खोकरच्या सरपंचावर कारवाईचा प्रस्ताव आयुुक्तालयाकडे

0

सरपंच व ग्रामसेवक यांचेकडून रक्कम वसुलीचा जिल्हा परिषदेचा आदेश; भरणा न झाल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश

भोकर (वार्ताहर) – श्रीरामपूर तालुक्यातील खोकर ग्रामपंचायतीचे सदस्य दीपक काळे यांनी दुसर्‍यांदा केलेल्या उपोषणाला अखेर यश आल्याचे दिसत आहे. जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी खोकर ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांचेकडून रक्कम वसुलीचा आदेश केला असून ती भरणा न केल्यास पोलीसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश काढण्यात आले आहे.
त्याच बरोबर येथील सरपंच यांचेवर कलम 39(1) नुसार कार्यवाहीचा प्रस्ताव आयुकतांना पाठविल्याचे सुचीत केल्याने आता काय निर्णय होणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. अशा प्रकारे सरपंचावर कार्यवाही होण्याचा तालुक्यातील पहीला प्रकार असल्याची चर्चा सुरू आहे.
खोकर ग्रामपंचायत गेल्या दोन वर्षापासून वेगवेगळ्या कारणांनी प्रकाश झोतात आहे. या ग्रामपंचायतीने खोकर येथील रस्त्याचा कामासाठी कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर येथील की वापरल्याची तक्रार केली होती याच बरोबर आर्थीक व्यवहाराबाबतही तक्रार केली होेती. त्यावर चौकशी होवून कारवाईची मागणी काळे यांनी केली होती पण पंचायत समीतीकडून त्यास दिरंगाई झाल्याने गटविकास अधिकारी यांचेवर शिस्तभंगाची कारवाई करावी अशा विविध मागण्यासाठी दिपक काळे हे गेल्या महिण्यात जिल्हा परीषदेसमोर उपोषणास बसले होते.
त्यावर लेखी आश्‍वासन घेवून त्यांनी उपोषण सोडले होते पण कारवाई न झाल्याने ते गेल्या आठवड्यात पुन्हा जिल्हा परीषदेसमोर उपोषणास बसले होते या उपोषणाची जिल्हा परीषदेने तातडीने दखल घेत संबधीत सरपंच यांना दरमहा केवळ सहाशे रूपये मानधन असताना यांनी मार्च 2016 मध्ये मानधाना पोटी जादा रक्कम काढली व त्याची कागदोपत्री जुळणी न झाल्याने ही रक्कम परत भरावी तसेच याच प्रकारे 4200 रूपयांचा चेक अशा प्रकारे 9200 रूपयांचा तातडीनें भरणा करावा.
तसेच ग्रामसेवक यांनीही एक हजार, चार हजार पाचशे व पाचशे साठ अशा रकमा बाबत समाधान कारक खुलासा न आल्याने संबधीत ग्रामसेवकांकडून ही रक्कम वसुलीचे आदेशगटविकास अधिकारी यांना जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काढले आहेत. हि रक्कम संबधीतांनी दहा दिवसांच्या आत भरणा न केल्यास ग्रामविकास विभागाकडील दि. 4 जानेवारी 2017 मधील शासन परीपत्रकानुसार संबधीतांवर पोलीसात गुन्हे दाखल करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.
त्याच बरोबर काळे यांनी केलेल्या तक्रारीनुसार पंचायत समीतीचे सहाय्यक गटविकास अधिकारी यांनी चौकशी करून सादर केलेल्या अहवालातील मुद्यानुसार संबधीत सरपंच यांचेवर महाराश्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39(1) नुसार कार्यवाहीचा प्रस्ताव विभागीय आयुक्त नाशिक यांचेकडे पाठविण्यात आला असल्याचे लेखी देवून दिपक काळे यांना उपोषण सोडण्यास प्रवृत्त करण्यात आले आहे. त्यानुसार त्यांनी उपोषणही सोडले आहे.
मात्र कलम 39(1) नुसार संबधीत सरपंच यांचेवर कारवाई झाल्यास त्यांचे सरपंचपद धोक्यात येवू शकते असे जाणकारांचे मत आहे शिवाय अशा प्रकारे सरपंच कींवा ग्रामसेवकांकडून रक्कम वसुलीचा व सरपंचाविरूद्ध 39(1)ची कार्यवाही होण्याचा हा तालुक्यातील पहीलाच प्रकार असल्याची चर्चा असल्याने आता संबधीतांवर काय कार्यवाही होणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

 

LEAVE A REPLY

*