कोल्हार येथे एकाच रात्रीत सात घरफोड्या

सुमारे तीन लाखांचा ऐवज व रोख रक्कम लंपास

कोल्हार (वार्ताहर)- कोल्हार येथील बेलापूर रोडवरील लोकवस्तीत एकाच रात्रीत तब्बल सात घरे चार अज्ञात चोरट्यांनी फोडून सुमारे तीन लाखांचा ऐवज व रोख रक्कम घेऊन पलायन केले. सदर घटना रात्री दीड ते साडेतीनच्या दरम्यान घडली.

कोल्हार बुद्रुक येथे बेलापूर रोडवरील राऊत वस्तीवर चोरट्यांनी प्रथम लक्ष्य साधले. मात्र येथे रेखा राऊत व मोहिनी राऊत यांची चोरट्यांशी नजरानजर झाल्याने तेथून चोरट्यांनी काढता पाय घेतला. त्यानंतर चोरट्यांनी संजय बांगरे यांच्या घरातून रोख रक्कम व सोने असा ऐवज चोरून श्रीगणेशा केला. त्यानंतर चोरटे बेलापूर रोडवरील लोकवस्तीमध्ये घुसले. येथे प्रथम वैशाली रवींद्र गाडेकर यांच्या घराचे कुलूप बाहेरून तोडून सामानाची उचकापाचक केली. मात्र चोरट्यांचा हाती येथे काही लागले नाही. त्यानंतर राहुल बंग, राजस्थानी चौधरी, छाया वाघमारे, येथे चोरटे गेले मात्र येथे चोरीचा प्रयत्न फसला.

त्यानंतर चोरट्यांनी गोविंद नथुलाल शर्मा यांचे घर फोडले येथे मात्र चोरट्यांचे नशीब फळफळले. येथे तब्बल दीड लाखांची रोख रक्कम चोरट्यांना मिळाली. तसेच संजय बांगरे यांच्याकडेही रोख रक्कम व ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. सात घरांत मिळून चोरट्यांनी सुमारे तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे प्रथमदर्शनी समजते.

घटनेनंतर लोणीचे सपोनि प्रकाश पाटील यांनी भेट दिली. त्या नंतर नगरहून श्वान पथक व ठसे तज्ञ यांना पाचारण करण्यात आले. मात्र श्वान पथक पुढे काही अंतरावर घुटमळले. चोरी करणारे चार इसम असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. अवघ्या चार दिवसांपूर्वी लकी ट्रेडर्स हे पोलीस स्टेशन लगतचे दुकान चोरट्यांनी फोडून सुमारे दीड लाखांचा ऐवज लांबविला होता. त्यानंतर एकाच वेळेस चोरट्यांनी भर लोकवस्तीत सात घरे फोडली. मात्र वारंवार होणार्‍या या चोरीच्या पर्शवभूमीवर लोणी पोलिसांना चोरट्यांनी आव्हान दिल्याचे समोर येत आहे.