कावळ्यांना मावळ्यांची झूल!

0

नगर टाइम्स, कोन दृष्टीकोन- संदीप रोडे

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात तोडफोडीचे राजकारण वेगवान झाले आहे. ‘पॉवरफुल्ल’ लोकांना पक्षात घेताना त्यांच्या इतिहासाच्या पानाकडे दुर्लक्ष केले जात आहे. भाजपने चार-पाच प्रवेश घडवून आणत निवडणुकीचा बार (खरे तर लवंगी फटाके) उडविले.त्यांना करारा जवाब देण्यासाठी शिवसेनेने विद्यमान तीन नगरसेवकांसह प्रवेशाचा सिक्सर मारत अ‍ॅटम बॉम्ब फोडला.

सेनेत आलेल्या मावळ्यांच्या हातावर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी धागा बांधून त्यांना शिवबंधनात अडकवले. हे करीत असताना मात्र त्यांचा इतिहास पाहिला नाही, अशी चर्चा निष्ठावंत शिवसैनिक करीत आहेत. प्रवेश केलेल्यांपैकी इकडून-तिकडे आणि तिकडून-इकडे असे मुक्तसंचार करणारे ‘कावळे’ आहेत. त्यांना पक्षात प्रवेश देऊन पावन करून घेतल्याने ते मावळे झाल्याचे सांगितले जाते. मात्र, हे मावळे पुन्हा कावळ्यासारखे उडून तर जाणार नाहीत ना? ही चर्चा शहरातील कट्ट्याकट्यावर झडायला लागली आहे.

छत्रपतींच्या स्वराज्याच्या लढ्यात मावळ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिल्याचा इतिहास आहे. छत्रपतींच्या सुरक्षित प्रवासाकरीता बाजीप्रभूंनी खिंज लढवली. तानाजी मालुसरे यांनी ‘आधी लगीन कोंढण्याचं, मग रायबाचं’ अशी गर्जना करीत कोंढाणा जिंकला. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी हेच स्पिरीट शिवसेना स्थापन करताना सैनिकात पेरले. हा कार्यकर्त्यांना मानणारा पक्ष असल्याचे सर्वत्र सांगितले जाते. मात्र, आताच्या राजकारणात निष्ठा खुंटीला टांगली आहे. मावळे सोईनुसार इकडून तिकडे माकडउड्या मारत आहेत. त्यांना शिवसेनेने पावन केल्याने चर्चा सुरू आहे. पावन केलेल्यांंचा इतिहास शिवसैनिकच काय नगरकरही विसरलेले नाहीत.
बाळासाहेब बोराटे, सुभाष लोंढे, दत्तात्रय कावरे या विद्यमान नगरसेवकांनी शिवसेनेचा भगवा ध्वज खांद्यावर घेत महापालिका निवडणुकीच्या वारीला निघाले आहेत. त्यांच्या वारीवर मंथन सुरू झाले आहे. लोंढे फॅमिली हे नगरातील बडे प्रस्थ. तसं पहिलं तर ते काँग्रेसचे भक्त. संभाजी लोंढे यांनी नगरपालिकेत या घराण्याचे प्रतिनिधीत्व महापालिकेत केले.

त्यानंतर सुभाष लोंढे यांची एन्ट्री झाली. पण त्यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेकडून निवडणूक लढवित विजयी सलामी दिली. फार काळ ते शिवसेनेत रमले नाहीत. नगरमध्ये पहिल्यादांच शिवसेना फुटली त्या गटात लोंढे होते. तेव्हापासून ते शिवसेनेपासून दुरावले. गत महापालिका निवडणुकीत विखेंच्या वरदहस्ताने ते पुन्हा काँग्रेसचे नगरसेवक म्हणून महापालिकेत पोहोचले. आता परत ते शिवसेनेच्या शिवबंधनात अडकलेत. काँग्रेस, शिवसेना अशा त्यांच्या आलटून-पालटून खेट्या झाल्या.

दुसरे ‘मावळे’ बाळासाहेब बोराटे यांचा इतिहास तर रंजक. कधी अपक्ष, कधी राष्ट्रवादी तर कधी शिवसेना अशी त्यांची ‘उड्यामारी’ झाली. ते राष्ट्रवादीचे आमदार अरुणकाका जगताप यांचे पट्टशिष्य. तसं बाळासाहेबांनीच अनेकदा जाहीरपणे नगरकरांना सांगितलंय. एक टर्म त्यांनी शिवसेनेचे नगरसेवक म्हणून महापालिकेत काढली. गत सार्वजनिक निवडणुकीत तर शिवसेना अन् राष्ट्रवादी दोन्ही पक्षाचे एबी फॉर्म हातात असलेले हे एकमेव नगरसेवक. त्यावेळी त्यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत गुरू अरुणकाकांचा पक्ष निवडला. गुरूनेही त्यांना ‘बिनविरोधा’ची बक्षिसी दिली. मात्र, काकांसोबत त्यांचे फारसे पटले नाही. बंडखोरी करीत त्यांनी महापालिकेत नाराजांची मोट बांधली. त्याच जोरावर विरोधी पक्षनेते पदाची खुर्ची मिळवली. शिवसेनेच्या महापौरांना कायमच पाण्यात पाहणारे अन् स्वपक्षाची डोकेदुखी ठरलेले बाळासाहेब भगवा खांद्यावर घेत पुन्हा सेनेकडून महापालिकेच्या वारीला निघालेत. आता ते सेनेचे सच्चे मावळे होऊन राहतात की कावळ्यासारखी पुन्हा दुसरी फांदी निवडतात, याची राजकीय वर्तुळात खुमसदारपणे चर्चा सुरू आहे.

झेंडा रोविला..
कोणी कितीही ओरडलं, आडवे पडले तरी शिवसेना महापालिकेवर भगवा फडकवेल, असा दावा सेनेचे स्थानिक पदाधिकारी करताहेत. कोणी आल्याने किंवा गेल्याने शिवसेनेला फरक पडत नाही. शिवसेना ही सच्चा मावळ्यांचे संघटन आहे. उपनेते अनिल राठोड यांनी शिवसेनेचा झेंडा नगरात आतापर्यंत दिमाखात फडकावित ठेवला. अर्थात मावळ्यांच्या ताकदीवर भैयांनी ही करामत केली. यंदाही त्याची पुनरावत्ती होईल, अशी शिवसैनिकांना आशा आहे!

कावरे आगरकरांचे हलकारे
दत्ता सप्रे यांची पहिलीच टर्म. राष्ट्रवादीच्या शिडीने ते महापालिकेत पोहोचले होते. यंदा त्यांनी तयारी केली, मात्र कुमार वाकळेंची उमेदवारी त्यांना आडवी आली. तिकिटाचे डळमळीत दिसताच त्यांनी राष्ट्रवादीतून शिवसेना जवळ केली. दत्तात्रय कावरे हे भाजपचे निष्ठावंत. मात्र गतवेळी उपमहापौर पदाच्या निवडणुकीत पक्षाने वाटाण्याच्या अक्षता लावल्याची सल त्यांना बोचत होती. तसेही ते भाजपचे खासदार दिलीप गांधींचे विरोधक तर अ‍ॅड. अभय आगरकरांचे खंदे समर्थक. त्यांचा शिवसेना प्रवेश आगरकरांच्या सहमतीने की सेनेचा आगरकरांनाही ‘शॉक’ याचे आडाखे जो-तो आपापल्यापरीने बांधतोय. आगरकरांचे पंख छाटल्याने समर्थक कावरेंना त्यांनी शिवसेनेत हलकारा म्हणून पाठवले. पुढे तेही सेनेत जातील, असे आडाखे समीक्षक बांधत आहेत.

LEAVE A REPLY

*