Type to search

Breaking News क्रीडा मुख्य बातम्या

आजपासून कोलकत्त्यात रंगणार ऐतिहासिक ‘गुलाबी’ कसोटी

Share

कोलकाता । आजपासून कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर पहिला दिवस-रात्र कसोटी सामना भारत-बांगलादेश यांच्यात रंगणार आहे. भारत या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. मात्र या सामन्यात गुलाबी चेंडूचा वापर होणार असल्याने भारतीय कर्णधार विराट कोहली चिंतेत आहे. सामन्याआधी विराटने पत्रकारांशी संवाद साधला.

गुलाबी रंगाच्या चेंडूने खेळवल्या जाणार्‍या देशातील पहिल्यावहिल्या दिवसरात्र कसोटी सामन्याची तुलना भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याशी केली आहे. ‘गुलाबी चेंडूने कसोटी खेळणे आव्हानात्मक असेल. विश्वचषकात होणार्‍या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याइतकेच ते थरारक असेल,’ असे विराटने म्हटले आहे. भारतातील पहिला दिवस-रात्र कसोटी सामन्याची उत्सुकता एव्हाना शिगेला पोहोचली आहे.

कसोटीच्या पहिल्या चार दिवसांची तिकिटे संपली आहेत. मात्र, ही कसोटी गुलाबी चेंडूसह होत असल्याने क्रिकेटपटू सावध प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. विराटची प्रतिक्रिया देखील काहीशी अशीच आहे. गुलाबी चेंडूने खेळणे कठीण असेल. गोलंदाजी कशी होतेय. फलंदाज चेंडूचा सामना कसा करतात, हे पाहावे लागेल. सवय झाल्यानंतर खेळणे कदाचित सोपे जाईल, असे तो म्हणाला. ईडन गार्डन्सची खेळपट्टी आणि गुलाबी चेंडू हेदेखील महत्त्वाचे मुद्दे ठरणार असल्याचे विराटने स्पष्ट केले.

आम्हाला जे निर्णय घ्यायचे आहेत ते लवकर आणि योग्य घ्यावे लागतील. बॅटची कड घेऊन चेंडू स्लिपमध्ये लवकर येईल, त्यामुळे झेल घेतानाही अधिक सजग रहावे लागणार आहे. आमच्यासाठी हे एका प्रकारचे आव्हान आहे, आणि एक संघ म्हणून आम्ही त्यासाठी तयार आहोत, असेही विराट म्हणाला.

कोलकाता कसोटीला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची चिन्हे आहेत. त्या विषयी विराटने आनंद व्यक्त केला. गुलाबी चेंडूविषयी लोकांना उत्सुकता आहे. अशी उत्सुकता एकेकाळी भारत-पाकिस्तान सामन्याच्या वेळी असायची. तेव्हा दिग्गज क्रिकेटपटू मैदानात असायचे. सगळीकडे याच सामन्याची चर्चा व्हायची. आताही तसेच वातावरण आहे, अर्थात, हा सामना खेळताना आम्हाला प्रेक्षकांचा पाठिंबा मिळेल. मैदानावरील दव कधी पडेल आणि कधी त्याचे प्रमाण या परिस्थितीवर शेवटचे सत्र महत्त्वाचे असेल, असे विराट म्हणाला.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!