Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

खरिपातील सर्व पिकांना किडीने ग्रासले

Share

ओढे-नाले, विहीर, बोअर कोरडे ठणठणीत; शेवटच्या हस्त नक्षत्रावरच भिस्त

माळवाडगाव – श्रीरामपूर तालुक्यात या वर्षीच्या पावसाळ्यात पहिले मृग अन् आर्द्रा नक्षत्र कोरडीच गेली. नंतर पेरणी लायक जेमतेम पाऊस होऊन पुनर्वसू नक्षत्रात खरीप पेरणीचे पुनर्वसन झाले असले तरी मका, सोयाबीन पीक किडीने पोखरली असतानाच बाजरीवर नुकतेच केसाळ घुले वर डोके काढू पाहत आहेत. ओढे, नाले कोरडेठाक असून विहीर व बोअरमध्ये पाणी नसताना उत्तरा नक्षत्राची उतराई होण्यास अवघे आठ दिवस बाकी आहेत. उर्वरित हस्त आणि चित्रा नक्षत्राच्या पावसावर श्रीरामपूर तालुक्यातील पूर्व परिसरातील शेतकर्‍यांचे भवितव्य अवलंबून आहे.

तालुक्यात 75 टक्के खरीप पेरणी झाल्याचे चित्र आज दिसत असले तरी, यावर्षी सर्व पिकांवर किडीचा अन् लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. किटकनाशक कंपन्या अन् वितरक यांचा विक्रमी व्यवसाय झाला. पेरणी मशागत, खते बी बियाणे अन् मजूर खर्च जाऊन शेतकर्‍यांच्या हातात कष्टाचे पैसे शिल्लक राहतात की नाही अशी खरीप पिकांची दयनीय अवस्था झालेली आहे. अलिकडच्या सततच्या रिमझिम पावसाने सोयाबीन, मका, बाजरी, कपाशी पिके हिरवीगार अन् जोमाने वाढलेली दिसत असली तरी सर्व पिके रोगराईने ग्रासलेली आहेत. ऑगस्टच्या शेवटच्या अन् सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात तब्बल 15 दिवस पावसाने उघडीप न दिल्याने सोयाबीनवर किडीचा प्रचंड प्रादुर्भाव होऊन अळ्यांनी शिरकाव करून लागलेला फुले, बहार, पाने कुरतडून टाकली. मका पिकास तर जमिनीतून डोके वर काढल्यापासून तर आता कणसे लागेपर्यंत लष्करी अळीने पीछा सोडलेला नाही. कपाशीवर फवारणी मागे फवारणी सुरू आहे. बाजरीवर नुकतेच केसाळ घुले वर डोके काढू लागल्याचे दिसून येत आहे. त्यातच खरीप लाल कांद्याच्या बुंध्याला लष्करी अळी लागल्याचे लाल कांदा लागवड केलेल्या शेतकर्‍यांच्या निदर्शनास आल्याने पुढील रब्बी कांदा करणार्‍या शेतकर्‍यांची तर झोपच उडाली आहे.

यावर्षीच्या पावसाळ्यात पहीले मृग, आर्द्रा ही दोन नक्षत्रे कोरडीच गेली. पुनर्वसू नक्षत्रात अत्यल्प पावसावर डोळे झाकून पेरणी केलेल्या पिकांना सततच्या झिमझिम पावसाने आधार दिला. पुष्य अन् अर्धे अश्लेषा झीमझीम तर ऑगस्टमधील अर्धे अश्लेषा आणि पूर्ण मघा कोरडेच गेले. 31 ऑगस्टपासून सुरू झालेल्या पुर्वाच्या अधूनमधून सरी कोसळत राहिल्या. 13 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या उतरा मागील कमी पावसाची सरासरीची उतराई करेन हा भ्रमनिरास तर होणार नाही ना? अशा चिंतेत शेतकरी आहेत. कारण नारळी पौर्णिमेनंतर परतीच्या मान्सूनचे पूर्वेकडून मोठे पाऊस येत असतात. अद्याप एकदाही ओढे नाले वाहिले नाहीत. विहीर बोअरची पाणी पातळी उन्हाळ्यासारखी जैसे थे आहे. आता उत्तरा नक्षत्राचा आठवडा आणि 27 सप्टेंबर रोजी सुरू होणारे हस्त व 11 ऑक्टोबर चित्रा या दोनच नक्षत्रांवर शेतकर्‍यांचे भवितव्य अवलंबून आहे.

शेतकर्‍यांची हस्त नक्षत्रावरच भिस्त असते. हत्ती सारखा धो धो कोसळून ओढे नाले भरून पाणीच पाणी करत असतो. चित्रा नक्षत्राकडे दमदार नक्षत्र म्हणून पाहिले जात नसले तरी यावेळी तोही जोरदार यावा अशी प्रार्थना शेतकरी करत आहेत. तर चालूवर्षी शेवटच्या टप्प्यात पुरेसा पाऊस झाल्यानंतरच शेतकर्‍यांना रब्बी पिकांचे नियोजन करता येणार आहे.

मेगाभरतीमुळे कर्जमाफीच्या आशा मावळल्या
मागील वर्षी दुष्काळी परिस्थितीचे चटके सहन करून शेजारच्या तालुक्याप्रमाणे शेतकर्‍यांच्या पदरात कुठलाही दुष्काळ निधी, अनुदान, पीकविमा, पडलेला नाही. निवडणुकीच्या तोंडावर संपूर्ण कर्जमाफी होईल या अपेक्षेने दीड लाख रुपयांची कर्जमाफी योजना दोन लाख रकमेच्या पुढील कोणत्याही शेतकर्‍यांना केलेली नाही. आता भाजप-सेनेच्या मेगाभरतीमुळे संपूर्ण कर्जमाफीच्या आशा मावळल्या आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!