Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

किर्लोस्कर वसुंधरा इको रेंजर्स : सलग दुसऱ्यावर्षी मविप्रचे समाजकार्य विद्यालय प्रथम

Share

अशोका बिझनेस स्कुल द्वितीय;  इको रेंजर्सच्या उपक्रमाद्वारे राबविला ग्रीन कॉलेज क्लीन कॉलेज उपक्रम

नाशिक : किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवाअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या इको रेंजर्स अंतर्गत आयोजित ग्रीन कॉलेज क्लीन कॉलेज या उपक्रमाचे पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मविप्रचे समाजकार्य महाविद्यालयास मिळाले. सलग दुसऱ्या वर्षी राबविण्यात आलेल्या इको रेंजर्स स्पर्धेत यावर्षी प्रा. प्रतिभा पगार यांच्या मार्गदर्शनाखाली समाजकार्य महाविद्यालयाने बाजी मारली आहे.

मंगळवारी (दि. १७) अंबड येथील किर्लोस्कर ऑइल इंजिन फॅक्टरीच्या आवारातील अस्मिता सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.  प्रा. अश्विन अमृतकर, प्रा. वंदना शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अशोका बिझनेस स्कुल द्वितीय क्रमांकावर राहिले.

गेल्या ८ वर्षांपासून नाशिक शहरात साजरा होणाऱ्या किर्लोस्कर वसुंधरा फिल्म फेस्टिवल अंतर्गत इको रेंजर्स उपक्रम राबविण्यात येत आहे. गेल्या वर्षभर राबविण्यात आलेल्या ग्रीन कॉलेज क्लीन कॉलेज अंतर्गत विविध उपक्रमांचे मूल्यांकन करत हे किताब देण्यात आले. नाशिक शहरातील डॉ. मुंजे इन्स्टिट्यूट, लोकनेते गोपीनाथराव अभियांत्रिकी महाविद्यालय यांनी देखील महाविद्यालयांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला.

मविप्रचे कॉलेज ऑफ सोशल वर्क तर्फे आपल्या सादरीकरणात एकदाच वापरता येणाऱ्या प्लस्टिक बाटल्यांपासून तयार केलेल्या ठिबक सिंचन तंत्रज्ञानाद्वारे महाविद्यालय परिसरातील झाडांना पाणी, पाणी बचतीबाबत जनजागृती, विविध वृक्षारोपण, सर्वच कार्यक्रमांत सिंगल युज प्लास्टिकचा वापर बंद आदी उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती दिली.

भविष्यात महाविद्यालयाच्या परिसरात पडणाऱ्या पालापाचोळ्यापासून खतनिर्मिती, आठवड्यातून किमान एक दिवस सायकल वापरण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन करणार असल्याचे महाविद्यालयाच्या इको रेंजर्स टीमच्या प्रमुख प्रा. प्रतिभा पगार यांनी सांगितले.

अशोका बिझनेस स्कुलच्या विद्यार्थ्यांनी इको रेंजर्स कार्यक्रमाअंतर्गत राबविण्यात आलेल्या पावसाचे पाणी साठवण अर्थात रेनवॉटर हार्वेस्टिंग, सौर ऊर्जा, आवारात प्लास्टिकचा वापर थांबवणे, ग्रीन वेलकम या अशा आपल्या उपक्रमांची माहिती दिली. टीमला प्रा. अमृतकर, प्रा. शर्मा यांचे मार्गदर्शन, सहकार्य लाभत आहे.

वसुंधरा क्लबचे अमित टिल्लू आणि सुवर्ण भांबूरकर यांनी परीक्षण केले. पुढील वर्षी आणखी नव्या संकल्पनेसह हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

यावेळी वसुंधराचे वीरेंद्र चित्राव यांनी जागतिक पातळीवर प्लास्टिक प्रदूषणामुळे होणाऱ्या परिणामांची माहिती देत विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली. हा कार्यक्रम आपल्याला मास्क घालून करावा लागतोय हा ग्लोबल वोर्मिंगचाच परिणाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जगातील प्रत्येक समस्येचे मूळ हे पर्यावरणाशी निगडित आहे.

किर्लोस्करसारखी एकमेव कंपनी पर्यावरणासाठी उपक्रम करताना दिसत आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त लोकांना या उपक्रमात सहभागी करून घेण्याचे आवाहन चित्राव यांनी यावेळी केले.

महाविद्यालयाच्या नव्या टीम्सने जास्तीतजास्त कल्पक उपक्रमांचा यात अंतर्भाव करून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी शहरातील व जिल्ह्यातील महाविद्यालयांना केले आहे.

यावेळी किर्लोस्कर समूहाचे मकरंद देवधर, राहुल बोरसे, निखिल चमणीकर, वसुंधरा क्लबचे वसुंधराचे विरेन चित्राव, स्वप्नील राव, सहभागी महाविद्यालयांचे उपक्रम प्रमुख आणि विद्यार्थी उपस्थित होते. निखिल चमणीकर यांनी सुत्रसंचलन केले तर राहुल बोरसे यांनी आभार मानले.


इको रेंजर्स हे एक वेगळे विचारकार्य असून प्रत्येकाने आपल्या रोजच्या आयुष्यात हे अंगिकरायला हवे. घरच्याघरी तयार होणाऱ्या कचऱ्याच्या व्यवस्थापनासारख्या छोट्या प्रकल्पापासून सुरुवात करू शकता. छोटा विषय निवडून त्यात 100 टक्के काम करायला हवे. यातून मोठा सामाजिक बदल घडणार आहे. या क्षेत्रात प्रचंड संधी असून अधिक माहितीसाठी व हे उपक्रम राबविताना कोणत्याही अडचणीत आम्ही वसुंधरा आणि किर्लोस्कर इको रेंजर्स टीमसोबत आहोत.

अमित टिल्लू

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!