Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : मामकोकडून पूरग्रस्तांना वैद्यकीय मदतीचा हात

Share

मालेगाव । प्रतिनिधी

अतीवृष्टीमुळे कोल्हापुर जिल्ह्यात आलेल्या महापुराने घातलेल्या थैमानाने अनेकांचे संसार उध्वस्त झाले. कोसळलेली घरे व मोडलेला संसार उभा करण्यासाठी राज्यातील अनेक सामाजिक संघटना पुढे सरसावल्या असतांना मामको जनकल्याण ट्रस्टने पुरग्रस्तांचा साथीच्या आजारापासून बचाव व्हावा यासाठी वैद्यकिय मदत उपलब्ध करून दिली आहे.

लाखो रूपयांचे साथ रोग प्रतिबंधक औषधांसह तज्ञ डॉक्टर हातकणंगले तालुक्यातील चंदूर या गावात ग्रामस्थांवर उपचार करत आहेत. मामको बँकेचे ज्येष्ठ संचालक राजेंद्र भोसले यांच्यासह दहा जणांच्या पथकाने या कार्यात गत दोन दिवसापासून स्वत:ला वाहून घेतले आहे.

पाचशेच्या वर ग्रामस्थांची वैद्यकिय तपासणी करण्यात येवून औषधोपचार केला गेला. चंदूर गावानंतर रूई व इंगळी या गावात देखील जनकल्याण ट्रस्टतर्फे औषधांचे वाटप ग्रामस्थांना केले जाणार आहे. या महापुराने अनेकांचे सर्वस्व वाहून गेले आहे. उध्वस्त घरे हताशपणे पाहणारे कुटूंबिय हे दृष्य पाषाण हृदयास पाझर फुटावे असेच असल्याचे राजेंद्र भोसले यांनी दै.‘देशदूत’शी चंदूर येथून बोलतांना सांगितले.

शासनाच्या विविध विभागांसह अनेक सामाजिक संघटना मदतीसाठी पुढे सरसावल्या असल्या तरी नियोजनाचा अभाव दिसून येत असल्याचे भोसले यांनी सांगितले. महापुराने घर पडून सामान वाहून गेले. पाणी ओसरल्यावर घरी परतलेले नागरीक सामानांचा शोध घेत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. मात्र अशा भिषण परिस्थितीतही पुरात वाहून जात असलेले सामान चोरट्यांतर्फे लांबविले जात असतांना यंत्रणेनेतर्फे त्यांना रोखले जात नसल्याची खंत भोसले यांनी व्यक्त केली.

मामको जनकल्याण ट्रस्टतर्फे चंदूर, रूई व इंगळी या तिन्ही महापुर बाधित गावांमध्ये थंडी, ताप, जुलाब, मलेरिया आदी साथीचे रोग प्रतिबंधक औषधांचे मोफत वाटप केले जात आहे. डॉ. अमोल जगताप हे रूग्णांची तपासणी करत आहेत.

मामको संचालक विठ्ठल बागुल, विशाल गरूड, सुभाष अहिरे, दादाजी बोरसे, पप्पु साकला, दत्ता खैरनार, कौतीक मातोरे, राकेश निकम, बालकिसन तोतला, अरविंद शर्मा आदी यासाठी सहाय्य करीत आहेत. एम.आर. संघटनेचे उत्तम सोनवणे, सुमित पगारे, श्रीकांत निकम यांनी देखील काही औषधे उपलब्ध करून दिली. लाखो रूपयांची औषधे प्रत्यक्षात पुरग्रस्तांना वाटली जात असून आवश्यक ते सर्व सहकार्य मामको ट्रस्टतर्फे पुरग्रस्तांना केले जात असल्याचे भोसले यांनी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!