Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

कोल्हार भगवतीपूरमध्ये टारगट मुलांवर कारवाई

Share

अनेकजण पोलिसांच्या ताब्यात । माहिती देण्यास पोलिसांचा नकार । पालकांमध्ये संताप

कोल्हार (वार्ताहर)- कोल्हार भगवतीपूर येथे गेल्या कित्येक दिवसांपासून टारगट मुलांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. शाळकरी तथा महाविद्यालयीन विद्यार्थिनींची छेडछाड व अश्लील चाळे करण्याचे प्रकार वाढले. दररोज घडणार्‍या या गलिच्छ प्रकारांना मुलींबरोबरच पालकही त्रस्त झाले होते. याप्रकरणी काल पोलिसांनी कारवाई करत तिघा टारगटांविरुद्ध लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात टारगटांवर कारवाई करण्यासंबंधीचे पत्र ग्रामपंचायतीकडून पोलीस स्टेशनला दिले होते. याशिवाय कोल्हाळेश्वर सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष स्वप्निल निबे यांनी संघटनेच्यावतीने टारगट मुलांचा बंदोबस्त करण्यासंबंधी मागणीचे लेखी निवेदन पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब सूर्यवंशी यांना यावेळी सुपूर्द केले.
कोल्हार भगवतीपूर गावामध्ये न्यू इंग्लिश स्कूल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्युनियर कॉलेज तसेच कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आहेत.

येथे शिक्षणासाठी येणार्‍या-जाणार्‍या मुलींना गावातील व गावाबाहेरील काही टारगट व टुकार मुलांचा त्रास सहन करावा लागतो. वरील सर्व शाळा व कॉलेजमधील मुलींना लोणी रोडच्या बाजूने शाळेत किंवा कॉलेजला जात असताना काही टारगट मुले गाडीवरून कट मारणे, अश्लील चाळे करणे, मोठमोठ्याने विचित्र आवाज काढणे, रस्त्याकडेच्या असलेल्या टपर्‍यांमध्ये घोळक्याने बसून अश्लील चाळे व विचित्र हावभाव करणे, मोटरसायकलवरून रस्त्यावर जोरात पाय घासणे, विचित्र आवाजांचे हॉर्न मुलींजवळ जाऊन वाजविणे अशा प्रकारचा त्रास देतात. काल सकाळी पोलिसांनी कॉलेज परिसरात जाऊन टारगट मुलांविरुद्ध कारवाई केली. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून गु. र. नं. 265/19 प्रमाणे सलमान चाँद खान, सोहेल नासीर शेख, अकबर पप्पू आयूब शेख यांच्याविरुद्ध भादंवि कलम 354 (ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक श्री. पाटील करीत आहेत. याप्रकारचे अनुचित प्रकार त्वरित थांबण्यासाठी पोलीस प्रशासनाच्यावतीने शाळा व कॉलेज भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेमध्ये गस्त घालून टारगटांवर कारवाईचे सत्र केले. यात अनेक टारगटांना ताब्यात घेण्यात आले असून त्याबाबतची फिर्यादही लोणी पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. मात्र या पोलीस स्टेशनचे मुख्य अधिकारी व ठाणे अंमलदार यांनी फिर्याद दाखल नसल्याची माहिती पत्रकारांना सांगितली. लोणी पोलीस अशा टारगटांची माहिती देण्यास का टाळत आहेत. याबाबत ग्रामस्थांनी शंका व्यक्त केली आहे. पोलीस अधिकारी अशाप्रकारे टारगटांना अभय देत असतील तर यापुढे कोल्हार परिसरात टारगटांचा उच्छाद मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. या परिस्थितीला जबाबदार कोण? असा सवालही ग्रामस्थांनी केला आहे.

प्रसारमाध्यमांना माहिती देण्यास लोणी पोलिसांची टाळाटाळ
कोल्हार परिसरात अनेक दिवसांपासून शाळा, कॉलेज, महाविद्यालयाच्या ठिकाणी काही टारगट मुले मुलींना त्रास देत असतात. यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला असून याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली होती. त्याप्रमाणे पोलिसांनी कारवाईही केली. याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांनी लोणी पोलीस स्टेशनला विचारली असता आमच्याकडे काहीच दाखल नाही, माहिती देऊ शकत नाही, असे उत्तर देण्यात आले. यात लोणी पोलीस स्टेशनचे कारभारी यांनीही माहिती न दिल्यामुळे शंका व्यक्त केली जात आहे. माहिती न देण्यामागचे कारण काय असू शकते याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. एका पोलिसांच्या म्हणण्यानुसार फिर्याद दाखल आहे, आरोपीही ताब्यात आहेत. मग पोलीस स्टेशनचे प्रमुखच अशा प्रकारची माहिती का देऊ शकत नाही? लोणी पोलिसांच्या अशा वागणुकीमुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!