Photo Gallery : राज्य फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूर अजिंक्य; 5-1 ने नागपुरला नमवत साकारला विजय

0
नाशिक । वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आणि फुटबॉल असोसिएशन ऑफ नाशिक डिस्ट्रिक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय खुलागट पुरुष फुटबॉल स्पर्धंच्या अंतिम सामन्यात कोल्हापुरच्या संघाने बलाढ्य समजल्या जाणार्‍या नागपूरचा 5-1 च्या गोल फरकाने धुव्वा उडवत अजिंक्यपद पटकावले.

मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे उपस्थितांच्या हस्ते विजयी संघांना बक्षीस वितरण करण्यात आले. सकाळच्या सत्रात कोल्हापूर विरुद्ध नागपूर या दोन संघांमध्ये झालेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात दोनही संघांनी अत्यंत अप्रतिम खेळ करून प्रेक्षकांची मने जिंकली.

या दोन संघादरम्यान झालेल्या सामन्यात दोनही संघांनी आपआपली संपूर्ण शक्ती पणाला लावून गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले, तथापि कोल्हापूर संघ आज मात्र लईत होता. सामन्याच्या 7 व्याच मिनिटास कोल्हापूर संघाच्या सूरज शिनगाटे याने अप्रतिम हेडर व्दारे गोल नोंदवून सुरुवातीलाच आाघाडी घेऊन विजयाच्या दिशेने घोडदौड सुरू केली.

मात्र, नागपूर संघाने आपल्या नेहमीच्या शैलीत प्रति आक्रमण करीत कोल्हापूर संघाच्या गोलक्षेत्रावर आक्रमण केले, हे आक्रमण परतावयाच्या प्रयत्नात कोल्हापूर संघाच्या बचावपटूने गोलक्षेत्रात फाऊल केला आणि त्याचा परिणाम म्हणून नागपूर संघास पॅनल्टी किक मिळाली आणि या संधीचा फायदा विकास कनोजिया याने उचलून गोल केला आणि सामन्यामध्ये बरोबरी साधली.

यानंतर पहिल्या सत्रात दोनही संंघांनी प्रयत्न करूनही गोल नोंदविता आला नाही. यानंतर सामन्याच्या दुसर्‍या सत्रात मात्र कोल्हापूर संघाच्या निखिल कुलकर्णी याने 51 व्या मिनिटाला, 53 व्या मिनिटाला प्रथमेश हिरेकण, 61 व्या मिनिटाला सिध्देश यादव यांनी एका मागोमाग गोल करून नागपूर संघाची दाणादाण उडवून दिली.

नागपुरच्या खेळाडूंंनी यानंतरही सामन्यामध्ये परत येण्याचा प्रयत्न केला, पण कोल्हापुरच्या बचाव फळीने हे सर्व प्रयत्न हाणून पाडले. सामन्याच्या 71 व्या मिनिटाला संकेत साळोखे याने कोल्हापूर संघासाठी 5 वा गोल करून 5 विरुद्ध 1 अशा गोल फरकाने विजयी आघाडी प्राप्त केली.

सामना संपल्यानंतर नाशिक विभागाचे क्रीडा उपसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे सचिव साऊटर वाझ, इस्पेलियर स्कूलचे सचिन जोशी, के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अजिंक्य वाघ,नाशिक फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष गुलजार कोकणी यांच्या हस्ते बक्षीस वितरण कार्यक्रम झाला.

LEAVE A REPLY

*