
मोदलपाडा | वार्ताहर - nandurbar
तळोदा तालुक्यातील रोझवा पुनर्वसन क्रमांक चार येथे नाल्यात मासे (catching fish)धरताना शॉक लागून युवकाचा (Youth) मृत्यू (dies) झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
याबाबत मयत युवकाचे वडील सुकन्या जंगल्या पावरा रा.रोझवा पुनर्वसन ता.तळोदा यांनी तळोदा पोलीस स्टेशनला खबर दिली. त्यानुसार ३१ डिसेंबरच्या पहाटे साडेचारच्या सुमारास गढीकोठडा गावाजवळील नाल्यात त्यांच्या मुलगा राकेश पावरा (वय २२) हा इतर तीन मित्रासह मासे पकडण्यास गेला होता.
तेथे विद्युत तारेवर आकडा टाकून मासे पकडण्यासाठी तार पाण्यात सोडली. तेव्हा राकेश पावरा हा पाण्यात पडला व त्याला शॉक लागला. त्यावेळी त्याचे मित्र किमसिंग पावरा, दुधल्या पावरा, विश्राम पावरा यांनी त्याला तात्काळ बाहेर काढले व आपल्या मोटरसायकलवर तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
त्यावेळी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश पवार यांनी त्यांची तपासणी करून त्यास पहाटे साडेपाचला मयत घोषित केले.मयताच्या वडिलांनी दिलेल्या खबरीवरून तळोदा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल राजधर जगदाळे हे करीत आहेत.