्ही आरोपींचे जबाब नोंदविण्यात येणार आहेत. तर आरोपी पक्षाचे वकील काही साक्षीदारांची यादी न्यायालयात देणार आहेत. त्यानंतर हा खटला अंतिम सुनावणीवर राहणार आहे.
– अ‍ॅड. उज्ज्वल निकम (विशेष सरकारी वकील)

LEAVE A REPLY

*