गोंडेगाव परिसरात खरीप पिके जळाली

0
गोंडेगाव परिसरात पावसाअभावी जळालेली पिके.

पंचनामे करून भरपाई मिळण्याची शेतकर्‍यांची मागणी

गोंडेगाव (वार्ताहर) – श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव परिसरात यंदा खरीप हंगामात पावसाने शेतकर्‍यांची निराशा केली असून थोड्या फार पावसावर उशिराने पेरणी केलेली पिके गेली दोन महिन्यांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे जिळू लागली असून शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे या पिकांचे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे. गोदावरी उजव्या तट कालव्याच्या टेलच्या भागाला असलेल्या चारी क्रमांक 19 व 20 वरील भागातील शेतकर्‍यांची पिके पूर्णपणे जळाली असून त्यात सोयाबीन, भुईमूग, मका, कपाशी, कडवळ या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

तरी महसूल विभागाने या परिसरातील पिकांचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांमधून होत आहे. तसेच नाशिक जलसंपदा विभागाने एक महिन्यापूर्वीच रोटेशन दिले असते तर पिके वाचली असती. परंतु संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे 7 नंबर फार्म भरण्यासाठी उशिरा निर्णय घेऊन पंधरा दिवस चालढकलपणा केल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. आता कॅनॉलला रोटेशन देऊन शेतकर्‍यांची थट्टा करण्याचे काम पाटबंधारे विभाग करत आहे. गेल्या महिनाभरापासून गोदावरी पूर्ण क्षमतेने वाहत असताना जर गोदावरी उजवा तट कालवा सोडला असता तर पिके जगली असती.

सध्या जनावरांच्या चार्‍याचा प्रश्‍नही गंभीर बनला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचा दुग्ध व्यवसाय अडचणीत सापडला आहे. एकंदरित वेळेवर आवर्तन न मिळाल्यामुळे परिसरातील शेती पिके जळाली आहेत. त्यामुळे या पिकांचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे. गोंडेगाव परिसराचा पाणी प्रश्‍न गंभीर असताना स्थानिक लोकप्रतिनिधींनीही याकडे पाठ फिरविल्याने आपण न्याय कुणाकडे मागायचा? या संभ्रामात शेतकरी पडला आहे.

 

LEAVE A REPLY

*