Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

येवला : दोन कोटींच्या खंडणीसाठी अल्पवयीन सख्या बहिणींचे अपहरण

Share

येवला | प्रतिनिधी

तालुक्यातील गुजरखेडे येथील अल्पवयीन दोन सख्या बहिणींना आमिष दाखवत पळवून नेऊन त्यांच्या बदल्यात दोन कोटींची खंडणी मागणार्‍या आरोपीं विरोधात येवला तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अधिक माहिती माहिती अशी की, सोमनाथ पांडुरंग आहिरे (वय ४०) रा. गुजरखेडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या दोन मुलींना संशयीत आरोपी राहुल विजय पवार (वय २०) रा. नवसारी, मनमाडी याने (दि. ८) मार्च रोजी रात्री काहीतरी आमिष दाखवत पळवून नेले. त्यानंतर राहुल पवार या व्यक्तीने दोन्ही बहिणींना दुसर्‍या संशयित आरोपी तृतीयपंथी असलेला पुजा उर्फ दिनेश राजेंद्र सोळसे रा. पोहेगाव ता. कोपरगाव याच्याकडे पोहोच केले.

दरम्यान, मुख्य संशयित आरोपी राहुल पवारने मुलींच्या वडिलांना फोन करत निलेश (नाव पूर्ण समजू शकले नाही) याला फोन वर बोलायला लावून फिर्यादी मुलींचे वडिल सोमनाथ आहिरे यांच्याकडे तब्बल दोन कोटींची खंडणी मागितली. अपहरण आणि खंडणीची तक्रार प्राप्त होताच मनमाड उपविभागीय अधिकारी समिरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली येवला तालुका पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांनी तात्काळ गुन्ह्याचा तपास सुरु करत मुलींच्या शोधासाठी एक पथक कोपरगाव, शिर्डी येथे रवाना केले. (दि. १०) मार्चच्या मध्यरात्री कोपरगाव तसेच शिर्डी परिसरातून काही आरोपींना ताब्यात घेतले असून येवला तालुका पोलिस ठाण्यात संशयीत आरोपी विरोधात भा. द. वि. ३६३, ३८७, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक भवारी हे करीत आहे.

दोन तासात आरोपी पोलिसांच्या ताब्यात

घटनेचे गांभीर्य पाहत येवला तालुका पोलिस ठाण्याचे सिंघम म्हणून ओळख निर्माण करणारे पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांनी तात्काळ आपले पथकातील पोलिस उपनिरीक्षक शिंदे, पोलिस शिपाई आबासाहेब पिसाळ, पारधी, फसाले तसेच महिला पोलिस शिपाई उशा आहेर, शारदा कदम यांना सोबत घेऊन दि. ९च्या रात्री ११.३० वा. शिर्डी येथेही बस स्थानक परिसरात सापळा रचून काही आरोपींना शिताफीने अटक केली.

या आरोपींना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी अपहरण केलेल्या मुलींना डांबून ठेवलेल्या ठिकाणची माहिती दिली. पोलिसांनी ताबडतोब त्याच रात्री म्हणजे दि. १० च्या मध्यरात्री १ वाजता पोहेगाव- कोपरगाव रोडवरील तळेगाव शिवारातुन मुलींची सुखरुप सुटका करत उर्वरित सर्व आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुन्हा दाखल होताच येवला तालुका पोलिसांच्या पथकाने रात्रभर जागत अथक परिश्रम घेऊन अवघ्या दोन तासात आरोपी जेरबंद केले व अपहरण झालेल्या मुलींची सुखरुप सुटका केली. त्यामुळे येवला तालुक्यात या पोलिस पथकाचे कौतुक होत आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!