Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

अपहरण केेलेले उद्योजक हुंडेकरी सुखरूप परतले

Share

पोलिसांकडून गुप्तता ः अपहरणकर्ते फरार असल्याची दिली माहिती

अहमदनगर (प्रतिनिधी) –  घरापासून काही अंतरावर असणार्‍या मस्जिदमध्ये नमाज पठणसाठी जात असताना प्रतिष्ठीत उद्योजक करीमभाई हुंडेकरी (वय- 70) यांचे अपहरण केले गेले. सोमवारी (दि. 18) पहाटे साडेपाचच्या सुमारास कोठला भागात ही घटना घडली. तोंडाला मास्क असलेल्यांनी शस्त्राचा धाक दाखवित त्यांचे अपहरण केल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले. या घटनेने शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत काही तासांतच हुंडेकरी सुखरूप परतल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी पत्रकार परीषदेत सांगितले. मात्र, अपहरण करणारे आरोपी अद्याप फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेविषयी पोलिसांकडून कमालीची गोपनीयता बाळगण्यात येत असून, अपहरणाच्या घटनेबाबत काहीही माहिती दिली जात नाही.

शहरातील कोठला भागात हुंडेकरी यांचे निवासस्थान आहे. तेथून दीडशे मीटर अंतरावर असलेल्या मक्का मस्जिदमध्ये ते पहाटेच्या सुमारास नमाज पठणसाठी जात होते. घरापासून शंभर मीटर अंतरावरच त्यांना अडविण्यात आले. हुंडेकरी यांना अडविलेल्या चार ते पाच जणांनी तोंडाला मास्क लावले असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. हुंडेकरी यांना शस्त्राचा धाक दाखवित बळजबरीने ओढत नेत चारचाकी वाहनात बसविले. हुंडेकरी यांनी त्यांच्या ताब्यातून सुटकेचा प्रयत्न केला, मात्र तो निष्फळ ठरला.

हुंडेकरी यांना गाडीत बसून अपहरकर्ते पसार झाले. हुंडेकरी यांच्या अपहरणानंतर कार सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणार नाहीत याची काळजी घेण्यात आल्याचे समोर आल्याने अपहरणकर्तेही याच भागातील असावेत, असा पोलिसांचा संशय आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, कोतवाली, तोफखाना पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपहरण झालेल्या ठिकाणाची पहाणी करत तेथील प्रत्यक्षदर्शीसोबत संवाद साधला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित हुंडेकरी यांना शोधण्यासाठी सात पथके रवाना केली. दुपारनंतर हुंडेकरी सुखरूप मिळून आले. हुंडेकरी कुठे होते, त्यांना कुठून सोडविण्यात आले, कुठे मिळून आले, याबाबत पोलीसांकडून गोपनीयता बाळगण्यात आली. मात्र, अपहरणकर्ते फरार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, करीमभाई यांच्या अपहरणाची फिर्याद त्यांचा मुलगा सय्यद अफरोज अब्दुल करीम (वय- 43) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. यात म्हटले आहे की, माझे वडील हे दररोज सकाळी मक्का मस्जिदी येथे नमाज पठणसाठी जात असतात. नेहमी प्रमाणे ते सोमवारी (दि. 18) सकाळी साडेपाचच्या सुमारास नमाज पठणसाठी गेले होते. ते परत आले नाही. आईच्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून मिसकॉल पडलेला होता. त्या नंबरवर फोन केला असता दोन तासांत परत येतो असे सांगितले. वडील आले नाहीत म्हणून आईने पुन्हा त्याच नंबरवर फोन केला असता एक तासांत परत येतो असे वडीलांनी सांगितले. सर्व प्रकार आईने घरी सांगितला. यावेळी वडीलांना ओळखणारे चौघे घरी आले व त्यांनी विचारणा केली की, तुमचे वडील नमाज पठण करून घरी आले का? यावेळी आम्ही नाही म्हणून सांगितले. तेव्हा त्यातील एकाने त्यांना सांगितले की, 5 वाजून 40 मिनटांच्या सुमारास एसटी कॉलनीचे गेटसमोर तुमचे वडील बचाव बचाव असे ओरडत होते व त्यांना दोन अनोळखी इसमांनी कारमध्ये बसवून बळजबरीने घेऊन गेले आहे. यावरून दोन अनोळखी इसमाविरोधात अपहरण केल्याची फिर्याद दिली आहे.

पोलिस ठाण्यात गर्दी
फिर्याद दाखल करण्यासाठी तोफखाना पोलीस ठाण्यात नातेवाईक आणि मित्रपरिवारांनी सोमवारी (दि. 18) दुपारी गर्दी केली होती. वरिष्ठ पोलीस अधिकारीही तोफखाना पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. दुपारपर्यंत पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली. दरम्यान आ. संग्राम जगताप यांनीही तोफखाना पोलिसांत धाव घेत हुंडेकरी कुटुंबियांना धीर देऊन आरोपीचा तपास लवकर करण्याची मागणी केली.

हुंडेकरी यांचा एसटीने प्रवास
अपहरण केलेले उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांना अपहरणकर्त्यांनी जालन्याजवळ सोडून दिले. अपहरणकर्ते मात्र पसार झाले आहेत. घटना घडल्यानंतर पोलिसांनी तत्काळ शोध सुरू केला. तांत्रिक तपासाच्या आधारे करीमभाई जालना येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सात पथके करून जालन्याच्या दिशेने रवाना केली. मात्र, अपहरणकर्त्यांनी करीमभाई यांना जालन्याच्या बसस्थानकावरच सोडून दिले आणि ते पसार झाले.

करीमभाई यांनी एसटीने नगरच्या दिशेने प्रवास सुरू केला. त्यावेळी बसमध्ये शेजारी बसलेल्या तरुणाकडून मोबाईल घेऊन करीमभाईंनी आपल्या घरी फोन केला आणि एसटी बसने घरी येत असल्याचे सांगितले. त्यांच्या फोननंतर कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला.

करीमभाई एसटीने नगरकडे येत असल्याचे कुटुंबियांनी पोलिसांना सांगितले. त्यानुसार आधीच जालन्याच्या दिशेने निघालेल्या पोलीस पथकाने नगर-औरंगाबाद रस्त्यावरील टोल नाक्यावर थांबून प्रत्येक एसटी बस तपासण्यास सुरवात केली. त्यात दुपारी तीन वाजता पुण्याला जाणार्‍या एका बसमध्ये करीमभाई बसलेले आढळले. त्यांना उतरवून घेऊन पोलिसांच्या वाहनातून नगरला आणले.

हुंडेकरी यांनी ज्या तरुणाच्या मोबाईलवरून घरी संपर्क साधला, त्या तरुणालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्याचा जबाब घेऊन सोडून दिले. दरम्यान, आरोपींच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखा, तोफखाना व कोतवाली पोलिस ठाण्याची सात पथके रवाना झाली आहेत. करीमभाईं यांच्याकडून अपहरणकर्त्यांबाबत पोलीस माहिती घेत आहे.

गुन्हेगाराच्या मागावर
हुंडेकरी ज्या ठिकाणी राहतात त्याच परिसरात कुख्यात गुन्हेगाराचेही घर असल्याचे समजते. तो गुन्हेगार पोलीस दप्तरी हद्दपार असल्याचे समजते. हुंडेकरी यांची दिनचर्या माहिती असणार्‍याचाच अपहरणात सहभाग असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पोलीस त्यादृष्टीनेही तपास करत आहेत. पोलीस त्या संशयितांच्या हालचालीवर बारकाईने नजर ठेवून आहेत.

सीसीटीव्ही फुटेज ताब्यात
करीम हुंडेकरी यांचे ज्या ठिकाणाहून अपहरण झाले, त्या ठिकाणी दुकाने असून तेथे सीसीटीव्ही आहेत. यातील एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यात अपहरणकर्त्यांची कार दिसते. मात्र, त्यात बसलेले कुणीही दिसत नाहीत. त्यामुळे अपहरणकर्ते नेमके कोण, याबाबत गौडबंगाल कायम आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!